विघ्नराजावताराश्च शेषवाहन उच्येत |
ममतासुर हन्तास विष्णुब्रह्मेति वाचकः ||
(अर्थ : श्रीगणेशाचा विघ्नराज हा अवतार विष्णुब्रह्माधारक असुन, ममतासुर संहारक आणि शेषावर विराजमान असा आहे)
श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘विघ्नराज’ हा सातवा अवतार ममतासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.
देवी पार्वती एकदा आपल्या सख्यांसोबत हास्यविनोद करीत बसली होती. हसता हसता अचानक तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महाकाय राक्षस निर्माण झाला. त्याला पाहताच पार्वती व तिच्या सख्या अचंबित झाल्या. देवी पार्वतीने आपल्या हास्यातून उत्पन्न झालेल्या या असुराचे नाव ‘ममतासुर’ असे ठेवले व त्यास श्रीगणेशाच्या षडाक्षर मंत्राची दिक्षा दिली. देवी पार्वतीने ममतासुरास शुभार्शिवाद दिले व श्रीगणेशाची भक्तीभावे आराधना व इच्छित फलप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यास सांगितले. देवी पार्वतीच्या आज्ञेनुसार ममतासुर श्रीगणेशाच्या आराधनेकरीता वनात निघून गेला. वनात जात असताना त्याची शंबरासुर नावाच्या असुराची भेट झाली. ममतासुर व शंबरासुर हे दोघेही पहिल्या भेटीतच एकमेकांचे मित्र झाले. ममतासुराने त्यास आपल्या जन्माचा वृत्तांत सविस्तर कथन केला. तसेच त्याची समस्त ब्रह्मांडावर राज्य करण्याची मनिषा आहे हे देखील सांगितले. त्यानंतर शंबरासुराने ममतासुरास त्याची मनिषा पुर्ण करण्याकरीता सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले.
शंबरासुर ममतासुरास असुरांच्या राज्यात घेऊन गेला. शंबरासुराचा जन्म कसा झाला व त्याची ब्रम्हांडावर विजय मिळविण्याची प्रबल इच्छा जाणून सर्व असुरांच्या देवांवर विजय मिळविण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. शंबरासुर व इतर असुरांनी ममतासुरास अनेक असुरी विद्या शिकविल्या. लवकरच ममतासुर असुरी विद्यांमध्ये पारंगत झाला. मग शंबरासुराने त्याला ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याचा हेतू साध्य करण्याकरीता श्रीगणेशाची तपश्चर्या करण्याचे सुचविले.
ममतासुराने वनात जाऊन श्रीगणेशाची घोर तपश्चर्या सुरु केली. हजारो वर्षे त्याची तपश्चर्या अविरत सुरु होती. अनेक युगे उलटल्यानंतर श्रीगणेश प्रकट झाले व ममतासुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. ममतासुराने आपली ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याची मनिषा गणेशासमोर व्यक्त केली. आपला ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याचा हेतू निर्विघ्न पार पडावा असा वर ममतासुराने मागितला. श्रीगणेश तथास्तू म्हणून अंतर्धान पावले.
श्रीगणेशाकडून आपणांस इच्छित वर मिळाला ही आनंदाची बातमी आपला मित्र शंबरासुरास देण्याकरीता ममतासुर त्याच्या भेटीस निघाला. शंबरासुर, असुरांचे गुरु शुक्राचार्य व इतर असुरांना प्रत्यक्ष भेटून ममतासुराने सर्व वृत्तांत कथन केला. संपुर्ण असुर राज्य आनंदाने जल्लोष साजरा करु लागले. ममतासुरास विविध अलंकार व शस्त्रास्त्रे भेटस्वरुपात देण्यात आली. असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्यास असुरांचा राजा घोषीत केले. याच प्रसंगी शंबरासुराने आपली कन्या ममतासुरास अर्पण करुन तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. ममतासुराचा विवाह शंबरासुराच्या कन्येशी झाला. इच्छित वर प्राप्ती, असुरराज पदाचा राज्याभिषेक व असुरकन्येशी विवाह या सर्वांनी ममतासुर भारावून गेला. आनंदाच्या भरात त्याने ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्यासाठी युद्धाची घोषणा केली.
असुरराज ममतासुराने तिन्ही लोकांशी युद्ध पुकारले. श्रीगणेशाच्या आर्शीवादामुळे त्याच्या मार्गात कोणतेही विघ्न आले नाही व त्याने ब्रम्हांडावर विजय मिळविला. पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग तीनही लोक ममतासुरास शरण गेले. ममतासुर आपल्या विजयाने उन्मत्त झाला. त्याने देवदेवता व ऋषिमुनींचा छळ सुरु केला. यज्ञ-याग बंद झाले व असुरांचे राज्य सुरु झाले. सगळीकडे हाहाकार माजला. देवदेवता व ऋषिमुनींनी विघ्नराज श्रीगणेशाकडे धाव घेतली. समस्त ब्रम्हांडास उन्मत्त ममतासुरापासून वाचविण्याकरीता प्रार्थना करु लागले. श्रीगणेशाने त्यांची विनंती मान्य केली व नारद मुनींना आपला दूत म्हणून ममतासुराकडे पाठविले.
नारदमुनींनी ममतासुराने आपला उन्माद थांबवून श्रीगणेशास शरण येण्याचा संदेश दिला. पण उन्मत्त ममतासुराने मी कोणासही शरण येणार नाही असे सांगून नारदमुनींचा अवमान केला. श्रीगणेश अत्यंत क्रोधीत झाले व विघ्नराज रुपात प्रकट झाले. शेषनागावर विराजमान विघ्नराज गणेशाच्या हातात कमळाचे फूल होते. त्यांनी आपल्या हातातील कमळ असुरांच्या राज्यावर भिरकावले. त्या कमळाच्या केवळ सुगंधाने सर्व असूर मुर्छीत झाले. हे पाहून ममतासुराचा अहंकार गळून पडला आणि तो भितीने थरथर कापू लागला. ममतासुर विघ्नराज गणेशास शरण आला. त्यांच्याकडे क्षमायाचना करु लागला. विघ्नराज गणेशाने त्यास क्षमा केली व पाताळात जाऊन वास्तव्य करण्यास सांगितले. ममतासूर पाताळात निघून गेला व ब्रम्हांडावरील असुरांचे राज्य संपुष्टात आले. सर्व देवदेवता व ऋषिमुनी विघ्नराज श्रीगणेशाची स्तुती गाऊ लागले. अशा प्रकारे विघ्नराज श्रीगणेशाने ममतासुराचा अहंकार नष्ट करुन ब्रम्हांडास असुरांच्या त्रासातून वाचविले.
श्रीगणेशाच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या अहंकाराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या विघ्नराज श्रीगणेशास प्रणाम असो!!!
~*~
‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ६ : विकट’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ८ : धुम्रवर्ण’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा