ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

ॐ कार स्वरूप श्रीगणेशाच्या १४ विद्या व ६४ कला...

चतु:षष्टीकोटयाख्यविद्याप्रदं त्वां सुराचार्यविद्याप्रदानापदाम् l
कठाभिष्टविद्यापर्कं दंतयुग्मं कविं बुद्धीनाथं कवीनां नमामि ll 

(अर्थात, हे गजानना, तू चौसष्ठ कोटी विद्या प्रदान करणारा आहेस, एवढेच नाही, तर देवांच्या आचार्यांनाही विद्या प्रदान करणारा आहेस. कोणतीही विद्या देणारा तूच आहेस (कठोपनिषदरुपी विद्येचा दाता), दोन दात असणारा, कवी (बुद्धीमान), जनांच्या बुद्धीचा तू स्वामी, तुला माझे वंदन असो.)...आद्यकवी वाल्मिकी ऋषी

तुमच्या-आमच्या सर्वांच्याच लाडक्या गणरायाला भारतीय संस्कृतीत आद्यस्थान आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा १४ विद्या आणि ६४ कलांनी बहरलेली असून तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या ‘श्री गणेशाला’ १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानलं जातं. चौसष्ट कलांमध्ये पारंगत असलेल्या युद्ध, शास्त्र आणि नर्तन, गायन अशा परस्परभिन्न कला जाणणा-या गजाननाच्या १४ विद्या व ६४ कला म्हणजेच ज्ञानाचे स्वरूप होय. अश्या ज्ञानस्वरूप १४ विद्या व ६४ कलांची माहिती खालीलप्रमाणे :

१४ विद्यांमध्ये ....
= ४ वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद)
= ६ वेदांगे [(१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र, (२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या, (३) निरुक्त-वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र, (४) कल्प- धार्मिक विधी-  व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र, (५) छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान, (६) शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन]
= न्याय
= मीमांसा
= पुराणे
= धर्मशास्त्र
-------------
= १४ विद्या 

तर ६४ कला म्हणजे ...
१) पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे.
२) धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३) दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४) आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५) वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६) पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७) वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८) व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९) वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०) शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११) अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२) वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३) बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४) चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५) पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६) आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७) कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८) हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९) प्रहेलिका- कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०) प्रतिमाला- अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१) काव्यसमस्यापूर्ती- अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२) भाषाज्ञान- देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३) चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे.
२४) कायाकल्प- वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५) माल्यग्रंथ विकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६) गंधयुक्ती- सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७) यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८) अत्तर विकल्प- फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९) संपाठय़- दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०) धारण मातृका- स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१) छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२) वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३) मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४) द्यूतक्रीडा- जुगार खेळणे.
३५) पुष्पशकटिका निमित्त ज्ञान- प्राकृतिक
३६) माल्यग्रथन- वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७) मणिरागज्ञान- रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८) मेषकुक्कुटलावक- युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९) विशेषकच्छेद ज्ञान- कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०) क्रिया विकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१) मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व करणे.
४२) आभूषण भोजन- सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३) केशशेखर पीड ज्ञान- मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४) नृत्यज्ञान- नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५) गीतज्ञान- गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६) तंडुल कुसुमावली विकार- तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७) केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८) उत्सादन क्रिया- अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९) कर्णपत्र भंग- पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०) नेपथ्य योग- ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१) उदकघात- जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२) उदकवाद्य- जलतरंग वाजविणे.
५३) शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४) चित्रकला- नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५) पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६) नाटय़अख्यायिका दर्शन- नाटकांत अभिनय करणे.
५७) दशनवसनांगरात- दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८) तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे.
५९) इंद्रजाल- गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०) तक्षणकर्म- लाकडावर कोरीव काम करणे.
६१) अक्षर मुष्टिका कथन- करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२) सूत्र तथा सूचीकर्म- वस्त्राला रफू करणे.
६३) म्लेंछीतकला विकल्प- परकीय भाषा ठाऊक असणे.
६४) रत्नरौप्य परीक्षा- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters