ज्याच्या प्रसादाने धर्म, अर्थ आणि काम प्राप्त होतात त्या षोडशात्म विघ्नराजाचे सोळा ध्यान प्रकार आहेत. या सोळा ध्यानप्रकारांची म्हणजेच गणपतिषोडशध्यानांची नावे : बाल, तरुण, भक्त, वीर, शक्ती, ध्वज, सिद्धी, उच्छिष्ट, क्षिप्र, हेरंब, लक्ष्मी, महान्, विघ्न, विजय, कल्पहस्त आणि ऊर्ध्व.
या वैशिष्टपूर्ण सोळा ध्यानांचे वर्णन मूळ संस्कृत श्लोकाच्या मराठी अनुवादातून दिसून येते :
(१) ज्याच्या हातात केळी, आंबा, ऊस, मोदक असून जो बालसूर्याप्रमाणे कांतिमान आहे, त्या बाल गणेशाला मी वंदन करते.
(२) पाश, अंकुश, अनारसा, कवठ, जांभुळ, तीळ, मोदक आणि कमल आपल्या हातात धारण करणा-या तरुण अरुणाप्रमाणे कांतिमान असणारा तरुण गणेश आमचे नेहमी रक्षण करो.
(३) नारळ, आंबा, केळ, गूळ, पायस धारण करणा-या, शरदऋतूंतील चंद्राप्रमाणे कांतिमान भक्त गणाधिपताला मी भजते.
(४) वेताळ, शक्ती, धनुष्यबाण, चर्म, खङग, खट्वांग, मुद्.गर, गदा, अंकुश, नाग, पाश, शूल, परशू व ध्वज धारण करणा-या वीर नावाच्या अरुण गणेशचे मी स्मरण करते.
(५) बसलेल्या देवीला आलिंगण देऊन, एकमेकांच्या कमरेला स्पर्श करणा-या, संध्याकालीन अरुणाप्रमाणे असणा-या, पाश धारण करुन भय दूर करणा-या शक्ती गणेशाचे मी स्तवन करते.
(६) पुस्तक, दंडकमंडलु, स्त्री आणि विघ्ने दूर करणारी भूषणे हाती धारण करणा-या चंद्राप्रमाणे कांती असलेल्या चतुर्मुख ध्वज गजाननाचे जो स्मरण करतो तो धन्य होय.
(७) कमळ, आंबा, पिकलेल्या मंजरी, उसाचे कांडे (इक्षुदंड), तीळ, मोदक व परशू धारण करणा-या श्रीसमृद्धियुक्त सिद्धी गणेशाला नमस्कार असो.
(८) तीळ, कमळ, डाळिंब, वीणा, माळ धारण करणारा उच्छिष्ट नावाचा मोक्ष देणारा गणेश आमचे रक्षण करो.
(९) रक्तवर्ण विनायक आमची विघ्ने दूर करो. जो तांबड्या फुलाप्रामणे सुंदर अंगकांतीचा आहे, तो क्षिप्र नामक गणेश ध्यान करण्यास योग्य आहे.
(१०) अभयवरदहस्त, पाश, दन्त, अक्षमाला, परशू, मुद्.गर, व मोदक हाती घेणारा आणि ज्याने सिंहाला नमविले आहे, जो पंचवक्त्र आहे, तो हेरंब नामक गणेश आमचे रक्षण करो.
(११) शुक्र, बीजापूर, कमह, माणिक्यकुंभ, अंकुश, पाश, कल्पकता यांनी शोभणारा, श्यामल कमळाने युक्त, आणि ज्याच्याजवळ दोन देवी आहेत तो गौरांग लक्षमीगणेश आमचे रक्षण करो.
(१२) कल्हार, कमळ, बीजापूर, गदा, मणिकुंभ, शाली, पाश व चक्र यांनी युकत, सुंदर कमळ धारण करणा-या तसेच गौरांगी देवी नेहमी जवळ असलेला असा रक्तवर्ण महान् गणेश आमचे सतत कल्याण करो.
(१३) शंख, चाप, पुष्प, कुठार, पाश, चक्र, अंकुश, मंजरी ज्याच्या हातात आहेत, जो सर्व भूषणांनी संपन्न आहे, तो सुवर्ण कांतिमान् विघ्नगणेश विजयी असो.
(१४) पाश, अंकुश, अपूप आणि कु-हाड ज्याच्या हातात आहेत, ज्याची एक अंगुली चंचल सोंडेवर आहे, त्या पिवळया रंगाच्या कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या विजय गणेशाची मी सेवा करते.
(१५) कल्पलता हाती असलेला, दोन रक्तकुंभांनी उजळलेला, पाश-अंकुश-फलधारी, मूषकवाहन कल्पहस्त गणेश आमचे रक्षण करो.
(१६) कल्हार, साळीचे कणीस व परशू धारण करणारा, तसेच सुवर्णकांतिमान् आणि तरुण अंगकाठी असलेल्या देवीने ज्याच्या आलिंगनासाठी हात उचलला आहे तो ऊर्ध्व गणेश मला अभयदान करो.
असे हे वेदसाररूप गणेशमूर्तीचे ध्यानप्रद स्तोत्र आहे. जो हे गणेशभक्तीने पठण करतो त्याला तिन्ही लोकांत अप्राप्य असे काही नाही.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा