ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

गणपती / गणेश / गणराज या नावामागील इतिहास...

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.यामागिल इतिहास खालीलप्रमाणे :

एकदा भगवान शंकर निद्रिस्त असताना गजानन तेथे आला आणि त्यांच्या मस्तकावरील चंद्र काढून खेळायला गेला.

तेवढयात मंगल नावाचा एक दैत्य भयंकर डुकराचे रुप घेऊन तेथे आला आणि मयुरेशाच्या अंगावर धावला.  मयुरेशाने त्याचे दोन्ही हात धरुन दुस-या हाताने त्याच्या तोंडाचा खालचा जबडा पकडला आणि त्याला फाडले. मृत डुकर राक्षराच्या रुपात सर्वांना दिसला.

नंतर आपल्या भालप्रदेशावर चंद्र नाही असे पाहताच शंकर संतप्त होऊन आपल्या गणांना म्हणाले, "तुम्ही कशाची राखण करता? माझ्या ललाटीचा चंद्र कुठे गेला?" त्यावर काहींनी त्यांना सांगितले, "तुमचा पुत्र मयुरेश्वर बाहेर खेळत असताना आम्ही त्याच्या हातात चंद्र पाहिला. पण त्याने तो केव्हा नेला हे मात्र आम्हास ठाऊक नाही." त्यावर शंकर म्हणाले, "तुम्ही केवळ खादाड आहात. चंद्र किंवा चंद्रास नेणारा यापैकी कोणाला आणलंत तर ठीक, नाहीतर मी तुमचं भस्म करुन टाकीन."

नंतर संतप्त झालेले गण मयुरेश्वराकडे आले आणि रागावून म्हणाले, "अरे दुष्टा, चोरा, एक तर भगवान शंकरांकडे चल नाही तर चंद्र दे" हे गणांचे बोलणे ऐकून रागावलेला मयुरेश म्हणाला "गणांनो, मी तुम्हाला व त्यांना विचारत नाही. कारण मी त्रिभुवनास उत्पन्न करणा-या जननीचा पराक्रमी पुत्र आहे." त्याच्या श्वासानेच सर्वजण उडून शंकरांपुढे पडले. तेव्हा संतप्त होऊन महादेव प्रथमादिकांस म्हणाले, "त्या उमेच्या दुष्टबुद्धी धाकटया पोरास बांधून आणा."

गण त्याला बांधून आणावयास गेले, परंतु विनायकाने त्यांना मोहित केले आणि तो स्वत: गुप्त झाला. पुन्हा प्रकट झाला. असे वारंवार होऊ लागले. तो त्यांना केवळ श्वासानेच उडवून देऊ लागला. शेवटी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून तो त्यांच्यापुढे उभा राहिला. मग त्यांनी त्याला बांधले व शंकरापुढे घेऊन जाण्यास उचलू लागले, पण त्यांना तो उचलेना. शेवटी गणांनी आपली असमर्थता शंकरापुढे व्यक्त केली. 
तेव्हा शंकरांनी पुढे असलेल्या नंदीस त्या चोर मयूरास घेऊन येण्याची आज्ञा केली. नंदीला वाटले की, शेष, सूर्य, शशांक यांनाही आपण शंकराच्या आज्ञेने मारु तर या चिमुरड्याची काय कथा? मग तो तडक गणेशाकडे आला, पण गणेशाने केवळ श्वासोश्वास करुन त्याला जर्जर केले. तो मूर्च्छित झाला. 
इतक्यात शंकरांच्या मस्तकी चंद्र दिसू लागला. ते पाहून गण म्हणाले, "देवा चंद्र तुमच्या मस्तकीच आहे. आम्हास तुम्ही व्यर्थ्य आज्ञा केली." भगवान शंकरानी चंद्र आपल्या मस्तकी असल्याचे पाहिले व गणेशास आणि गणांस ते म्हणाले, "माझ्या आज्ञेने गण उगाच थकले. तुला व नंदीला उगाच त्रास दिला"
यावर गणांनी अशी प्रार्थना केली की, आजपासून हा मयुरराज आमचा स्वामी होवो. शंकर त्यांना 'तथास्तू' म्हणाले. त्यामुळे मयुरेश गणेश / गणराज / गणपती झाला.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters