ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

कथा श्रीगणेश जन्माची (शिवपुराणातील)...

शंकर पार्वतीचा विवाह झाल्यानंतर थोडया काळातली ही गोष्ट. एकदा पार्वती व तिच्या सख्या जया-विजया विचार करीत बसल्या होत्या. जया-विजया पार्वतीला म्हणाल्या, "आपल्या दारात नंदी, श्रृंगी इत्यादी शिवगण असंख्य तिष्ठत असतात. ते सर्व आपल्या दारात बसतात, पण आज्ञा मात्र भगवान शंकराची पाळतात. ते सर्व आपले असले तरीही ते आत्मीय नाहीत. त्यांच्याविषयी आपलेपणा कसा तो वाटत नाही. तरी पार्वती, आपला असा एखादा स्वत:चा गण तू का तयार करीत नाहीस?" हे त्या सख्यांचे बोलणे ऐकून पार्वती त्यादृष्टिने विचार करु लागली.

त्यानंतर एकदा पार्वती स्नान करीत असता, नंदीने सांगूनही शंकर एकदम आत आले, त्यावेळी पार्वतीला अतिशय लाज वाटली. त्यानंतर तिने केवळ आपली आज्ञा पाळणारा, आपल्याशिवाय दुस-या कोणाचेही न ऐकणारा आपलाच सेवक पाहिजे, असा विचार करुन स्वत:च्या शरीरापासून मळ काढून त्याचा सर्वांगसुंदर पुरुष निर्माण केला. सर्व अलंकार-वस्त्रे देऊन त्याला सर्व प्रकारचे आर्शीवाद दिले आणि त्याला निक्षून सांगितले, "बाळा, तू माझा द्वारपाल हो. तू माझा पुत्र आहेस, दुसरा कोणीही नाहीस. तुझे हे काम आहे की, माझ्या आज्ञेशिवाय आत कोणालाही सोडायचे नाही." असे पुत्राप्रमाणे वागवून त्याची द्वारावर योजना केली.

पुन्हा एकदा पार्वती सख्यांसह स्नान करीत असता शंकर तेथे आले. परंतु दारात बसलेला हा पार्वतीपुत्र काही त्यांना आत जाऊ देईना. तेव्हा भगवान शंकराने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे केले. हा वृत्तांत कळताच पार्वतीला अतिशय दु:ख झाले व तीने हजारो शक्ती निर्माण केल्या आणि त्यांना आदेश दिला की, "तुम्ही कोणताही विचार न करता प्रलय करा!" ती आज्ञा होताच कराली, कुब्जका, खंजा, लंबशीर्षा ह्या शक्तींनी अतीव संहार करुन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. तो संहार पाहून सारेच हतबुद्ध झाले. सर्वांची जीवनाची आशाच खुंटली. सर्व म्हणू लागले की, "जर गिरीजा(पार्वती) प्रसन्न झाली तरच आता स्वास्थ निर्माण होईल, अन्यथा नाही!" शंकरांनाही दु:ख झाले पण क्रुद्ध गिरीजेपुढे जाण्यास कोणी धजेना. साध्या गणांपासून ब्रह्मा, विष्णू, शंकर या देवांपर्यंत कोणीही पुढे होईना.

शेवटी नारद, देवगण व ऋषी या सर्वांची मिळून पार्वतीची क्षमा मागून तीला शांत केले. तेव्हा देवी पार्वती म्हणाली, "माझा पुत्र जर जिवंत होणार असेल तर यापुढे संहार थांबेल. तसेच तो माझा पुत्र सर्वांमध्ये पूज्य झाला पाहिजे. सर्वांचा अध्यक्ष जर तो झाला, तरच शांती निर्माण होईल, अन्यथा नाही."

पार्वतीचे हे म्हणणे शंकरांना सांगून, "सर्व लोकांच्या स्वास्थासाठी एवढे करा" अशी विनंती ऋषींनी त्यांना केली. मग एकदंत असलेल्या हत्तीचे मुख आणून शंकराच्या आज्ञेनुसार गणेशाच्या कलेवरावर ठेवण्यात आले. वेदमंत्रांनी अभिमंत्रण करुन शंकरांचे स्मरण करुन पाणी शिंपडताच तो गणेश चैतन्यमय झाला. झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसला. तो सुंदर गजानन पाहून सर्वांनाच आनंद झाला. पार्वतीने त्याला पाहताच तिलाही पुत्रप्राप्तीचा आनंद झाला; आणि सर्व दु:ख संपले.

नंतर सर्व देवांनी गणेशाला अभिषेक केला, निरनिराळे वस्त्रालंकार घातले. पार्वतीने त्याला पुत्रप्रेमाने जवळ घेऊन अनेक सिद्धी दिल्या आणि अनेक वर दिले. "तुझी यथासांग पूजा केल्याने अनंत विघ्ने दूर होऊन सर्वसिद्धी प्राप्त होतील," असा वरही तिने त्याला दिला. नंतर इंद्रादी देवांनी गणेशाला शंकराजवळ नेले आणि त्यांच्या मांडीवर बसविले. शंकरांनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवून "हा माझा दूसरा पुत्र आहे," असे सांगितले.

गणेशाने उठून शंकर, पार्वती, ब्रम्हा, विष्णू यांना नमस्कार केला. नारदादी ऋषींकडे जाऊन क्षमा मागितली. तेव्हा "हा गणनाथ सर्वांना पूजनीय आहे. ह्याच्या पूजेशिवाय आमची पूजा व्यर्थ्य आहे!" असे बोलून स्वत: शंकर, विष्णू, ब्रह्मदेव व पार्वती यांनी त्याची पूजा केली. मग सर्वानी मिळून त्याची पूजा केली. नंतर सर्वांनी पार्वतीच्या संतोषासाठी गणेशाला  सर्वाध्यक्ष केले. 

शंकरांनी त्याला अनेक वर दिले. ते त्याला म्हणाले, "हे गिरीजासुता, मी संतुष्ट झालो म्हणजे सारे विश्व संतुष्ट झाले. तू लहान असूनही तुझ्या पराक्रमाने मी संतुष्ट झालो आहे. आता तू सुखी हो आणि विघ्न हरण करणा-यांमध्ये तू श्रेष्ठ हो. सर्व गणांचा तू अध्यक्ष असून तू सर्वपूज्य आहेस." एवढे बोलून त्यांनी गणेशपूजाविधी कथन केला. गणेशासंबंधिची निरनिराळी व्रते सांगितली. वर्षभर करण्याचे व्रत सांगून त्याचा उद्यापनविधी सांगितला. होम-हवनविधी सांगून त्यांचे फळ सांगितले.

मग देवांनी दुंदुभी वाजविल्या. अप्सरा नाचू लागल्या. गंधर्व गायन करु लागले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. विश्वाला स्वास्थ मिळाले. सर्व दु:खांचा लय झाला. जिकडे-तिकडे मंगलमय वातावरण पसरले.

4 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

शितल, मला गणपतीच्या जन्माची अर्धवट माहिती होती ती आता पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद

Rajashri Nimbalkar म्हणाले...

गणपतीचा आता जन्म झाला आता त्याला दुर्वाच का आवडतात तसेच तुळशीचे आणि त्याचे वाकडे आहे असे म्हणतात ते कशावरुन याची माहिती क.पया उपलब्ल करुन द्यावी.

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री, ब्लॉग अधिक समृद्ध करण्याकरिता तुमचे अभिप्रायच केवळ स्फुरणीय आहेत असे नाही तर तुमचे योगदानदेखील खरंच वाखाणण्याजोगे आहे.

Sheetal Kachare म्हणाले...

नक्कीच, दुर्वांचे महत्त्व व तुळशी कथाही लवकरच ब्लॉगवर प्रकाशित केली जाईल...

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters