ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

दुर्वा माहात्म्य...


एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून 'अनल' नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला. 

त्या राक्षसाच्या भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेले आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत, पोळीत, जे काही सापडेल त्याचं भक्षण तो करु लागला. हा प्रकार पाहून सर्वजण भयभित झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले. त्यांची करुणावाणी ऐकून लहान बालकाच्या रुपात गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला "मला तुम्ही अनलासुरापुढे नेऊन सोडा".

श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास अनलासुरापुढे नेऊन सोडले तेथे जाताच छोटा गणेश एकदम पर्वताएवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले. त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला. तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत व्हावा म्हणून  प्रत्येकाने काहीना काही दिले :
  • इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून 'भालचंद्र' म्हटले जाऊ लागले.
  • ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा दोन मानसकन्या निर्माण करुन त्या अर्पण केल्या.
  • विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ दिले, त्यामुळे गणेशास 'पद्मपाणी' म्हटले जाऊ लागले.
  • वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला.
  • शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशास 'व्यालबद्धोदर' असे नाव प्राप्त झाले.

इतके उपहार मिळूनसुद्धा श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना. तेव्हा तेथे आलेल्या ८०,००० ऋषिंनी प्रत्येक २१ अशा हिरव्यागार दुर्वा श्रीगजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या, तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला. 

तेव्हा गजानन म्हणाला, "अनेक उपायांनी माझ्या दाहाचं क्षमन झालं नाही, ते दुर्वांनी झालं, म्हणूनच मी या दुर्वांना प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणा-याला पुण्य लाभेल".

4 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

दुर्वा महात्म्य समजले, फारच छान आणि गणशाची प्रतिमा देखिल कथेला साजेशी,कल्पकतेने शोधलीस अशी दुर्मिळ प्रतिमा,फारच छान, धन्यवाद

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री, पोस्ट करताना शक्यतो साजेशी प्रतिमाच टाकण्याचा मानस आहे. पाहूयात...

Ranjit Yadav म्हणाले...

ओंकार गणेशा या ब्लॉगवरील मजकुर आज पहिल्यांदा वाचला, दुर्वा माहात्म्य सुंदर लिहिले आहे. त्यामुळे गणपतीची दोन नविन नावे मला कळली. धन्यवाद

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद रणजित, गणेशाची शक्य तेवढी माहिती सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. दुर्वा माहात्म्य बरोबरीनेच 'मागील पोस्ट पहा'या सदरातील इतर माहितीसुद्धा तुमच्या ज्ञानात निश्चितच भर घालेल.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters