ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

चंद्रास गजाननाचा शाप व उ:शाप...


एकदा कैलास पर्वतावर शिवालयात सभा भरली होती.  तिथे नारदाने एक अपूर्व फळ शंकरास अर्पण केलं. ते फळ पाहून गणपती आणि कार्तिकेयानं ते मागितलं. शंकरांनी ब्रह्मदेवास विचारले की ते फळ दोघांपैकी कोणास द्यावे? ब्रह्मदेवाने ते कुमारास(कार्तिकेयास) देण्यास सांगितल्यामुळे शंकरांनी ते कार्तिकेयास दिले आणि त्यामुळे गजानन रागावला.

नंतर ब्रह्मदेव आपल्या भुवनी जाऊन सृष्टी निर्माण करण्याचे कार्य करु लागले. पण रागावलेल्या गजाननाने एक आश्चर्यकारक विघ्न केलं. उग्र रुप धारण करुन गजाननाने ब्रह्मदेवास  भिववलं. चंद्राला याची मोठी गंमत वाटली आणि तो गजाननाच्या अद्भुत आणि उग्र रुपाची चेष्टा करुन मोठ्याने हसू लागला. ते पाहून गजाननाला राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला की, "माझ्या आज्ञेवरुन तू पृथ्वीवर अदर्शनीय होशील. जो कोणी तुला चुकून पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल आणि तो महापातकी होईल." अशा शाप देऊन गजानन निघून गेल्यावर चंद्राचं पूर्वीचं रुप नष्ट होऊन त्याला दीन आणि मलीन असं रुप प्राप्त झालं. त्याला आपलीच लाज वाटू लागली व तो लपून बसला.

हे सर्व वर्तमान जेव्हा देवांना समजलं तेव्हा त्यांना फार खेद झाला. ते सर्व एकत्र होऊन गजाननापाशी आले व त्यांनी त्याची प्रार्थना व स्तुती केली. गजानन संतुष्ट झाले व देवांना वर मागायला सांगितले. तेव्हा देव म्हणाले , "आम्ही सर्व जण तू चंद्रावर कृपा करावीस अशी इच्छा करीत आहोत." तेव्हा  "जो कोणी जाणता वा अजाणता भाद्रपद शुक्ल चतुर्थीस (गणेश चतुर्थीस) चंद्रदर्शन करील तो शापास व अतिदु:खास पात्र होईल" असे म्हणून गणेशाने चंद्रास दिलेल्या शापाचे स्वरुप सौम्य केले.

गजाननाचे हे वचन ऐकून सर्व देवांना आनंद झाला. गणेशाला वंदन करुन ते देव चंद्राकडे गेले आणि म्हणाले, "तू श्रीगणेशाला शरण जा." नंतर सर्व देवांनी गणपतीला प्रसन्न करुन घेण्यासाठी चंद्राला एकाक्षरी मंत्र सांगितला. चंद्रानं गंगेच्या तीरी त्या मंत्राचा जप बारा वर्षे केला. तेव्हा गजानन प्रकट झाले. चंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्रीगणेशाने चंद्रास उ:शाप दिला -

"चंद्रा, तुला तुझे पूर्वीचं रुप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या (संकष्ट चतुर्थी) दिवशी तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. मात्र भाद्रपद चतुर्थीस (गणेश चतुर्थीस) तुझे मुखावलोकन जो करील, त्याला माझा शाप बाधेल. तसंच तुझी एक कला (चंद्रकला) मी माझ्या मस्तकी भूषण म्हणून धारण करतो. आजपासून शुद्ध द्वितीयेस लोक तुझं प्रेमानं दर्शन घेतील. "

त्यानंतर चंद्राचा मलीनपणा नाहीसा झाला व तो पुन्हा पहिल्यासारखा झाला. चंद्राने  गणेशाची पूजा केली व गणेश गुप्त झाला आणि चंद्र आनंदी होऊन स्वगृही परतला.

2 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

मस्त!! खूपच छान आहे कथा

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री!

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters