ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

आयुधप्राप्ती...


श्रीगणेशास 'पाश', 'अंकुश', 'कमल' आणि 'परशू'  ही आयुधे कशी प्राप्त झाली ते पाहूयात -

गणेशास सहावे वर्ष लागताच देवांचे वास्तुकला तज्ज्ञ मानले जाणारे विश्वकर्मा बालगणेशास भेटायला आले व त्यांनी  पाश, अंकुश, कमल आणि परशू अशी चार आयुधे श्रीगणेशास दिली. त्यावर बालगणेशाने त्यांना विचारले  "ही आयुधे तुम्ही कुठून मिळवलीत?" त्यावर विश्वकर्माने उत्तर दिले -
                     
माझी संज्ञा नावाची सुंदर कन्या आहे. तिला मी विवाह विधीने सूर्यास अर्पण केली. पण तिला सूर्याचे तेज सहन होईना, मग संज्ञेने आपल्या प्रभावाने छायेस निर्माण केलं आणि तिच्यावर सर्व गोष्टी सोपवून ती  लगेच माझ्या घरी परतली. पुढे अनेक दिवसांनी सूर्याने ती छाया असून संज्ञा नाही हे जाणलं. सूर्यदेव लगेच माझ्या घरी आला. यावर घाबरलेली संज्ञा मला विनवनी करु लागली, "तात, मला पुन्हा रविच्या स्वाधीन करु नका. याचं तेज मला सहन होत नाही". संज्ञेचे ते बोलणे ऐकून मी तिचा धिक्कार केला असता ती लगेच बाहेर गेली व घोडीचे रूप घेऊन गुप्तरुपाने वनात जाऊन राहीली. 

नंतर ती घरात नाही हे पाहून मी सूर्यास म्हणालो, "तुझं तेज सहन होत नसल्यानं ती कुठं गेली ते मला ठाऊक नाही. तुझ्या तेजाचा काही भाग कमी होईल तर ती प्रकट होईल, मग तू तिच्याबरोबर विहार कर". त्यावर रविने  "तुमच्या मनात जे असेल ते करण्यात तुम्ही समर्थ आहात" असे म्हणून मान्यता दिली. नंतर मी रविला यंत्रावर घालून किंचित खरवडलं व त्यामुळे त्याच्या तेजाची तिव्रता कमी झाली. मग जिथे संज्ञा गुप्त होऊन राहिली होती तिथे रवि गेला व ते दोघे आनंदानं स्वर्गलोकी गेले.

विश्वकर्मा पुढे सांगू लागला, रविच्या तासून काढलेल्या प्रखर तेजानं गणेशा ही आयुधं तुच्यासाठी मी तयार केली आहेत. ती अति तिक्ष्ण असून काळासही सदा जिंकणारी आहेत. पाश, अंकुश, कमल आणि परशू ही चार आयुधं मी तुला दिली तर चक्र आणि गदा ही दोन आयुधं मी हरीस दिली आहेत तर सर्व शत्रूंचं निर्दालन करणारा त्रिशूळ मी शंकरास दिला आहे.

यावर गणेशाने विश्वकर्माने दिलेली पाश, अंकुश, कमल आणि परशू ही आयुधं धारण केली.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters