ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

गरुड आणि सर्पाची वैरकथा : गणेशास मयुरासनाची प्राप्ती

ब्रह्मदेवाने मानसपुत्रांची निर्मिती केली त्यापैकी मरिची ऋषिं हे एक होते. मरिची ऋषिंचा पुत्र कश्यप याने दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला, ज्यायोगे सृष्टीची निर्मिती झाली. प्रजापतीच्या तेरा कन्या - (दिति, अदिति, दनु, विनता, खसा, कद्रु, मुनि, क्रोधा, रिष्टा, इरा, ताम्रा, इला व प्रधा) व कश्यप ऋषि यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग, अश्व, गंधर्व, अप्सरा, वृक्ष, मानव यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाल्याची कथा ब्रह्माण्ड व भागवत पुराणात सापडते.

कश्यप ऋषिंच्या तेरा भार्यांपैकी 'कद्रु' हिला 'वासुकी' व 'शेष' हे नागरुपी पुत्र झाले तर 'विनता' हिला 'श्येन', 'संपाती', 'जटायू' व 'गरुड' असे पक्षीरुपी पुत्र झाले. कद्रु व विनता यांच्या भांडणाचे पर्यवसान सर्प व पक्षी यांचा संहार होण्यात झाले.

कश्यप ऋषिपत्नी कद्रु व विनता यांचे भांडण

पाताळलोकी कद्रु आपले नागपुत्र वासुकी व शेष यांच्यासोबत वास्तव्य करीत होती. एकदा कद्रुला आपली सवत विनता हिला भेटण्याची इच्छा झाली. कद्रु विनतास भेटायला गेली पण विनता व तिचा पुत्र जटायू यांनी कद्रुचा अनादर केला. हे समजताच कद्रुपुत्र शेष व वासुकी अतिशय रागावले. वासुकी इतर असंख्य नाग सोबत घेऊन विनतेस धरुन आणण्यासाठी तिच्या आश्रमात गेला. त्यांनी विनतेस धरुन ओढत नेण्याचा प्रयत्न करताच विनतापुत्र श्येन, संपाती व जटायू तिथे आले आणि पक्षी व नाग यांच्या युद्ध सुरु झाले.

श्येन, संपाती व जटायू यांना बांधून नाग नेऊ लागले तोच गरुडही इतर पक्षांसह आला व त्याच्या वासानेच भुजंग पळत सुटले. इतक्यात बंधनातून मुक्त झालेली विनता स्वस्थानी गेली. गरुड आणि वासुकीच्या भांडणात श्येन, संपाती व जटायू यांचा पराभव झाला. वासुकीचा पराक्रम पाहून गरुड सुक्ष्मरुप धरुन विनतेचे रक्षण करण्याकरिता निघून गेला. गरुड गेल्याने वासुकी संतापला. त्याने सृष्टी जाळून टाकणारे भयंकर विष निर्माण केले व पक्ष्यांना बांधून नागलोकी नेले. त्यांना एका विवरात टाकले व विवराच दार शिळेने बंद केले.

इकडे आपल्या पुत्रांना बांधून नेले आहे हे समजताच विनता शोक करु लागली. ती कश्यप ऋषिंकडे गेली व त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावर तिच्या इच्छेनुसार तिला दुसरा पुत्र होईल - एक अंडे निर्माण होऊन ते जेव्हा गजानन फोडेल तेव्हा त्यातून उत्पन्न होणा-या पक्ष्याच्या केवळ शब्दानंच सर्पांचा पराभव होईल असा वर मिळाला. हे ऐकून विनतेला अत्यानंद झाला. काही काळानंतर विनतेने एक अंडे घातले. ते अंडे वज्र व पर्वत यांनाही फोडता येण्यासारखे नव्हते. विनता त्या अंडयावर बसून राहिली.

गणेशास मयूरासनाची प्राप्ती

गणेश वयाच्या आठव्या वर्षापासून आश्रमात वेदाध्ययन करु लागला. तो अध्ययन करीत असता त्याच्याकडे इतर तपस्व्यांचे पुत्र आले. त्यांनाही अध्ययनाची इच्छा झाली म्हणून गणेशाने त्या सर्वांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याबरोबर त्यासर्वांना ज्ञान प्राप्त होऊन ते वेदमंत्र म्हणू लागले. ऋग्वेद आणि यजुर्वेद यांची पारायणे संपल्यावर त्या बालकांनी मंजुळ स्वरात सामगायन करण्यास सुरुवात केली. ते पाहून आश्रमातील अनेक ऋषि आश्चर्यचकीत झाले. पण इतक्यात नवीनच आकृती धारण केलेला एक दैत्य तेथे आला. तो आक्राळ-विक्राळ दिसत होता. त्याला पाच नेत्र, चार शिंगे, आठ पाय, चार कान, तीन मुखे आणि दोन पुच्छे होती. त्यास पाहून गणेश हसला आणि मुलांना म्हणाला, "मुलांनो चमत्कार पहा." तो दैत्य नाचू लागला. उंच उडी मारुन भूमीवर पडला पुन्हा उठला. तेव्हा, "याला धरा, धरा" असे गणेश बालकांना म्हणाला आणि वेगाने त्याच्या अंगावर धावला. त्याबरोबरच तो महादैत्य पळू लागला. गणेशाने बालकांसह त्याचा पाठलाग केला. पळता पळता जेथे वायू संचार करीत नाही अशा महाअरण्यात ते गेले. अनेक क्रूर श्वापदे तेथे होती, त्यांना धरण्याकरिता हा गेला. इतक्यात तो दैत्य उडी मारुन दूर गेला. गजानन खिन्न झाला, संतापला. त्याने भयंकर पाश सोडला. त्या पाशाने दैत्यास पकडून क्षणात गणेशाकडे आणले. श्वास कोंडल्यामुळे हात-पाय आपटीत तो दैत्य खाली कोसळला व डोळयांवाटे त्याचे प्राण निघून गेले.

मुले आनंदात उडया मारत होती. इतक्यात अंडयास पंखाखाली घेऊन बसलेली विनता त्यांच्या दृष्टिस पडली. त्यांना पाहताच तिही त्यांच्यावर धावून गेली. विनता त्यांचा पाठलाग करु लागली हे पाहून गणेश वृक्षाच्या ढोलीस लपून बसला, इतक्यात त्याला ते अंडे दिसले. त्याने ते हातात घट्ट धरले. त्यामुळे ते फुटून त्यातून नील कंठाचा पक्षी(मयुर) बाहेर येताना दिसला. गणेशाने त्याचे पंख धरले. दोघांत युद्ध झाले. तो पक्षी चोचीने प्रहार करु लागला. त्याची चिकाटी पाहून गणेशाने शेवटी चारही आयुधांनी त्याच्यावर प्रहार केला पण ती भूतळीच पडली. तेव्हा तो पक्षी इतर बालकांना घेऊन पळाला. नंतर गणेशाने त्यांना सोडविले व तो स्वत: त्या पक्षावर बसला व त्या पक्षास वश करुन घेतले. मग तो पक्षावर बसून विनताजवळ आला.
ते पाहताच विनता म्हणाली, "देवा, ज्या अर्थी तू हे अंडं फोडलंस, त्या अर्थी हा माझा पुत्र तुझं वाहन होईल. हा सर्पांचा संहार करुन माझ्या इतर पुत्रांना बंधमुक्त करील. माझ्या पतीनंच हे भविष्य वर्तवलं आहे. तेव्हा गणेशा तू याला साह्य कर. कार्य सिद्धीस ने. याच्या नावासह तुझ्या नावाचा उच्चार व्हावा असा याला वर दे."

विनतेच्या इच्छेनुसार गणेशाने तिला वर दिला आणि यापुढे आपल्याला मयुरेश्वर असे म्हणावे असे बालकांना सांगितले. नंतर त्या पक्षावर म्हणजेच मयुरावर आरुढ होऊन मयुरेश्वर आपल्या आश्रमात आला.

2 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

कथा मस्त होती, तुझ्या खजिन्यातून पुराणातले खूप नवनविन वाचायला मिळते.

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री, गणेशासंदर्भात नव-नविन माहिती जाणून घेणे व आपल्याकडे असलेल्या माहितीत भर घालणे या प्रेरणेनेच आपण सर्वजण या ब्लॉगकडे पाहत असतो. याच धर्तीवर 'ओंकारगणेशा' या ब्लॉगचा श्रीगणेशा झालेला आहे...

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters