ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

मोदकप्राप्ती व सर्व देवतांमध्ये गणेशास अग्रपूजेचा मान...

गणेश पूजेची प्रथा सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळी प्रचलित झाली असे म्हणतात.  सर्व देवतांच्या पूजेमध्ये किंवा कोणत्याही शुभकार्यामध्ये प्रारंभी गणेशपूजन केले जाते. म्हणजेच विद्यारंभ, विवाह व इतर संस्कारांच्या वेळी प्रवेश, यात्रा, संग्राम आणि संकटकाळी जो विघ्नेश गणपतीचे पूजन किंवा स्मरण करील त्याची विघ्ने दूर होतील असे सांगण्यात आले आहे. पद्मपुराणामध्ये एकसष्टाव्या अध्यायात गणेशास अग्रपूजाचा मान कसा मिळाला व त्यास मोदक का आवडतात याविषयी एक कथा आढळते. ही कथा महर्षी  व्यासांनी आपला शिष्य संजय यांस सांगितली आहे : 

एकदा सर्व देवांनी विशेष श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला, आनंददायक असा एक दिव्य मोदक पार्वतीस दिला. तेव्हा पार्वतीच्या दोन्ही मुलांनी (गणेश व स्कंद म्हणजेच कार्तिकस्वामी) 'मला तो मोदक दे' म्हणून पार्वतीकडे हट्ट केला. तेव्हा चकित होऊन पार्वती म्हणाली, "बाळांनो, हा महाबुद्धी नावाचा मोदक देवांनी दिला आहे. हा अमृतापासून निर्माण केला असून याचा गुणधर्म मी तुम्हाला सांगते. याच्या केवळ वासाने निश्चितपणे अमरत्व येते. तो खाणारा सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ होतो. सर्व शस्त्रास्त्रविद्यापारंगत होऊन, सर्व तंत्रात निपुण होतो. तसाच तो लेखक, चित्रकार आणि ज्ञानविज्ञानतत्त्ववेत्ता होऊन सर्वज्ञ होतो, यात शंका नाही. तरी तुम्हा दोघांपैकी जो जास्त धार्मिकता मिळवून शंभर सिद्धी प्राप्त करील त्यालाच मी हा मोदक देईन आणि हे तुमच्या पित्यासही मान्य होईल."

हे ऐकताच स्कंद मोरावर बसून जगातील सर्व तीर्थांना जाऊन स्नान करुन एका क्षणात परत आला. बुद्धिवान गणेशाने मात्र आईवडिलांना श्रद्धेने प्रदक्षिणा घातली आणि तो वडिलांच्या पुढे येऊन उभा राहिला. इतक्यात स्कंदही तेथे आला आणि म्हणाला, "मला मोदक दे, मी सर्व तीर्थयात्रा करुन आलो आहे." 

यावर पार्वती म्हणाली, "सर्व तीर्थात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व प्रकारची यज्ञयागादिक व्रते, नाना प्रकारचे यमनियम, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाएवढेही होऊ शकत नाही. तेव्हा, शंभर पुत्रांपेक्षाही हा गणेश श्रेष्ठ आहे, कारण त्याने आईवडिलांची पूजा केली आहे. त्यामुळे त्यालाच मी हा मोदक देते. यामुळेच त्याला यज्ञयागात, वेदशास्त्रादी स्तवनात, नित्य पूजाविधानात प्राथम्य मिळेल." शंकरही म्हणाले, "गणेशाच्याच प्रथम पूजनामुळे देव, देवता, पितर यांना संतोष होईल." त्यामुळेच सर्व यज्ञयागादि क्रियात गणेशाची प्रथम पूजा करतात व त्याच्या पूजनाने सर्व सिद्धी प्राप्त होतात.




मोदकाचा आकार नारळासारखा असून ते महाबुद्धीचे व ज्ञानाचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. 'मोद' म्हणजे आनंद व 'क' म्हणजे छोटासा भाग. याचाच अर्थ मोदक म्हणजे आनंदाचा छोटासा भाग होय. प्रादेशिक भिन्नतेमुळे मोदकाचे विविध प्रकार झाले असले तरी मोदकाचे वरील आवरण सारखेच असते. केवळ त्यातील सारणांमध्ये विविधता आढळते.

3 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

हाय शितल, बरेच दिवस मी वाट पहात होते कि प्रशियस माहिती वाचायला तू दिली नाहीस. थॅक्स अ लॉट की तू ती माहिती दिली. मोदकाचा अर्थ समजला. तसेच आई वडीलनांना जर गणेश इतके मानतो तर मग आपण सुध्दा आईवडीलांचा अधिक आदर केला पाहिजे. यापूर्वी करत होतो पण आता तो अधिक अर्थपूर्ण होईल त्याची महती अधिक वाढली.
मोदक सुध्दा खूप आकर्षक आहेत. अगदी खवेसे वाटतात. घरी जावून उदया करते.
अशीच नवनवीन माहिती देत रहा. आभारी आहे.

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री, तुमच्यासारखे जिज्ञासू वाचक व मार्गदर्शक लाभल्यानेच आपल्या ब्लॉगवरील माहितीत सातत्याने भर पडून दिवसेंदिवस ब्लॉग अधिकाधिक समृद्ध होत आहे.

आणि हो, मोदक केल्यानंतर ते एकटयानेच खायचे नसतात बरं का!

Rajashri Nimbalkar म्हणाले...

अर्थातच, शितल मोदक तुला दिल्याशिवाय त्याला पूर्णत्व येणारच नाही

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters