ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

साडेतीन पीठे...

सध्याच्या काळात ज्याच्या केवळ आराधनेने मनाला उभारी येऊन मनाची ताकद वाढते, आत्मविश्‍वास निर्माण होतो, दु:ख विसरले जाऊन आत्मबल वाढते व प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची किंवा मात करता न आल्यास ती सहन करण्याची शक्ती निर्माण होते असा सुखकर्ता - दु:खहर्ता  श्रीगणेश जास्तच लोकप्रिय झाला आहे. यामुळे दरवर्षी कोट्यावधी गणेशभक्त्‍ा अष्टविनायक, गणेशाची साडेतीन पिठं व पुराणोक्त गणेश यांची मोठ्या भक्तिभावाने यात्रा करताना आढळतात.

श्रीगणेशाची साडेतीन पिठे खालीलप्रमाणे :

१) मोरगावचा मयुरेश्वर
ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी मोरगावला तप केले तेव्हा आदिशक्तीस्वरुप श्रीगणेशाने त्यांना दर्शन दिले. त्यांच्या प्रार्थनेनुसार गणेशाने त्या क्षेत्रात वास्तव्य करुन त्याला श्रेष्ठत्व देण्याचे मान्य केले. या पंचदेवतांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली. येथे राहून जे पुरश्चरणादि करतील त्यांना मायाबंधनांची व विघ्नांची भीती मुळीच राहणार नाही असा गणेशाने आशीर्वाद दिला. 

२) राजूरचा महागणपती
जालना जिल्ह्यातील राजूर येथे 'वरेण्य' नावाच्या राजाचा मोठा वाडा होता, त्याच्या आसपासच्या वस्तीला राजापुरी व पुढे राजूर म्हणू लागले. या वाडयाच्या आजूबाजूस दंडकारण्य होते व ऋषिमुनी येथे तपस्या करीत. वरेण्य राजाला मूल नव्हते तेव्हा त्याने तेथेच तपस्या केली व गणेशाने स्वत: त्याच्या पत्नीच्या पोटी जन्म घेतला. पण या मूलाची आकृती काही विचित्र होती. म्हणून राजाने त्याला टाकून दिले. ऋषिमुनींनी या मुलाचे संगोपन केले. या काळी त्या भागात सिंदूरासूर फार मातला होता. त्याचे पारिपत्य करण्याचे कर्तव्य या मुलाकडे म्हणजे गणेशाकडे आले व त्याने याचा शिरच्छेद करुन ते पार पाडले व प्रजेला निर्भय केले. त्यामुळे राजाला आपली चूक कळून येऊन तो गणपतीला शरण आला. गणपतीने त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या निरंतर सनिद्ध राहण्याचे मान्य केले. तोच हा राजूरचा गणपती.येथे श्रीगणेशाचे अतिभव्य मंदीर असून मंदिरामध्ये हजारो समयांचा अखंड नंदादीप तेवत असतो. सतत तेवणा-या समयांच्या मंद प्रकाशात देवाचे दर्शन होते.या  मंदीरात श्रींच्या मूर्तीसमोर वेरण्य राजाची मूर्तीही स्थापन करण्यात आलेली आहे.  

३) चिंचवडचा मंगलमूर्ती
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील 'शाली' नावाच्या गावचे वामनभट व पार्वतीबाई हे दांपत्य मोरगावला आले. या दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान केले. त्यांना माघ वद्य चतुर्थी शके १२९७ मोरगावला श्रीगणेशकृपेने मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी 'मोरया गोसावी' ठेवले. नयनभारती यांच्याकडून अनुग्रह घेतलेले मोरया गोसावी थेऊरला अनुष्ठानासाठी आले. तिथे त्यांना मुळा-मुठेच्या नदीत स्नान करताना श्रीगणेशाचा साक्षात्कार होऊन श्रीगणेशमूर्तीचा प्रसाद मिळाला. नंतर ते चिंचवडजवळ थेरगावला किवंजाई देवीच्या मंदिरात आले व तेथून लोकग्रहाने चिंचवडला आहे. त्यांच्यामुळे चिंचवड हे श्रीगणेशक्षेत्र प्रसिद्धीला आले. आजही तिथे त्यांची संजीवनी समाधी आहे. 

४) पद्मालयचा प्रवाळ गणेश (अर्धपीठ)
 
जळगावपासून १५ कि.मी. एरंडोलजवळ 'पद्मालय' हे तीर्थ असून ते श्रीगणेशाचे अर्धपीठ आहे. मंदिराच्‍या गाभार्‍यात आमोद व प्रमोद अशा गणरायाच्‍या उजव्या व डाव्या सोंडेच्या  दोन मूर्ती आहेत. (१) हात-पाय नसलेल्या 'कार्तवीर्य' नावाच्या गणेशभक्ताने श्रीगणेशाची आराधना केली तेव्हा त्याला उजव्या सोंडेच्या श्रीगणेशाने दर्शन दिले. गणेशकृपेने कार्तवीर्याचे अपंगत्व नाहिसे झाले.  (२) माझ्यामुळे भगवान शंकराला शांती लाभली' असा शंकराच्या गळयातल्या नागाला गर्व झाला तेव्हा शंकराने तो नाग गळयातून फेकून दिला. नागाने शंकरप्राप्तीसाठी श्रीगणेशाची आराधना केली तेव्हा डाव्या सोंडेच्या गणपतीने त्याला दर्शन दिले. श्रीगणेश कृपेने शंकराने नागाचा स्वीकार केला. या दोन घटना पद्मालय येथे घडल्या. येथील तळयात कमळाची फुले असल्याने याला 'पद्मालय' असे म्हणतात.  

4 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

शितल, साडेतीन शक्तीपिठे वाचली, आवडली. मला फक्त देवीची साडेतीन शक्तीपिठे असतात असे वाटले होते. पण ग्‍ाणेशाची सुध्दा साडेतीन शक्तीपिठे आहेत हे आत्ताच कळले. त्याबददल धन्यवाद. तसेच साडेतीन शक्तीपिठांपैकी एक अगदी आपल्या जवळ आहे पण कधी जाणे झाले नाही. परंतु आता मात्र नक्की जाण्याचा प्रयत्न करणार.

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री,

आपल्या जवळच्या शक्तीपिठाला गेलात की तिथला फोटो मात्र आपल्या संग्रहासाठी नक्की घेऊन या.

Rajashri Nimbalkar म्हणाले...

हो शितल नक्की घेवून येणार. बघुयात बाप्पा मला कधी बोलावतात .

Prasad Maharao म्हणाले...

शनि चा सुध्दा आहेत ,त्यापैकी एक उज्जैन ( मध्ये प्रवेश ) व बाकी महाराष्ट्रा मध्ये आहे

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters