पूर्वी सह्याद्रीपर्वतावरील महाबलक्षेत्री शंकर गिरीजा, आपले गण
आणि मुनींसह राहत होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पितामह ब्रह्मदेव
आपल्या दोन पत्नींसह तिथे आले. शंकरांचे दर्शन घेऊन त्यांनी यज्ञ करण्याची इच्छा प्रकट करताच शंकरांनी सर्व ऋषीमुनींना पाचारण केले. ब्रह्मदेवांच्या दोन पत्नीपैकी
सावित्री गृहकार्यात मग्न असल्यामुळे तिला बरोबर न घेता एकटया गायत्रीसह
ब्रह्मदेवाने यज्ञाला आरंभ केला. परंतु आरंभी गजाननाच्या पूजेस ते विसरले.
तेवढयात सावित्री मंडपात आली. आपल्याला बरोबर घेतल्याशिवाय पतीने यज्ञाला
आरंभ केला म्हणून तिला फार राग आला. ती सभासदांना उद्देशून म्हणाली, "माझा
अनादर करुन तुम्ही यज्ञाला प्रारंभ केला, म्हणून तुमचा हा यज्ञ सिद्धीस
जाणार नाही, तुम्ही जड व्हाल."
सावित्रीचा हा शाप ऐकून सारेजण भयभीत झाले. ते म्हणाले, "आम्ही 'जड'
म्हणजे अचेतन न होता 'जल' होतो." सावित्रीने "ठीक आहे" असे म्हणताच सर्व
देवांची रूपे पालटून ते उदकरुप नद्या झाले. कृष्ण कृष्णानदी झाला, महेश्वर
वेणी नावाची नदी झाला. सर्व देव त्या त्या नावांच्या नद्या झाले. सारांश
कोणत्याही कर्मारंभी गजाननाचे पूजन केले नाही तर विघ्ने येतात.
यज्ञात विघ्न आले म्हणून ब्रह्मदेव मोठया चिंतेत पडले. माझ्यामुळे सर्व
देव नद्या झाले, सर्व लोकांच्या दूषणास मी पात्र झालो, असे त्यांना वाटू
लागले. या संकल्पाआड आलेले विघ्न मी कसे पार करायचे याची त्यांना चिंता
वाटू लागली. आता त्या देवासच प्रसन्न करुन घेतल्याशिवाय इलाज नाही असा
निश्चय करुन कार्यास सुरुवात करणार इतक्यात देवांच्या स्त्रिया
ब्रह्मदेवाजवळ आल्या.
पैकी गिरिजा, छाया, पुलोमजा, कमला इत्यादी स्त्रिया ब्रह्मदेवांना म्हणाल्या, "तूम्ही यज्ञास आरंभ केलात व त्या मान्य देवताची प्रथम पूजा केली नाहीत, हे विस्मरण आपणास कसे झाले? आता आम्ही या जलरुप पावलेल्या देवांचं काय करायचं? तुम्हांसच आता आम्ही शरण आलो आहोत." त्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "भिऊ नका. मी यज्ञ करतो म्हणजे सर्व शुभ होईल. एकदा गजाननास प्रसन्न करुन घेतले म्हणजे भक्तीस काय कमी? तुम्हीही सर्वजण त्याची भक्ती करा म्हणजे तो तुमचं प्रिय करील."
पैकी गिरिजा, छाया, पुलोमजा, कमला इत्यादी स्त्रिया ब्रह्मदेवांना म्हणाल्या, "तूम्ही यज्ञास आरंभ केलात व त्या मान्य देवताची प्रथम पूजा केली नाहीत, हे विस्मरण आपणास कसे झाले? आता आम्ही या जलरुप पावलेल्या देवांचं काय करायचं? तुम्हांसच आता आम्ही शरण आलो आहोत." त्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "भिऊ नका. मी यज्ञ करतो म्हणजे सर्व शुभ होईल. एकदा गजाननास प्रसन्न करुन घेतले म्हणजे भक्तीस काय कमी? तुम्हीही सर्वजण त्याची भक्ती करा म्हणजे तो तुमचं प्रिय करील."
अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी सांगितल्यावर त्या देवस्त्रिया दूरवर
कर्नाटकात गेल्या कारण पूर्वी 'वक्रतुंड' या नावाने गजाननाची त्या ठिकाणी
स्थापना करुन रामाने रावणावर विजय मिळविला होता. त्या देवपत्नी या ठिकाणी
येऊन घोर तपश्चर्या करु लागल्या. त्यांना विनायक संतुष्ट झाला. त्यांनी
त्याला दुर्वा समर्पित करुन धूप, दीप, सुवर्णदक्षिणा अर्पण करुन
मंदारपुष्पे आणि शमी वाहिली. चतुर्भुज, किरीट-कुंडलांनी युक्त असे गजाननाचे
रुप पाहून आनंदित झालेल्या स्त्रियांनी त्याची स्तुती केली. मग गजानन त्यांनी म्हणाला, "सावित्रीने जो शाप दिला आहे तो मला सर्वथा खोटा
करता येणार नाही. यासाठी सर्व देवांनी अंशरुपाने का होईना नद्यांच्या ठायी
राहावं आणि अंशरुपाने पूर्वीचं स्वरुप धारण करावं."
गजाननाच्या मुखातून हे शब्द निघताच अंशरुपाने पुन्हा देवत्व पावलेले
सर्व देव तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, "गजानना, आम्ही तुझं पूजन
केल्यावाचून आणि मानानं थोर असलेल्या सावित्रीला योग्य तो मान दिला नाही,
याबद्दल आम्हांस क्षमा कर."
सर्व देवांनी गजाननाची शमी वाहून पूजा केली. गजानन अंतर्धान पावले.
देवांनी सुंदर पाषाणाची मूर्ती तयार करुन तिचे 'हेरंब' असे नाव ठेवले.
ब्रह्मदेवाने तेथे आणखी बारा वर्षे तप केले. गजाननाला अशारितीने संतुष्ट
करुन घेऊन आण इच्छिलेला यज्ञ समाप्त केला.
------- ###### ---------
हेरंब गणेश - हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता / पालक होय.

4 comments:
शितल, नद्यांना देवांची नावे कशी मिळाली हे वाचून फार आनंद झाला. फारच सुंदर कथा आहे ही. यात उल्लेख केलेली वेणी नदी हे नाव कदाचित वेण्णा नदी असावी कारण सातारा जिल्हयात एक वेण्णा नदी आहे.माहिती उपलब्ध करुन दिल्याबददल धन्यवाद.
मंदार पुघ्पे म्हणजे कोणती फुले याबाबत माहिती दिली तर मी आपली आणखी आभारी राहीन
धन्यवाद राजश्री! यात उल्लेखिलेली वेणी नदी म्हणजेच तुम्ही म्हणताय तीच वेण्णा नदी होय.
महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा संगम होतो.शिवाय कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम श्री क्षेत्र माहुली येथे होतो ज्याला 'हरीहर संगम' असे म्हणतात.
संथ वाहणारी कृष्णा आणि वेगवान कोयना यांचा संगम क-हाड येथे होतो ज्याला 'प्रीती संगम'असे म्हणतात.
लवकरच मंदार महात्म्यही ब्लॉगवर प्रकाशित केले जाईल.
वा.. वा किती छान नद्यांच्या संगमांना कोणती नावे आहेत हेही समजले.
टिप्पणी पोस्ट करा