मालव देशात वीतीहोत्र नावाच्या नगरात औरव नावाचा एक सूर्यासारखा तेजस्वी
आणि वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण राहत होता. योगसामर्थ्याने तो वस्तु प्राप्त
करी. त्यास सुमेधा नावाची अत्यंत धर्मशील अशी पत्नी होती. दोघेही अत्यंत
नि:स्पृह होते. त्या दांपत्यांना एक कन्या झाली. तिचं नाव शमिका असं ठेवले.
पित्याची ती अत्यंत लाडकी असल्यामुळे तो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करीत
असे. ती रुपवती कन्या सात वर्षांची झाल्यावर औरव तिच्यासाठी वर पाहण्यास
गेले.
मंदार नाव असलेला धौम्यऋषिंचा पुत्र व शौनक ऋषिंचा शिष्य
वेदवेदांगशास्त्रात प्रवीण असून गुरुभक्त आहे असं त्यांनी ऐकलं होतं. त्या
मंदारला शुभमुहुर्तावर आपली कन्या देऊन त्या उभयतांची त्यांनी आनंदाने
पाठवणी केली. नंतर मंदार आपल्या आश्रमात येऊन आनंदानं संसार करु लागला.
काही काळ लोटल्यानंतर गजाननाचा परमभक्त भ्रृशुंडी त्या आश्रमात आला.
भ्रुशुंडीचे पोट मोठे होते व देहाकारही स्थूल होता. शिवाय त्याला
हत्तीप्रमाणे सोंड होती. त्याचे हे विलक्षण रुप पाहून मंदार व शमी त्यांना
हसू लागले. आपल्याला पाहून हे दोघे हसले म्हणून भ्रुशुंडीला फार राग आला.
भ्रुशुंडींनी त्या दोघांना शाप दिला की, "मला तुम्ही हसलात म्हणून तुम्हाला
वृक्षयोनी प्राप्त होवो व तुमच्या आश्रयाला पक्षी सुद्धा न येवोत." लगेचच
त्या पतिपत्नींचे रुपांतर वृक्षात झाले. मंदार ब्राह्मणाचा मंदारवृक्ष झाला
तर शमीबाई शमीचे झाड झाली. त्या दोन्ही वृक्षांना अत्यंत काटे असल्यामुळे
त्यांच्याजवळ कोणी पशुपक्षीही जाईनात. या गोष्टीस एक महिना लोटला.
नेहमीप्रमाणे आपला शिष्य आपल्या भेटीस आला नाही या गोष्टीचे शौनकांना
आश्चर्य वाटले. आपल्या शिष्यांसह मंदारचा शोध घेण्यासाठी तो औरवांच्या घरी
आला. त्यांना मंदाराची वार्ता विचारली. पण तेथेही मंदारचा ठावठिकाणा लागला
नाही. शौनक आणि औरव यांना फार काळजी वाटू लागली. त्यास चोरांनी लुटले,
श्वापदांनी मारले की सर्पदंशानं मृत्यू आला अशा अनेक प्रकारच्या शंका
त्यांच्या मनात येऊ लागल्या. शेवटी शौनकांनी आपली ज्ञानदृष्टी जागृत केली
आणि मंदारचा शोध घेतला. त्यावेळी भ्रुशुंडींच्या शापाने त्या दोघांस
वृक्षत्व प्राप्त झाले आहे हे त्यांना समजले. मग शौनकाने आपल्या शिष्यासाठी
आणि औरवाने आपल्या मुलीसाठी गजाननाच्या षडाक्षर मंत्राचा जप करुन १२ वर्षे
तपश्चर्या केली.

त्यावर गजानन म्हणाले, "ब्राह्मणांनो, असंभवनीय असा वर
मी कसा देऊ? मी भक्तांचं वचन पूर्ण करणारंच. मी संतुष्ट झालो आहे म्हणून
तुम्हांस वर देतो. आजपासून मी मंदारवृक्षाच्या खाली निश्चल राहिन. हा वृक्ष
मृत्यूलोकी आणि स्वर्गलोकी मान्य होईल. मंदार वृक्षाच्या मुळांची मूर्ती
करुन जो कोणी शमीची पानं आणि दूर्वा वाहून माझी पूजा करील तो महापुण्यवान
होईल. कारण या तिघांचा संयोग या भूलोकावर दुर्लभ आहे. मुनींनो तुमच्या
वचनांना अनुलक्षून अतिदुर्लभ असा हाच वर या वृक्षांना मी दिला आहे.
भृशुंडींचं वचन मात्र खोटं होणार नाही. दुर्वांच्या ऐवजी मंदार व दोन्ही
उपलब्ध नसतील तर मला शमी प्रिय होईल. दोघांचंही फल एकटी शमी देईल. एकटया
शमीच्या समर्पनानं जे पुण्य लाभतं ते नाना यज्ञांच्या योगानं, नाना
तीर्थांच्या योगानं व नाना व्रतांच्या योगानं मिळत नाही. शमी व्यतिरिक्त
मला काहीही अर्पण केलं तरी मी प्रसन्न होणे संभव नाही."

गजाननाने सांगितल्याप्रमाणे शौनकही मंदाराच्या मुळाची सुंदर गणेशमूर्ती करुन मंदाराची फुले, शमीची पाने आणि दुर्वा वाहून गजाननाची पूजा करु लागले. तेव्हा अत्यंत संतुष्ट झालेल्या गजाननाने त्यांना वर दिला व तेव्हापासून गजाननास शमी प्रिय झाली. मंदाराच्या मुळांपासून तयार झालेला मांदारगणेश भक्तांना लवकर प्रसन्न होतो.
2 comments:
किती सुंदर कथा आहे की. शिवाय मंदार वृक्ष कोणता तेही समजले. ही फुले मी बरयाच वेळेला पाहिली होती पण त्याचे नाव मंदार आहे हे आज कळले.
शितल, खुप खुप आभारी आहे. व शमीचे झाड पाहण्यासाठी आपल्याला एकदा खिंडीतल्या गणतीला जायचे आहे. लक्षात आहे ना!
धन्यवाद!
होय राजश्री आपण लवकरच जाऊयात.
टिप्पणी पोस्ट करा