ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

बल्लाळेश्वर / बल्लाळ विनायकाची कथा...


सिंधू देशात पल्लव नावाचे एक विख्यात नगर होते. त्यात कल्याण नावाचा एक धनवान वैश्य राहत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते इंदुमती. तीही पतीप्रमाणे दानतत्पर आणि धार्मिक होती. त्या उभयतांना एक पुत्र झाला. कल्याणाने ब्राम्हणांना नाना प्रकारचं दान केलं. ज्योतिष्यांच्या सांगण्यानुसार त्याने आपल्या मुलाचे नाव 'बल्लाळ' असे ठेवले.

पुढे बऱ्याच वर्षांनंतर सदैव देवपूजेत मग्न असणारा तो बल्लाळ आपल्या समवयस्क मित्रांसह एकदा आनंदाने गावाबाहेर गेला. खेळत खेळत ते एका वनात गेले. तिथे स्नान करून त्यांनी एका सुंदर पाषाणाची स्थापना केली आणि त्याच्या ठायी गणेशाची भावना करून, दुर्वा फुलांनी त्याची पूजा केली. काही मुले देवाच्या ध्यानात निमग्न झाली तर काही यथेच्छ नाचू लागली. काहींनी लाकडे व पाला आणून मंडप उभारला. भिंती, कोट उभारून मंदिर बांधले. सर्वजण प्रत्यक्ष व मानसोपचारेपूजा करू लागले. काही पंडित वेद, पुराणं, काहीजण धर्मशास्त्र व इतर प्रवचन सांगू लागले. अश्या रीतीने देवभक्तीत त्यांनी तिथेच प्रदीर्घ काळ घालवला. भूक, तहान यांचं भानदेखील त्यांना राहिलं  नाही.

त्या सर्व मुलांचे वडील संतप्त होऊन कल्याणाच्या घरी आले आणि म्हणाले, " तू आपल्या बल्लाळाला आवर  घाल. तो आमच्या मुलांना घेऊन रोज वनात जातो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी भोजनास घरी येत नाहीत. त्यामुळे ते सर्व कृष झाले आहेत. तू तुझ्या मुलास शिक्षा कर, नाही तर आम्ही त्याला बांधून मारू. नगरस्वामीला सांगून तुलाच बाहेर घालवू. "

लोकांच्या या बोलण्याचा राग येऊन कल्याण जास्वंदाच्या फुलासारखे लाल डोळे विस्फारीत मुलाला मार देण्यासाठी हातात सोटा घेऊन निघाला, वनात गेल्यावर सोट्याच्या प्रहाराने त्याने मंडप मोडून टाकला. सर्व मुले चोहीकडे पळाली. एकता बल्लाळच दृढनिश्चयानं तिथंच स्थिर राहीला. कल्याणाने त्याला सोट्याच्या यथेच्छ बडवलं.  त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. वेलीच्या दोरानं झाडास बांधलं आणि तो म्हणाला, "देव आता तुला सोडवील, तोच तुला आता भोजन वगैरे देईल आणि रक्षणही करील. आता जर का घरी आलास तर माझ्या हातून मरशील." 

यानंतर कल्याण घरी गेल्यावर बल्लाळने गजाननाची स्तुती करण्यास आरंभ केला. तो म्हणाला, " देवा, तुझी जे भक्ती करतात, पूजन करतात, त्यांची संकटं तू नाहीसी करतोस, म्हणून तुला विघ्ननाशक असं  म्हणतात. पण मी तुझे पूजन करूनही मला हि शिक्षा झाली, त्याचे काय? शेष कदाचित पृथ्वी टाकील, सूर्य कदाचित किरणांचा त्याग करील, अग्नी उष्णता टाकून देईल, पण तू आपल्या भक्तांचा त्याग करणार नाहीस, अशी वेद, शास्त्रं तुझी ख्याती सांगतात, तेव्हा तू मला कसा विसरशील? अश्या प्रकारे विलाप करून त्याने आपल्या दुष्ट पित्यास शाप दिला कि, ज्यानं देवालय मोडलं, गणेशाच्या मूर्तीस फेकून दिलं व मला मार दिला तो आंधळा, बधीर, कुब्ज व मुका होईल, त्याने माझा देह जखडून ठेवला आहे, पण माझं मन मुक्त आहे. त्या मानाने देवाचं चिंतन करून मी देह सोडीन. "

त्या बल्लाळाची हि निस्सीम भक्ती पाहून श्रीगजानन त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपाने प्रकट झाले. ज्याप्रमाणे सूर्योदयाबरोबर काळोख आपोआप नाहीसा होतो, त्याप्रमाणे गजानन प्रकट होताच बल्लाळाची सारी बंधने गळून पडली. बल्लाळने त्या ब्राह्मणरूपी गजाननास साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या कृपादृष्टीनेच बल्लाळाच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या आणि त्याला उत्तम प्रकारे ज्ञान प्राप्त झाले. त्याने अनेक विशेषणांनी गजाननाची स्तुती केली. 

त्याची स्तुती ऐकून संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला आलिंगन दिले आणि ते म्हणाले, "ज्याने माझं देवालय उध्वस्त केलं तो नरकात पडेल आणि माझ्या आज्ञेने तुझा शापही त्याला लागेल. त्याचा पिता पुढच्या जन्मी त्याला घरातून बाहेर घालवील. आता आणखी तुला काही मागायचे असेल तर माग."

बल्लाळ म्हणाला, "देवा, आपण वर देणारच आहात तर असा द्या की, आपल्या ठिकाणी माझी निरंतर भक्ती जडावी. आपण या क्षेत्री वास करून लोकांची संकटे दूर करावीत. "

गजानन 'अस्तु' असे म्हणाले आणि येथे येणारे भक्त आपल्या नावापूर्वी बल्लाळाचे नाव घेतील आणि त्या स्थानातील विभूतीस 'बल्लाळ विनायक / बल्लाळेश्वर' असे नाव प्राप्त होईल; आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीस जे लोक पाली नावाच्या नगरीत गणेशाची यात्रा करतील त्यांची मनोरथ पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळच असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters