श्री गजाननाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे कार्य सोपविले. तेव्हा ब्रह्मदेवाने 'गौतम', 'जमदग्नी', 'वसिष्ठ', 'भारद्वाज', 'अत्री', 'कश्यप' आणि' विश्वामित्र' या सात मानसपुत्रांची कल्पना केली. हे सातही मानसपुत्र विद्याविशारद होते. यापैकी अत्यंत बुद्धिमान अश्या मानसपुत्रास विविध सृष्टी निर्मितीचे कार्य करण्यास सांगावे असे ब्रह्मदेवाने ठरवले व आपला मानसपुत्र कश्यप यांस हे कार्य सोपविले. त्यानंतर कश्यप तप करण्यासाठी वनात गेला व एक हजार वर्षे गजाननाची तपश्चर्या एकाक्षर मंत्राने करत राहिला. गजाननाने प्रसन्न होऊन त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. मग कश्यपाने तुझ्यासारखा पुत्र मला दे असा वर मागितला. त्याचप्रमाणे नाना प्रकारची सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्यही मागितले. गजाननाने त्यास वर देऊन संकटकाळी मी स्वत: तुझे रक्षण करीन असे सांगितले.
कश्यप
याने दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला होता. प्रजापतीच्या तेरा
कन्या (दिति, अदिति, दनु, विनता, खसा,
कद्रु, मुनि, क्रोधा, रिष्टा, इरा, ताम्रा, इला व प्रधा) व कश्यप ऋषि
यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग, अश्व, गंधर्व, अप्सरा, वृक्ष, मानव
यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाल्याची कथा
ब्रह्माण्ड व भागवत पुराणात सापडते. यथाकाल दितिच्या उदरी दैत्य जन्मले.
अदितीस देव आणि गंधर्व झाले. दनुस दानव झाले. कद्रु हिला वासुकी व शेष हे
नागरुपी पुत्र झाले. तर विनता हिला श्येन, संपाती, जटायू व गरुड असे
पक्षीरुपी पुत्र झाले. याप्रकारे पुढे किन्नर, यक्ष, सिद्ध, चारण, गुह्यक,
अरण्यात राहणारे, गावात राहणारे, पशु, पक्षी, पृथ्वी, पर्वत, वृक्ष,
समुद्र, नद्या, वेली, किडे, मुंग्या, धान्ये, धातू, रत्ने, मोती, वगैरे
प्रकारची अनंत सृष्टी निर्माण झाली.
आपल्यापासून हि अनंत सृष्टी निर्माण झाली हे पाहून कश्यपाला आनंद झाला
आणि त्याने आपल्या पुत्रांपैकी कोणास अष्टदशाक्षर, षोडषाक्षर, द्वादशाक्षर,
अष्टाक्षर, पंचाक्षर, चतुरक्षर, एकाक्षर अश्या मंत्रांचा उपदेश केला.
गजानन प्रसन्न होईपर्यंत तपश्चर्या करण्याचा निश्चय सर्व पुत्रांनी केला.
अनेक देशातील अनेक स्थळात ते गेले आणि आपल्या मंत्राचा जप करू लागले. अश्या
प्रकारे गजाननाची एक हजार वर्षे त्यांनी तपश्चर्या केल्यावर ज्याने जसे
ध्यान केले होते तश्या स्वरुपात गजाननाने त्यांना दर्शन दिले.
गजानन प्रकट होताच सर्व कश्यप पुत्रांनी त्याची स्तुती केली व त्याला
म्हणाले 'आम्ही धन्य झालो. आमची तपश्चर्या, दान, ज्ञान, यज्ञ, पूर्वज, सारं
काही धन्य झालं. आमच्या डोळ्यांचं पारणं गजानन दर्शनाने फिटलं.' यावर
गजानन त्यांना म्हणाला - ' मी निर्गुण निराकार असूनही तुम्ही मला ज्या
सगुण, साकार रुपात पाहत आहात ते रूप यापूर्वी मी ब्रह्मा, विष्णू आणि
महेश्वर यांनाही दाखवले नाही. तुमच्यावर संतुष्ट होऊन तुम्हाला वर
देण्यासाठी मी आलो आहे, तुम्हाला हवं ते मागा.' मग ज्यांना जी जी इच्छा
होती ती ती त्यांनी मागितली. सर्व वर दिल्यानंतर गजानन गुप्त झाले.
१) कश्यप पुत्रांनी गजाननाची सुंदर मूर्ती तयार करून एका भव्य मंदिरात तिची स्थापना केली
व तिचे नाव 'सुमुख' असे ठेवले.
२) काही कश्यप पुत्रांनी या मूर्तीचे नाव 'एकदंत' असेही ठेवले.
३) गंधर्व आणि किन्नर यांनी दुसरी मूर्ती स्थापन केली. सुवर्णाच्या भव्य मंदिरात तिची स्थापना करून
'कपिल' असे तिचे नाव ठेवले.
४) गुह्यक, चारण आणि सिद्ध यांनी निराळीच मूर्ती तयार केली व तिची एका मंदिरात स्थापना करून
'गजकर्ण' असे तिचे नाव ठेवले.
५) सर्व मानवांनी एक मूर्ती तयार करून तिचे 'लंबोदर' असे नाव ठेवले.
६) सर्व श्वापदांनी एक मूर्ती तयार करून त्यांनी तिचे 'विकट' असे नाव ठेवले.
७) पर्वत, वृक्ष यांनी 'विघ्ननाशक' या नावाने एक मूर्ती स्थापन केली.
८) सर्व पक्षीगणांनी रत्ने व सुवर्ण यांची मूर्ती करून बसवली व त्यांनी तिचे नाव 'गणाधिप' असे ठेवले.
९) सर्व विषधरांनी 'धुमकेतू' या नावाची मूर्ती स्थापन केली.
१०) जलाशयात राहणाऱ्यांनी एक शुभ मूर्ती स्थापन करून 'गणाध्यक्ष' या नावाने तिची स्थापना केली.
११) कृमी, कीटक, वनस्पती, औषधी यांच्या समूहांनी 'भालचंद्र' या नावाने मूर्तीची स्थापना केली.
१२) इतर सचेतन प्राण्यांनी 'विनायका' ची स्थापना केली. तीच गजानन या नावाने प्रसिद्ध झाली.
समुद्राचे मंथन करून जशी १४ रत्ने बाहेर काढली तशी हि १२ नावे अस्तित्वात
आली.
गणेश पुराणात सांगितल्याप्रमाणे सर्व कार्यारंभी गजाननाची पूजा करणे
उचित आहे, कारण ते शुभ आहे. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट,
विघ्ननाशक गणाधिप, धुम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, व गजानन हि बारा नावे
विद्येस आरंभ करताना अवश्य उच्चारावीत. विवाहप्रसंगी, गृहप्रवेशप्रसंगी,
घरातून बाहेर पडताना, परगावी जाताना व संकटकाळी जो हि नावे उच्चारतो,
त्याला विघ्नांचा त्रास होत नाही. कोट्यावधी कन्यादाने, कोटी कोटी यज्ञ,
व्रते, सर्व तपे, सर्व तीर्थे, पवित्र स्थळे, हजारो सुवर्णतुला, लाखो दाने,
पराक्रव्रते, चांद्रायने इ. नी होणारी पुण्ये या नामस्मरणापासून होणाऱ्या
पुण्याच्या अंशाने देखील नाहीत.
प्रात:काळी उठून, शुर्चीभूत होऊन शांत मानाने जो मनुष्य याचे भक्तिभावाने
पठन करतो, त्याच्या वाटेला विघ्ने येताच नाहीत, ती दूर पळू लागतात. त्याची
सर्व कार्ये सिद्ध होतात व तो इहलोकीचे सर्व भोग भोगूनही शेवटी मुक्त होतो.
म्हणून ह्या नामांचे स्मरण 'भुक्तीमुक्तीदात्री' आहे. या नामांचे महात्म्य
असे आहे कि, जे दुष्ट आहेत, नास्तिक आहेत, त्यांनी चुकून जरी यातील एका
नावाचा उच्चार केला तरी त्यांच्याही कार्याची सिद्धी होते असा उल्लेख गणेश पुराणात आढळतो.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा