एकदा शंकर पार्वतीच्या मनात गणेश आणि कार्तिक (स्कंद) यांच्या लग्नाचा विचार आला. गणेश आणि स्कंद दोघेही लग्नाला योग्य झाले असून दोघांपैकी प्रथम कोणाचा विवाह करावा हे ठरवण्यासाठी पार्वतीने एक युक्ती शोधून काढली. तिने दोघानाही बोलावून सांगितले कि, " हे पहा बाळांनो, तुम्हा दोघांचेही आम्ही विवाह करणार आहोत. प्रथम कोणाचा विवाह करायचा, यासाठी आम्ही एक पण योजला आहे. तो असा की, जो तुम्हा दोघांपैकी प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करून येईल, त्याचा विवाह प्रथम करावयाचा."
हे ऐकून स्कंद ताबडतोब पृथ्वीप्रदक्षनेसाठी बाहेर पडला, पण गणेश मात्र तिथेच विचार करीत थांबला. थोडा वेळ विचार करून, स्नान करून येऊन तो आपल्या आई वडिलांना म्हणाला, "आपण दोघेजण मी दिलेल्या या आसनावर बस आणि माझी इच्छा पूर्ण करा." मग दोघांना आसनावर बसवून गणेशाने त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या व नमस्कार केला आणि हात जोडून तो म्हणाला, "आता प्रथम माझा विवाह करा."
त्यावर शिव-पार्वती म्हणाली, "अरे, स्कंदाप्रमाणे तुही पृथ्वीप्रदक्षिणेला जावून ये." ते ऐकून गणेशानं रागाने म्हंटले, "तुम्ही दोघे मला धर्मरूप आहात. मी धर्मशास्त्राप्रमाणे सांगतो की, मी सात वेळा पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे." शिव-पर्वतिनी हसून विचारले, "सात द्वीपे असलेली समुद्रवलयांकित पृथ्वी तू केव्हा पार करून आलास? " गणेशाने उत्तर दिले, "तुम्हा दोघांचे पूजन करून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली आहे. माता-पित्याची पूजा करून जो त्यांना स्वेच्छेने प्रदक्षिणा घालतो, त्याला पृथ्विप्रदक्षिणेचे फळ मिळते असे वेदशास्त्रात सांगितले आहे. आणि जो माता-पित्यांना घरी सोडून तीर्थयात्रेला जातो त्याला माता-पित्याच्या हत्येइतकेच पाप लागते. माता-पित्याचे चरणकमल हेच पुत्राचे महातीर्थ आहे, असे वेदशास्त्रे सांगतात. तुम्हाला जर ते मान्य नसेल तर वेदशास्त्र सर्वच मिथ्या होईल, म्हणून माझा विवाह तरी करा किंवा वेदशास्त्रे खोटी आहेत असे तरी ठरवा." गणेशाचा तो युक्तिवाद ऐकून शिव-पार्वती चकित झाले. ते म्हणाले, "पुत्र तू जे म्हणालास ते सर्वथैव योग्य आहे. वेदशास्त्रपुराणांमध्ये जे कथन केले आहे, तेच तू सांगितले आहेस. सर्वार्थाने तू धर्माचेच पालन केले आहेस आणि तुझ्या करण्याला आम्हीही मान्यता दिली आहे." एवढे बोलून त्या दोघांनी गणेशाचा विवाह प्रथम करण्याचा निश्चय केला.
गणेशाचा विवाह करण्याचा निश्चय शिव-पार्वतीने केला आहे, हि वार्ता कळताच विश्वरूप प्रजापतीला/ ब्रह्मदेवाला समजली. सोळा वर्षांच्या गणेशासाठी अनुरूप कन्या सापडेना म्हणून शिव-पार्वती मोठ्या चिंतेत पडले असता नारद मुनी तिथे आले. शंकरांनी त्यांचा आदरसत्कार केला व त्यांना काही दिवस तिथेच राहण्याचा आग्रह करून शंकर म्हणाले, "नारदा, तुझा संचार त्रैलोक्यात होतो. तेव्हा माझ्या अत्यंत देखण्या मुलासाठी एखादी वधू पहा. " त्यावर नारद म्हणाले, "स्वामी, खूप कामे असल्यामुळे मला चार घटकादेखील राहता येणार नाही. पण ब्रह्मदेवाने / प्रजापतीने मला पाठवले म्हणून मी आलो. गणेशाच्या रूपाने अनुसया व शची याही लज्जित होतात. दंडकारण्यातील ज्ञानी अहिल्याही त्यास पाहून शीला झाली. जालंधराची माधवास मोहित करणारी वृंदा नावाची पत्नीही त्याचा रूप पाहून वृक्ष झाली (वृंदावनातील तुळस). तुझ्या मुलाचा प्रभाव, त्याचे लावण्य, वय हे सर्व सिद्धी-बुद्धी देऊ इच्छिणाऱ्या ब्रह्मदेवाने जाणले आहे. तेव्हा दुसरे खूप वर असूनही ते ब्रह्मदेवांच्या मनात उतरले नाहीत. सिद्धी-बुद्धी च्या योगाने तुमचा पुत्र शोभायमान दिसेल."
नारदाच्या या बोलण्याने शंकर- पार्वतीस आनंद झाला. त्यांना त्या मुली योग्य वाटून गणेशाशी त्या दोघींचा विवाह मोठ्या थाटाने झाला. त्या विवाहाला सर्व देवदेवता उपस्थित झाल्या. सर्व ऋषी-महर्षी मोठ्या संख्येनं आले. सर्वांनाच त्या विवाहाने आनंद झाला. काही काळातच गणेशाला सिद्धीपासून क्षेम आणि बुद्धीपासून लाभ नावाचा पुत्र झाला आणि गणेशाच्या संसारात सुखाची परमावधी झाली.
नंतर पृथ्वीप्रदक्षिणा करून स्कंद परत आला. त्याला गणेशाच्या विवाहाची वार्ता समजली, तेव्हा रागावून तपश्चर्या करण्यासाठी तो अरण्यात निघून गेला आणि शेवटी कुमाराच राहिला.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा