ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

चतुर्थी व्रत - बारा महिन्यांचे विधी व त्यांचे महात्म्य (भाग २ )


पुढे चालू :


(८) कार्तिक चतुर्थी - कार्तिक कृष्ण चतुर्थीच्या व्रताला कर्काचतुर्थी व्रत असे म्हणतात. हे व्रत फक्त स्त्रियांसाठीच सांगितलेले आहे. त्या दिवशी स्त्रियांनी स्नान करून चांगली वस्त्रे नेसून गणपतीची पूजा करावी. नंतर पक्वानांनी भरलेली दहा ताटे भक्तिपूर्वक अर्पण करावीत. गणेशाची प्रार्थना करावी. नंतर सुवासिनी स्त्रियांना आणि ब्राह्मणांना ती दहा ताटे वाटून द्यावीत. नंतर रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला विधीपूर्वक अर्ध्य द्यावे आणि भोजन करून व्रत पूर्ण करावे. असा तऱ्हेने हे व्रत १२ किंवा १६ वर्षे केल्यानंतर त्याचे उद्यापन करावे आणि नंतर मग ते सोडून द्यावे किंवा इच्छा असल्यास तसेच पुढे चालू ठेवावे. 

(९) मार्गशीर्ष चतुर्थी -मार्गशीर्ष चतुर्थीपासून एक वर्ष प्रत्येक चतुर्थीला एकभुक्त (एकवेळ जेवण) राहावे. दुसऱ्या वर्षी नक्त (फक्त रात्री एकदा जेवण करणे) करावे. तिसऱ्या वर्षी प्रत्येक  चतुर्थीला अयाचित (न मागता मिळेल त्यावर राहून) वृतीने राहावे आणि चौथ्या वर्षी दिवसभर उपवास करावा. अश्या रीतीने हे व्रत ओळीने चार वर्षे केल्यानंतर शेवटी व्रत-स्नान करावे. त्या वेळी सोन्याची गणेश मूर्ती तयार करावी किंवा ते शक्य नसेल तर जमिनीवर रंगबिरंगी रांगोळ्यांनी कमलपत्रासह कमळ काढून  त्यावर कलश ठेवावा आणि त्या कलशावर तांब्याचे भांडे ठेऊन त्यात अक्षदा घालाव्यात. त्यावर दोन लाल वस्त्रांनी आच्छादलेली गणेशमूर्ती स्थापन करावी. गंध फुलांनी तिची पूजा करावी. गणेशाला लाडवाचा नैवेद्य दाखवून रात्री गायन, वादन, भजन, कीर्तन इ. कार्यक्रम करीत, ऐकत जागरण करावे. पाहत झाल्यावर स्नान करून तीळ, तांदूळ , जव, पिवळी मोहरी, तूप व साखर यांनी युक्त आहुती देऊन विधीपूर्वक  होम करावा. गण, गणाधिप, कूष्मांड, त्रिपुरांतक, लंबोदर, एकदंत, रुक्मदंष्ट्र, विघ्नप, ब्रह्मा, यम, वरुण, सोम, सूर्य, हुताशन, गंधमादी आणि परमेष्ठी ह्या प्रत्येक  सोळा नावाला प्रत्येक  वेळी प्रारंभी 'प्रणव' आणि अंती चतुर्थी, विभक्ती आणि 'नम:' लावून अग्नीमध्ये एक-एक आहुती द्यावी. नंतर 'वक्रतुंडाय हुम ' या मंत्राने १०८ वेळा आहुती द्याव्यात. नंतर यथाशक्ती होम करून पूर्णाहुती करावी. दिक्पालांचे पूजन करून २४ ब्राह्मणांना लाडू आणि खीर यांचे जेवण घालावे. पुरोहिताला दक्षिणा आणि सवस्त गाय  दान करावी, इतर ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. नंतर नमस्कार करून प्रसन्न चित्ताने सर्वांबरोबर जेवण करावे. अश्या तऱ्हेने हे व्रत केले असता मनुष्य इहलोकी उत्तम प्रकारचे भोग भोगू शकतो आणि परलोकी त्याला विष्णूचा लाभ होतो ह्या व्रताला 'वरव्रत' असेही म्हणतात. 

(१०) पौष चतुर्थी - पौष चतुर्थीला भक्तिपूर्वक गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना लाडवाचे भोजन घालून दक्षिणा द्यावी. हे व्रत केले असता मनुष्याला द्रव्यप्राप्ती होते. 

(११) माघ चतुर्थी - (अ) माघ कृष्ण चतुर्थीला 'संकष्टव्रत' म्हणतात. त्या दिवशी व्रत करणाऱ्या मनुष्याने उपवासाचा संकल्प करावा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमपूर्वक राहावे. चंद्रोदय झाल्यावर मातीची गणेशमूर्ती करून तिची पिठावर स्थापना करावी. गणेशमूर्तीबरोबर त्याचे आयुध आणि वाहन असले पाहिजेत असा नियम आहे. अश्या गणेशमूर्तीची स्थापना करून तिची षोडोपचारे विधीपूर्वक पूजा करावी आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा. नंतर तांब्याच्या भांड्यात रक्तचंदन, दर्भ, दुर्वा, फूल, अक्षता, शमीपत्र, दही आणि पाणी एकत्र करून चंद्राला अर्ध द्यावे. त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा :


"गगनार्णवमाणिक्यं चन्द्रं दाक्षायानिपते |
 गृहाणाअर्ध्यं माया दत्तं गणेशप्रतिरुपकं ||"


अश्या प्रकारे गणेशाला अर्ध्य देऊन यथाशक्ती ब्राह्मणांना जेवण घालून आपणही जेवावे. अश्या प्रकारे गणेशाला अर्ध्य देऊन यथाशक्ती ब्राह्मणांना जेवण घालून आपणही जेवावे. अश्या प्रकारे संकष्ट व्रताचे पालन केले असता मनुष्य धन-धान्यांनी समृद्ध होतो. 

(ब) माघ शुद्ध चतुर्थीला 'गौरी व्रत' करतात. त्या दिवशी गनांसहित गौरीची पूजा करावी. या दिवशी विशेषत: स्त्रियांनी कुंद-पुष्प, कुंकू, लाल दोरा, लाल फूल, निरांजन-उदबत्ती, गूळ, आले, पालक, दूध, खीर, मीठ इत्यादिनी गौरीची पूजा करावी. सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी सत्पात्र ब्राह्मणांची पूजा करावी. नंतर सर्वांबरोबर जेवण करावे. काही जण या व्रताला 'ढुण्ढि व्रत' म्हणतात; काही 'कुंड व्रत'; काही 'ललिता व्रत' तर काही 'शांती व्रत' म्हणतात. या तिथीला केलेले स्नान, दान, जप आणि होम हे सर्व गणेशाच्या कृपेने हजारपट होत असतात. 

(१२) फाल्गुन चतुर्थी - फाल्गुन चतुर्थीला 'ढुण्ढिराज व्रत' सांगितले आहे. ह्या वेळी तीळयुक्त मोदकांचे ब्राह्मणांना भोजन घालून आपणही जेवावे. ह्या दिवशी गणेशाची आराधना करताना तिळाचे दान, होम आणि पूजा केली असता मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. ह्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे सोन्याची गणेशमूर्ती बनवून तिची पूजा करून ती ब्राह्मणाला दान द्यावी. कोणत्याही महिन्यातील चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आली असता हे चतुर्थी व्रत केल्याने विशेष फलप्राप्ती होते. 
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters