ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

चतुर्थी व्रत - बारा महिन्यांचे विधी व त्यांचे महात्म्य (भाग १ )


प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात - शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष. दोन्ही पक्षात पौर्णिमा व अमावसेशिवाय इतर तिथींची नावे सारखीच असतात जसे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी (चतुर्थी). चतुर्थी ही सर्वात पहिली तिथी. तिच्यापासूनच मग प्रतिपदा ते पौर्णिमा व अमावास्या या तिथी निर्माण झाल्याने  चतुर्थी ही सर्व तिथींची जननी मानली जाते. 

पूर्वी सृष्टी निर्माण करून प्राणिमात्रांच्या कालधारणेसाठी ब्रह्मदेवानी समाधी लावली असता सर्व तिथींची जननी प्रकृती चतुर्थी त्यांच्या शरीरापासून निर्माण होऊन तिने तप केले. त्यामुळे गणेशाने सर्व तिथींचे मातृत्व व भक्ती देऊन 'माझी जन्मतिथी तूच' असा तिला वर दिला. तेव्हा स्वतःपासून तिने प्रतिपदा ते पौर्णिमा-अमावस्या तिथी निर्माण केल्या. त्यांच्यासह एक वर्षभर तपस्या करून गणेशस्तुती केली आणि शुक्ल-कृष्ण चतुर्थाना सिद्धिदायक वर गणेशाकडून मिळवले. स्वत: गणेश प्रतीपतादी तिथीकडे गेले व सर्व तिथी व्रतयुक्त करून सिद्ध केल्या. त्या व्रतयुक्त चतुर्थ्यांचे विधी आणि महात्म्य खालीलप्रमाणे असून प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाची विशेष उपासना हि अत्यंत शुभ, लाभकारक आणि संकटनाशक  असते :

(१) चैत्र चतुर्थी - चैत्र महिन्यातल्या चतुर्थीला वासुदेवस्वरूप गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना सुवर्णदक्षिणा दिल्यास मनुष्य विष्णुलोकी जातो.

(२) वैशाख चतुर्थी - वैशाख चतुर्थीला संकर्षण गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना शंख दान दिल्यास तो मनुष्य संकर्षणलोकी जातो.

(३) जेष्ठ चतुर्थी - जेष्ठ महिन्यातल्या चतुर्थीला प्रदुम्नरुपी गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना  फळफळावळ दान दिले असता मनुष्यास स्वर्ग प्राप्त होतो. जेष्ठ चतुर्थीचे दुसरे एक व्रत आहे त्याला सतीव्रत म्हणतात. स्त्रियांनी हे व्रत केले असता त्या पर्वतीलोकी जातात. 

(४) आषाढ चतुर्थी - आषाढ चतुर्थीला अनिरुद्धस्वरूप  गणेशाची पूजा करून संन्याशांना कमंडलू दान दिले मनुष्याची इच्छा पूर्ण होते. आषाढी चतुर्थीचे दुसरे एक व्रत आहे, त्या दिवशी मनुष्याने श्रद्धापूर्वक अंतकरणाने विधीपूर्वक गणपतीची पूजा केली असता अतिशय दुर्लभ अशी फलप्राप्ती होते. 

(५) श्रावण चतुर्थी - श्रावण चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीला अर्ध्य द्यावे आणि गणपतीचे ध्यान करावे. नंतर गणपतीची विधीपूर्वक  पूजा करावी आणि त्याला लाडवाचा नैवेद्य दाखवावा. मग प्रसाद भक्षण करून रात्री गणपतीची पूजा करावी. हे व्रत केल्यामुळे मनुष्याची मनोकामना पूर्ण होते. 

(६) भाद्रपद  चतुर्थी - (अ) भाद्रपद कृष्ण चतुर्थीच्या दिवशी बहुला गणेशाची (बहुला गायारूपी गणेशाची) गंध, माळ, गवत इ. वस्तूंनी पूजा करावी. नंतर आपल्या शक्तीप्रमाणे दान करावे. ते शक्य नसेल तर बहुला गायरुपी गजाननाला नमस्कार करून त्याचे विसर्जन करावे. याप्रमाणे पाच, दहा, किंवा सोळा वर्षांपर्यंत हे व्रत करावे व नंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्या वेळी दूध देणाऱ्या गाईचे दान करावे. या व्रताने मनुष्य गोलोकी जातो. 

(ब) भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक व्रत करावे. त्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक  पूजा करून सिद्धिविनायकाचे ध्यान करावे आणि भक्तिपूर्वक गणेशाची २१ नावे घेऊन पुढील २१ प्रकारची पत्री त्याला अर्पण करावी - शमीपत्र, बिल्वपत्र, दुर्वादल, बोरीचे पान, धोत-याचे फुल, तुलसीदल, वालाचे पान, आघाडा, रिंगनीचे पान, सिंदूर वृक्षाचे पान, दालचिनी, अगस्त्याचे पान, कन्हेरीचे पान, दगडफूल, रुईचे पान, अर्जुन वृक्षाचे पान, देवदाराचे पान, मारावा, गांधारी पत्र, केतकीचे पान. नंतर दोन दुर्वा घेऊन त्या गंध, फुल आणि अक्षता यांसह गणेशाला वाहाव्यात. असा पद्धतीने भक्तिपूर्वक पूजा करून गणेशाला पाच लाडवांचा नैवेद्य दाखवावा आणि आचमन करून गणेशाला नमस्कार व प्रार्थना करून त्याचे विसर्जन करावे. नंतर करवा साहित्यासाहित गणपतीची ती सुवर्ण प्रतिमा ब्राह्मणाला दक्षिणेसह अर्पण करावी. असे ५ वर्षांपर्यंत गणेशाची भक्तिपूर्वक पूजा आणि उपासना केली तर मनुष्य परलोकी जाऊन सुखी होतो. ह्या चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघू नये, चंद्राकडे जर बघितले तर खोटा आरोप येतो. जर चुकून त्या दिवशी चंद्राकडे बघितलेच तर त्याचा दोष लागू नये म्हणून पुढील श्लोक म्हणावा :


 "सिंह: प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हत:|
  सुकुमारक मा रोदीस्तव हृयेष स्यमन्तक:  ||"


(७) अश्विन चतुर्थी - अश्विन शुक्ल चतुर्थीच्या दिवशी षोडोपचारे कपर्दीश विनायकाची पूजा करावी. ही पूजा पुरुषांनी करावी असा उल्लेख आढळतो. 
[क्रमश:]
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters