ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

भक्तीचे महात्म्य...


ब्रह्मदेवांनी व्यास मुनींना सांगितलेले भक्तीचे महात्म्य

सर्वज्ञ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा तो गणेश केवळ भक्तीमुळे संतुष्ट होतो. भाव हेच गणेशाच्या संतोषाचे कारण आहे. भक्तीने समर्पित केलेल्या पानांफुलांमुळे  संतुष्ट झालेला गणेश हा त्या भक्ताला स्वत:च समर्पित होतो.  पण दंभाने, अहंकाराने, दुस-याने केले म्हणून समर्पित केलेल्या मोठ्या संपत्तीने, दानाने तो कधीच संतुष्ट होत नाही. सहज प्राप्त झालेल्या आणि प्रसंगपरत्वे मनात दृढ भाव धरुन समर्पित केलेल्या शमीच्या एका पानाने प्रसन्न होऊन गणेशाने व्याधास सलोकतामुक्ती दिली आणि म्हणूनच सर्वात भक्ती हेच श्रेष्ठ साधन आहे.


शमीच्या एका पानाने व्याधाचा उद्धार कसा झाला ते पाहू :

पूर्वी विदर्भदेशात आदिषा या नावाचे एक प्रख्यात नगर होते. त्या नगरात भीम नावाचा एक व्याध म्हणजे पारधी राहत होता. तो बाणांनी भरलेला भाता, हाती धनुष्यबाण आणि तलवार घेऊन शिकारीसाठी जात असे आणि जंगलातील प्राण्यांना मारुन त्यांचे मांस विकत असे. निर्जन वनात तो दृष्ट ब्राह्मणांचीही हत्या करीत असे.

एकदा त्या नगरात मोठा उत्सव सुरु झाला होता. तेव्हा भरपूर मांस मिळवून भरपूर कमाई करावी या हेतूने तो पहाटेच वनात गेला आणि अनेक हरिणांच्या कळपाची हत्या करु लागला. खूप मांस एकत्र करुन त्याचे ओझे घेऊन तो नगरात येत असताना त्याला एक मोठा राक्षस आडवा आला. त्याचे नाव पिंगाक्ष होते. कितीही खाल्ले तरी त्याची तृप्ती होत नसे. मनुष्ये व श्वापदे हा त्याचा आवडता आहार होता. त्याला पाहताच तो व्याध थरथर कापू लागला व भयाकूल होऊन भूमीवर पडला. हातांतील शस्त्रे गळून पडली. नेत्र मिटून घेतले. पण बळेच डोळे उघडून त्याने पाहिले असता, त्याला जवळच एक शमीचा वृक्ष दिसला. तो त्या वृक्षावर चढला. राक्षसही चढू लागला. पण व्याधाने त्या वृक्षाची एक फांदी तोडली. तितक्यात शमीचे एक पान त्या झाडाखाली वामनाने स्थापिलेल्या गजाननाच्या मस्तकावर पडले. त्यामुळे गजानन संतुष्ट झाला. मागे बळीस जिंकण्याची इच्छा करणाऱ्या कश्यपपुत्र वामनास वर देण्याकरिता हा गजानन या शमी वृक्षाखाली प्रकट झाला होता. शमीचे पान गजाननाच्या मस्तकावर पडताच गजाननाला असे वाटले कि व्याध व राक्षस यांनी आपली पूजाच केली आहे.

दुर्वा आणि शमीपत्रे यांनी देव संतुष्ट होतो. मनुष्याने भारी वस्त्रे, सुवर्ण, रत्ने यांनी पूजा केली तरी दुर्वा आणि शमीपत्रांवाचून ती व्यर्थ ठरते. केवळ दुर्वा आणि शमीपत्रही त्याच्या संतोषासाठी पुरेसे ठरते. अशा रीतीने केवळ शमीपत्र आपातत: देवाच्या अंगावर पडल्यामुळे संतुष्ट झालेल्या देवाने आपल्या गणेशलोकाहून आपलेच रूप धारण करणाऱ्या एका किंकरासह विमान पाठवले. अग्नीच्या केवळ स्पर्शाने गवताचे पर्वत भस्मसात होतात, त्याप्रमाणे गणपतीच्या कृपेने त्या राक्षसाच्या व भीम पारध्याच्या पापांचे पर्वत नष्ट झाले. नंतर दिव्य कांती प्राप्त झालेले ते दोघे विमानात बसले. आणि त्यांना गणेशाच्या रुपात आलेल्या किंकाराने विनायाकाकडे नेले. विनायकाला त्यांनी नमस्कार केला. पापांतून मुक्त झालेल्या त्यांना सरूपता मुक्ती प्राप्त झाली.

तात्पर्य देवास केवळ भाव प्रिय आहे, तो भक्तीभावानेच संतुष्ट होतो. शुक्ल ब्राह्मणालाही याचमुळे त्याने कुबेराचे वैभव दिले. अहंकाराने त्यास कितीही मौल्यवान वस्तू अर्पण केल्या, सुग्रास अन्न अर्पण केले तरी त्याला संतोष होत नसतो. तो केवळ भावाचा भुकेला आहे.  

भीम नावाचा व्याध्याचा पूर्वेतिहास सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters