ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

भक्तीचे महात्म्य : व्याधाचा पूर्वेतिहास व उद्धार...


भीम नावाचा व्याध म्हणजेच पारध्याचा पूर्वेतिहास :

व्याध पूर्वी वेद्विद्येत पारंगत असा राजा होता. शुक्र आणि वाचस्पती यांनीही मान खाली घालावी असे त्याचे दोन बुद्धिमान प्रधान होते. त्याची मदनावती नावाची गुणवती पत्नी होती. साधुमान्य असे सहाही गुण त्याच्या ठाई होते. परंतु तो निपुत्रिक होता. 

त्यामुळे मरतेसमई आपल्या 'दर्धर्ष' नावाच्या भाऊबंधाच्या 'सांब' नावाच्या क्षेत्रज पुत्राला आपल्या पश्चात राज्य द्यावे असे त्याने आपल्या प्रधानांना सांगितले होते. त्याच्या सांगण्यानुसार प्रधानांनी त्या 'सांब' नावाच्या मुलास गादीवर बसवले. दर्धर्षानेही पुत्र प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले होते, पण दुर्दैवाने त्याला सुपुत्र झाला नाही. तेव्हा एका कोल्यावर आसक्त झालेल्या 'प्रमदा' नावाच्या त्याच्या पत्नीने सुमुहूर्तावर कोल्यापासून एका मुलाची उत्पत्ती करून घेतली, तो मुलगा म्हणजेच सांब. पण हा सांब जारज (अवैध संतती) आहे हे कोणालाही समजले नाही.

प्रधानांनी सांब याला सारी राजचिन्हे दिली. राष्ट्रासह व कोशासह सर्व राज्य त्याला दिले. ते दोघे पूर्वीप्रमाणेच प्रधान म्हणून राहिले. पण  दर्धर्षाचा पुत्र राज्य प्राप्त होताच सत्ता व संपत्तीमुळे मत्त झाला. स्त्री, मांस, मदिरा यात आसक्ती वाढून तो हत्तीसारखा मत्त आणि आळशी होऊन सन्मार्गाला पूर्ण पारखा झाला. श्रीमंत लोकांचे धन हरण करून त्याने त्यांना नगराबाहेर घालवून दिले. ब्राह्मण व साधू यांचा छळ करून त्यानाही गावाबाहेर हाकलून दिले. 

प्रधानांनी आपल्या परीने त्यांना खूप नीतीचा उपदेश करून पहिला, पण त्याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. ते वारंवार त्याला समुपदेश करू लागले. तेव्हा विटून जाऊन त्याने प्रधानांच्याच पायात बेड्या घातल्या आणि त्यांना तुरुंगात डांबले. प्रधानाच्या मातापित्यांनी त्यांना खूप सांगून पाहिले कि, ज्याच्यामुळे तुला हे राज्य मिळाले, ज्यांनी या राज्याचे रक्षण केले, त्यांना तू तुरुंगात का डांबतोस? पण अविवेकाने पछाडलेल्या या राजाने प्रधानाच्या मातापित्यानाही तुरुंगात डांबले. 

सांब राजाचा 'दुष्टबुद्धी' नावाचा त्याचा एक मित्र होता. त्यास घोडे, सुवर्ण, हत्ती, दास, दासी देऊन त्याने आपला सचिव / प्रधान केले व जो या प्रधानाचे ऐकणार नाही, त्याचा शिरच्छेद केला जाईल असे जाहीर केले.

तो सांब राजा राज्यात दिसतील त्या उत्तम, सुंदर स्त्रियांचा उपभोग घेऊ लागला. त्या विषयलंपटास कशाचाही विधीनिषेद नसे. जसा राजा तसाच त्याचा प्रधान. 

एकदा शिकारीकरिता ते दोघे एका गहन अरण्यात गेले. लहान मोठे सहस्त्रावधी प्राणी त्यांनी मारले. त्यांची ओझी नगरात पाठवून ते दोघे मागावून येत होते. येता येता त्यांना विनायकाचे एक महास्थान दिसले. त्यात विनायकाची जीर्ण व शुभ्र मूर्ती विराजित झाली होती.

पुत्राकरिता तर करणाऱ्या रामचंद्रांच्या पित्याने (राजा दशरथाने) त्या मूर्तीची स्थापना केली होती. दक्षाशरी मंत्राचा दीर्घकाळ जप करून भक्तीने त्यांने विनायकाचा साक्षात्कार प्राप्त करून घेतला होता. देवाने त्याला वर देऊन त्याचे मनोरथ पुरविले होते. नंतर वाशिष्ट मुनींच्या हातून त्यांनी या मूर्तीची स्थापना केली होती. त्याच्याच प्रसादाने त्यास राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे पुत्र प्राप्त झाले होते.

गजाननाचे ते मंदिर पाहून तो सांब राजा व प्रधान घोड्यावरून खाली उतरले व त्या पापहारक विनायकाची पत्रे, पुष्पे वाहून त्यांनी पूजा केली आणि ते निघून गेले. योगायोगाने एवढेच की ते पुण्य त्यांच्या हातून घडले.

पुढे ते दोघे पापी मरण पावले. यमदुतांनी त्यांना पाशांनी बांधून यमापुढे आणले. यमाने चित्रगुप्तास बोलावून त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब विचारला. चित्रगुप्त म्हणाला, "रविपुत्रा, यमा, यांच्या पुण्याचा लेशही नाही, पण पापांची तर गणनाच करता येणार नाही." त्यावर यमाने आज्ञा केली, "बांधा आणि यांना लोखंडाच्या दोरीने मारून अनेक वर्षे विचीत्रमय कुंडात टाका. पापाचा भोग भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा मुतृलोकी जाउद्यात. यांचा पुण्याचा थोडा लेश आहे. त्यांनी एकदा गजाननाचे दर्शन घेऊन त्याची पूजा केली होती. त्या पुन्यायीच्याच बळावर देव गजाननाच यांचा उद्धार करील."

नंतर दूतांनी त्याला घट्ट बांधून बेदम मार दिला. 'कुम्भिपाकात', 'शोनितोद' आणि 'रौरव' नरकात आणि 'कालकुटात' त्यांना शंभर शंभर वर्षे ठेवले. तामिस्त्र, अंधतामिस्त्र आणि पू व रक्त यांचा कर्दन असलेल्या कुंडात काही वर्षे त्याला ठेवून नंतर कंटकात टाकले. तापलेल्या वाळूत भाजून काढले. अश्या प्रकारे अनेक घोर शिक्षा भोगून ते घोर यमयातनेतून सुटले आणि अवशिष्ट पापामुळे भूलोकावर आले. त्यातील एक कावळ्याच्या व दुसरा घुबडाच्या योनीत जन्मला. नंतर एक बेडूक व दुसरा सरडा झाला. पुढे एक सर्प व दुसरा विंचू झाला. त्या जन्मातही त्यांनी अनेकांना दंश करण्याची पापे केली. नंतर ते कुत्रा व मांजर यांच्या योनीत जन्मास आले. पुढे घोडा, गाढव, उंट, हत्ती, नक्र, मासा, व्याघ्र, हरीण, बैल, रेडा याप्रमाणे अनेक योनीतून त्यांना प्रवास करावा लागला. पुढे चांडाळ व कीटक झाले.

शेवटी राक्षस व भिल्ल म्हणून जन्मास आले आणि 'पिंगाक्ष' व 'दुर्बुद्धी' या नावाने प्रसिद्ध झाले. या जन्मी विनायकाचे दर्शन आणि पूजन केल्यामुळे त्या प्रभावाच्या योगाने त्यांचा उद्धार झाला. पूर्वी जेव्हा हा राक्षस भिमास भक्षण करण्यास गेला तेव्हा तो भीम शामिवृक्षावर चढला. त्यामुळे शमीची पाने गजाननावर पडल्यामुळे गजानन दोघांवरही संतुष्ट होऊन त्या दोघास दिव्य देह प्राप्त झाले व ते स्वर्गलोकात गेले.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters