एकदा सिंधू नामक दैत्याने इंद्रादी देवांना कारागृहात ठेवले होते. तेव्हा गणेशाचा सिंधू दैत्याशी घोर संग्राम झाला व मयुरेशच्या प्रतापाने त्या दैत्यास मुक्ती मिळाली.
सिंधूचा वध झालेला ऐकून त्याचा पिता चक्रपाणी, माता उग्रा आणि पत्नी दुर्गा शोकाकुल होऊन रणभूमीवर गेली. पतीचे शिर मांडीवर घेऊन दुर्गेने अनिवार शोक केला. चक्रपाणीने दुख: आवरून बेल, चंदन इ. पवित्र लाकडांची चिता रचली. अग्नी दिला. नंतर चक्रपाणीने गणेशाची स्तुती केली. गणेशाने त्याला वर मागायला सांगितले. त्यावेळी त्याने ''एकदा आमच्या घरी ये'' असा वर मागितला. त्याचवेळी गणेश मयुरावर आरूढ होऊन त्यांच्या घरी निघाला.
चक्रपाणीने पुढे जाऊन नगर आणि सभागृह सजवले. त्या सभागृहात गणेश विराजमान झाले. चक्रपाणी गणेशाची पूजा करू लागला. एव्हाना सिंधूदैत्याच्या कारागृहातून सर्व देवांची सुटका झाली होती. सर्व देव बसून गजाननाची स्तुती करीत होते. चोहीकडे देव, मुनी, सप्तकोटी गण, यांनी सभागृह भरून गेले होते. स्तुतिपाठक स्तुती करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, नारद गाऊ लागले. चक्रपाणीने सर्वांची यथाविधी पूजा केली आणि तो सर्वाना उद्देशून म्हणाला, "या माझ्या सभागृहात इंद्रादी देव लोक येऊन बसले आहेत. त्यामुळे माझा जन्म आणि माझी कर्म धन्य झाली. शंभर जन्माच्या पुण्याईने आज या सभेत मयुरेश दृस्तीस पडला."
परंतु सर्वांच्या आधी, मयुरेशाची पूजा केली हे पाहून जगदीश्वराच्या मायेने मोहित झालेला इंद्र एकाएकी संतप्त होऊन म्हणाला, "राजा चक्रपाणी, तू या बालकाची पूजा केल्यामुळे मुर्ख ठरला आहेस. चतुर्भुज ब्रह्मा वा लक्ष्मीश विष्णू जगउत्पत्ती कारक आहेत. आम्हा सर्वांचा अवमान करून तू मोहाने या बालकाचे पूजन केलेस! संहार सर्व जणांचा जनक आणि सृष्टी, स्थिती आणि अंत करणारी त्रैलोक्यजननी अंबा यांना सोडून; तसेच त्रैलोक्याचा नायक व वैदिक कर्मांचा प्रवर्तक असा जो सूर्य त्यासही सोडून तू या बालकाचे पूजन केलेस हे योग्य नाही. " त्यावर चक्रपाणी म्हणाला, "यानं सर्व देवांना कारागृहातून मुक्त केलं, म्हणून हा सर्वांहून श्रेष्ठ आहे. हा शंकराच्या घरी भूमीचा भार हरण करण्याकरिता जन्मास आला आहे. तो अनंतशक्ती परमात्माच आहे. "
इतक्यात सर्व ब्रह्मांड फुटून जाईल असा भयंकर शब्द त्या सभेत सर्वाना ऐकायला आला. सर्व देव गजाननाकडे पाहतात तो त्यांना अनेक अलंकारांनी युक्त, दशबाहू, अतिसुंदर गजाननदेव दिसला. सर्वजण विस्मित झाले. सर्वानी त्या पंचरूपी ईश्वरास पाहिले. पद्मासनावर मध्ये बसलेल्या वक्रतुंडास, अग्नेयास शंकरास, नैऋत्येस सूर्यास, वायव्य दिशेस पार्वतीस आणि ईशान्यदिशेस विष्णूस पाहिले. अश्या प्रकारे गणपती, शिव, विष्णू, सूर्य आणि देवी असे पंचायतन सिंहासनावर एकाच मूर्तीत सर्वाना दिसले.
इतक्यात हा "गजानन ब्रह्म असल्यामुळे सर्व देवांहून श्रेष्ठ आहे, याचे पूजन केलं असता सर्व देवांचं पूजन घडेल; जे कुणी यात भेदभाव करतील ते नरकात जातील." अशी आकाशवाणी झाली. सर्व देवांचा भ्रम नाहीसा झाला.
त्यानंतर आनंदित झालेला नारद ब्रह्मदेवास म्हणाला, "कमलोदभवा, तुझ्या आज्ञेने मी तुझ्या कन्या सिद्धी आणि बुद्धी यांच्या विवाहाकरिता शिव आणि पार्वती यांना विनंती करून तो पूर्वीच निश्तिच केला आहे. यास्तव अनेक लक्षणांनी युक्त अशा तुझ्या या कन्यांचे दान मयुरेशास यथाविधी करावं."
हे ऐकून सर्व देव "त्या कन्या आम्हास दे" म्हणून विनवू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या कन्यांच्या हातात पुष्पमाला देऊन स्वयंवर करण्याची आज्ञा केली. तेव्हा सिद्धी आणि बुद्धी या दोघींनी सर्व देवास सोडून मयुरेशच्या गळ्यात मला घातल्या. ब्रह्मदेवाने नंतर गणेशाशी त्यांचा विवाह विधीपूर्वक लावून दिला व गणेश सिद्धी-बुद्धींसह मयुरेशपुरी आला.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा