ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ०२ : पिंपळ


२१ पत्रीची ओळख करून घेताना या वृक्षवल्लरींचे खास वैशिष्ट्य, सर्वसाधारण वर्णन, औषधी व इतर उपयोग, त्यांचे धार्मिक महत्व जाणवणाऱ्या कथा / लोककथा पाहूयात :

१) पिंपळ / अश्वत्थ (Ficus Religiosa)  

 "हेरम्बाय नमः। अश्‍वत्थपत्रं समर्पयामि।।"


वैशिष्ट्य :

पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. पिंपळास वृक्षातील आजोबा असे मानले जाते. पिंपळाची पूजा अपत्यप्राप्तीसाठी लाभदायक असून पिंपळ म्हणजे मातृत्व पूर्ण करणारा वृक्ष आहे. पिंपळाची पूजा म्हणजे प्रत्यक्ष विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव यांची पूजा समजण्यात यावी असा वर महादेव व इतर सर्व देवांनी पिप्पलाद मुनींना दिला होता. पुत्रप्राप्तीसाठी, सर्वसुखासाठी व मोक्षासाठी पिंपळाची पूजा जनमानसात दृढ झाली आहे. पिंपळ हवाशुद्धीकरणासाठी श्रेष्ठ मानला जातो. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने न सांगता सवरता परागंदा झालेला पती परत यावा म्हणून पिंपळाला श्रध्देने लक्ष प्रदक्षिणा घातल्याचे सर्वज्ञात आहे.

पिंपळाचा वृक्ष लावल्याने शेकडो यज्ञाचे फळ मिळते. उन्हाळ्याचा दिवसात पिंपळाच्या छायेत गाय, देव व ब्राह्मण यांना विश्रांती मिळेल व पिंपळाचा वृक्ष लावणारा सुखी होईल. त्याचे पितर अक्षय स्वर्गाची प्राप्ती करुन घेतील. पिंपळाची पूजा करण्याचे फायदे अनेक आहेत. स्नान करुन पिंपळास स्पर्श करणारा मनुष्य पापांपासून मुक्त होतो. त्याच्या स्पर्शाने लक्ष्मी प्राप्त होते. त्याला प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते. या वृक्षास हविष्य, दूध, नैवेद्य, फूल, धूप, दीपक इत्यादी अर्पण करणारा मनुष्य कधी स्वर्ग भ्रष्ट होत नाही. पिंपळाच्या मूळाशी बसून जप, होम, स्तोत्रपाठ, यंत्रमंत्रादी साधने करणा-या मनुष्यास कोटी गुणांचे फळ मिळते. पिंपळाच्या मुळात श्रीविष्णू, शरीरात शंकर आणि अग्रभागात ब्रह्मदेव आहेत. पिंपळास नेहमी प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळ वृक्षाच्या रुपाने साक्षात श्रीहरी या भूतलावर विराजमान असतात. पिंपळ लावणे त्याचे रक्षण करणे, त्याची पूजा करणे यामुळे धन, पुत्र, मोक्ष यांची प्राप्ती होते.

तत्वज्ञानी, धर्मसंस्थापक, धर्मप्रसारक यांचे आणि पिंपळाचे काही तरी अतूट नाते दिसते. हिंदूधर्माला तत्वज्ञानाची बैठक देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच बौद्ध धर्मांची निर्मिती करणाऱ्या भगवान गौतमबुद्धांनाही पिंपळवृक्षाने आपलेसे करून घेतले. जन्म-मरण, दारीन्द्र-श्रीमंती, शैशव-वार्धक्य, सुख-दुःख या द्वंद्वासारख्या अनादिकालापासून चालत आलेल्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांची उकल मनन, चिंतन आणि तपश्चर्या यायोगे करण्याचे भगवान गौतम बुद्धांनी ठरवले व वनात प्रस्थान केले. दिवसांमागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले. गौतमांचा देह उपासतापास करून अगदी अस्थिपंजर झाला होता. एकदा फिरता-फिरता ते निरंजना नदीच्या काठी आले. जवळच पिंपळवृक्ष होता. परत पिंपळवृक्षाखाली तपश्चर्यास सुरुवात झाली. आणि काय आश्चर्य गौतमांना सर्व विश्वाचे गूढ उलगडले. सर्व ज्ञान प्राप्त झाले. मन ज्याचा शोध घेत होते त्याचा शेवटी वेध लागला. पिंपळवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यास बोधीवृक्ष असे नाव पडले. पिंपळाच्या मुळाशी बसून चिंतन-मनन करणाऱ्याला कोटी- कोटी पुण्याचे फळ मिळते.

सर्वसाधारण वर्णन :

पिंपळ हा सर्वत्र आढळणारा एक विशालकाय वृक्ष असून तो बरीच वर्षे जगतो. पिंपळाची साल खवल्या-खवल्यांची असून गुळगुळीत असते. पिंपळाची सळसळणारी पाने एकाआड एक, लांब देठांची, निमुळत्या टोकांची व तळाला हृदयाकृती असतात.ही पाने कोवळी असताना तांबूस तपकिरी असतात व नंतर हिरवी होत जातात. फांदी आणि पान यांच्या बेचक्यात फुलांचे पेले जोडीने येतात. या पेल्यांत बारीक फुले येतात. पिंपळाला येणारी फळे ही सुरुवातीस हिरवी तर पिकल्यानंतर जांभळट रंगाची असतात.

औषधी उपयोग :


अहोरात्र आपणांस प्राणवायू देणा-या या पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. पिंपळ बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक, रक्तशुद्धिकारक आहे. त्वचाविकार, पोटाचे विकार, दंतविकास यांवर गुणकारी ठरतो. पिंपळाच्या फळामध्ये सरटोनीन् हे द्रव्य विपुल प्रमाणात आढळते. हे सरटोनीन् द्रव्य आपल्या शरीरात असणाऱ्या पिच्युटरी ग्रंथीतून सारखे स्त्रवत असते. ह्या द्रव्याचे मुख्य कार्य म्हणजे सारासार विचार करण्याची आपली क्षमता कायम ठेवणे. हे द्रव्य कमी झाले अथवा जास्त झाले तर आपला वैचारिक तोल जातो. पिकलेली फळे तोतरेपणा नाहीसा करतात.

इतर उपयोग :


याची पाने उंटाला खाद्य म्हणून देतात. या झाडावर लाखाचे किडे घर करून राहत असल्यामुळे यापासून लाख काढतात. याची पाने अनेक दिवस पुस्तकात किंवा मातीत पुरून ठेवली तर सुंदर जाळीदार दिसतात. त्यावर अनेक डिझाईन व चित्र काढतात. याची फळे म्हणजे तर अनेक वटवाघळे व पक्षांचे जीवनच. वटवाघळे रात्रंदिवस या झाडावर वस्ती करून राहिलेली आपण बघतोच. पिंपळाच्या लाकडाच्या उपयोग जळणाबरोबरच आगपेट्या, खोकी, जू, भांडी बनविण्यासाठी केला जातो. पिंपळामध्ये असणा-या टॅनिन या द्रव्यामुळे कातडी व कापड रंगविण्यास याचा उपयोग होतो. झाडाचं लाकूड पाण्यात टिकतं म्हणून होड्या बनवण्यासाठी याचा उपयोग करतात.

कथा (१) :

पिंपळाची पूजा अपत्यप्राप्तीसाठी कशी लाभदायक आहे याविषयी एक सुंदर आसामी लोककथा आहे. खोडीयाज आणि पिंपळाज या स्वर्गात राहणा-या देवकन्या. स्वर्गात अमृत हे सहज उपलब्ध होणारे पेय. त्यामुळे तहान आणि भूक म्हणजे काय याची स्वर्गातील लोकांना केवळ कल्पनाच करावी लागायची. अमृत असले म्हणून काय झाले, शेवटी एकच पेय सारखे प्यायल्याचे वीट हा येणारच! पृथ्वीवरील विविध पेये, विविध खाद्यपदार्थ यांच्या आठवणीने स्वर्गवासी झालेले गोष्टीवेल्हाळ आणि खवय्या महामानवांनी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या खाद्यपेयांची आणि पेयांची केलेली वर्णने ऐकून, त्यांच्या रसाळ गप्पा ऐकून खोडीयाज व पिंपळाज या देवकन्यांना पृथ्वीवरील विविध पेये आणि खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाली. खोडीयाज पृथ्वीवरील खाद्यपेयांचा समाचार घेऊन संतोष पावली पण पिंपळाजची काही तहान भूक भागेना. इतर खाद्यपदार्थांबरोबर तिला मानवी मांसाचीही चटक लागली. सगळीकडे हाहाकार माजला. ठिकठिकाणी मानवी वस्त्या उजाड होऊ लागल्या. पिंपळाजच्या संचाराला आणि संहाराला कसा पायबंद घालावा हे कोणाला समजेना. शेवटी खोडीयाजलाच माणसांची दया आली. तिने प्रथम पिंपळाजला दो-याने बांधून तिचा संचार बंद केला. शाप देऊन तिचे वृक्षात रुपांतर करुन मानवी संहार बंद केला. पिंपळाजचे पिंपळाच्या वृक्षात रुपांतर झाल्यामुळे आणि एकाच जागी बंदिस्त झाल्यामुळे पिंपळाजला आपली चूक समजली. पश्चातापही झाली. या आपत्तीतून सुटका करुन घेण्यासाठी तिने खोडीयाजची खूप विनवनी केली. रडली, भेकली, खोडीयाज शेवटी तिची बहिणच. बहिण बहिणीची बाजू घेणार नाही तर कोण घेणार? तिने बहिणीला उ:शाप दिला की, जितके मानव बळी घेतलेस तितके मानव तू मानवजातीला परत कर म्हणजेच तुला मुक्ती मिळेल. असा उ:शाप देऊन ती त्वरेने स्वर्गात निघून गेली. पण जाता जाता पिंपळाजला बंधमुक्त करायची विसरली. यामुळे आजही पिंपळाला दो-याने बांधून पुत्रप्राप्तीसाठी साकडे घातले जाते. पिंपळ म्हणजे मातृत्व पूर्ण करणारा वृक्ष मानले जाते.


कथा (२) :

पिंपळवृक्ष तोडणारा नेहमीच पापांचा धनी होतो असे नाही तर काही वेळेला भलेही होते मात्र तो विष्णूभक्त्‍ा असला पाहिजे. असाच एक धनंजय नावाचा विष्णूभक्त ब्राह्मण होता. सतत देव देव करीत असल्यामुळे संसाराकडे त्याचे दुर्लक्ष झाले. गरिबी आली. आप्तमित्रांनी त्याचा त्याग केला. खाण्यापिण्याची भ्रांत पडली. नशिबी वनवास आला. वनात जावे, कंदमुळे खाऊन कसेबसे जीवन जगावे असे त्याचे चालले होते. एकदा कडाक्याची थंडी पडली. अंगावर पुरेसे कपडे नाहित. रात्रभर झोप आली नाही. पहाटे तर थंडी अतिशय पडली. मग त्याने पहाटेच्या अंधारात पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या व शेकोटी पेटविली. त्या अग्निमधून श्रीविष्णू प्रकट झाले आणि म्हणाले, "तू माझ्या अंगावर कु-हाड चालविलीस, मला सर्व अंगभर जखमा झाल्यात. हे पाहून त्या विष्णूभक्तास अतिशय दु:ख झाले आणि दु:खातिशयाने त्याने स्वत:चे मस्तक तोडून श्रीविष्णूंना अर्पण करावयाची तत्काळ तयारी केली. त्याची ही भक्तीची परिसिमा पाहून विष्णू थक्क झाले. त्यांनी कुबेराला त्याचे दारिंद्र्य नष्ट करावयास सांगितले. पुढे तो ब्राह्मण नित्यनियमाने पिंपळ / अश्वत्थ वृक्षाची पूजा करु लागला.

(संदर्भ : आपले वृक्ष कूळ कथा आणि लोककथा - मनेका गांधी; असे वृक्ष असे देव भाग १- शा प्र दीक्षित ; बहुगुणी  वृक्ष  - डॉ . बी . पी . वांगीकर )
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters