३) देवदार (Cedrus Deodara)
"सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि।।"
वैशिष्ट्य :
देवदार हा एक चैतन्यमयी वृक्ष आहे, जो देवांचा लाडका मानला जातो. देवदार या गगनचुंबी वृक्षाची वाढ आणि विस्तार पाहता जणूकाही त्याच्यात देवलोकांस स्पर्श करण्याची लालसा आणि मर्त्यलोकांना अभयदान देण्याची इच्छा आहे असाच जणूकाही भास होतो.
सर्वसाधारण वर्णन :देवदार हा हिमालयातील वृक्ष अत्यंत उंच म्हणजेच लांबसडक वाढणारा, डेरेदार व शोभायमान वृक्ष असून तो शेकडो वर्षे जगतो. याची ऊंची ४० ते ६० मीटरपर्यंत आढळते. या वृक्षाचा बुंधा अतिशय जाड असून तो २ ते ३ मीटरपर्यंत असतो. याची पाने लांबट गोलाकार व मुलायम असून ती हिरवट लालसर रंगाची असतात. देवदाराचे लाकूड पिवळट रंगाचे असून ते सुगंधित व मजबूत असते.
औषधी उपयोग :
देवदार अनेक दोषांना दूर करणारा असल्यामुळे त्याचा उपयोग आर्युवेदिक औषधांमध्येही केला जातो. देवदार कृमिनाशक आणि ताप कमी करणारा आहे. ते गर्भाशय शुद्ध करीत असल्याने बाळंतपणाच्या काढ्यात ते महत्त्वाचे असते. शरीरावरील सूज, संधिवात, जुनाट सर्दी, ताप, अपचन, उचकी अशा आजारांत गुणकारी ठरतो.
इतर उपयोग :
देवदाराच्या फळांपासून सुगंधी राळ किंवा टर्पेंटाईन बनवितात. देवरादाचे लाकूड मजबूत असते आणि त्यावर पॉलीश व्यवस्थित चढत असल्याने या लाकडाचा विविध प्रकारचे फर्निचर बनविण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच यापसून पेन्सीलही बनविण्यात येते. याची सालीपासून बाष्पशील तेल प्राप्त होते. तेल काढल्यानंतर सालीचा उपयोग जळणाकरीता होतो.
कथा :
पुराणांमध्ये नमूद केल्याप्रमाणे दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या वेळी पित्याकरवी आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने आपले प्राण त्यागले. त्यानंतर शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला व सतीच्या वियोगाने दु:खी होऊन ते जागेश्वर या ठिकाणी तपस्या करण्यासाठी गेले. जागेश्वर या ठिकाणी समाधीस्थल निवडताना शंकरांनी देवदार वृक्षाची निवड केली होती. (संदर्भ : आंतरजालावरून साभार ).
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा