४) बेल (Bael /Aegle Marmelos)
"उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।।"
वैशिष्ट्य :
बेल हा चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. शिवपुराणात सांगितल्यानुसार, महादेवास बेल प्रिय असल्यामुळे बेलाची पूजा करणारा, बेलाला पाणी घालणारा, बेलाचे वृक्ष लावणारा, बेलाचे संरक्षण करणारा हा महापुण्यवान असतो. सौभाग्य, संपत्ती, आरोग्य यासाठी बिल्वरात्री व्रत केले जाते. अग्निपुराणात राज्यप्राप्तीसाठी बेलफळाचा होम करण्यास सांगितले आहे. बेलवृक्षाच्या बुंध्यापाशी सदैव लक्ष्मीचा निवास असतो तर मध्यभागी महादेवाचा निवास असतो. लक्ष्मीपासून बेलाची निर्मिती झाली असल्यामुळे बेलाला श्रीवृक्ष अथवा लक्ष्मीवृक्ष असेही म्हणतात. बेलाचे झाड व बोराचे झाड जर एखाद्या जागेवर शेजारी शेजारी वाढलेली असली तर त्या जमिनेखाली झरा असणार असे समजतात. नवीन कार्याच्या शुभारंभी लोक बेलाला प्रदक्षिणा घालतात. कारण बेल नवे कार्य यशस्वी करून देतो असे मानतात. बेलाची पाने महादेवाला अतिशय पूज्य मानली जातात. महादेवाच्या पूजे अर्चेत बेल वाहणे हा विधी अत्यंत आवश्यक असल्याने बहुदा महादेवाच्या देवळाजवळ एखादे बेलाचे झाड लावलेलेच असते. महादेवास बेल वाहताना देठ आपल्याकडे करून उपडा वहावा.
सर्वसाधारण वर्णन :
बेल हा एक मध्यम उंचीचा पानगळी वृक्ष आहे. बेलाची झाडे मध्यम उंचीची म्हणजे साधारणत: १०-१२ मीटर उंच वाढणारी असतात. झाडाच्या फांद्या काटेरी असून फुले हिरवट, पांढ-या रंगाची असतात. यास उग्र वासाची चेंडूच्या आकाराची फळे येतात. पाने एकांतरित आणि त्रिदली असतात. फलधारणा झाल्यावर पावसाळ्यात लहान लहान गोलसर हिरवी फळे दिसू लागतात. ती पिकल्यावर पिवळी होतात. फळ मोठ्या पेरूएवढे ५ ते १५ सें.मी. व्यासाचे गोलसर किंवा लंबगोलाकृती असू शकते. फळातील गार चिकट, गोड, केशरी रंगाचा असून त्यात असंख्य छोट्या, चपात्या बिया असतात. नवीन रोपे बियांपासून तयार करतात.
औषधी उपयोग :
बेलाची मुळे तापावर गुणकारी असून मूत्रविकार,
पाठीच्या कण्यातील वेदन, हृदयाची धडधड यांसाठी गुणकारी ठरतात. पाने पाचक
असून वात व कफ यांचा नाश करतात व मधुमेह, नेत्रविकार, बधीरता, अतिसार यावर
गूणकारी ठरतात. बेलाची पाने डोळ्यांवर पोटीस म्हणून बांधतात. बेलाची फळे
कडवट गोड असून ती शक्तीवर्धक आहेत. मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थासाठी ती
उपयुक्त ठरतात. औषधोपचारासाठी बेलफळांचा विचार केल्यास, कच्चे बेलफळ व पक्व
बेलफळ यांचे वेगवेगळे गुणधर्म दिसून येतात. पैकी कच्चे बेलफळ जास्त
गुणकारी असून त्यातील उष्णगुणामुळे आतडयातील द्रव्यांचे शोषण होते. याने
जठराग्नी प्रदिप्त होऊन भुकही चांगली लागते.
इतर उपयोग :
बेल वृक्षाचे लाकूड पिवळसर पांढऱ्या रंगाचे किंवा करड्या रंगाचे असते. ते खूप मजबूत आणि कापल्यावरही काही काल सुवासिक असते. त्याचा उपयोग बांधकामासाठी तसेच शेतीची अवजारे, बैलगाड्या, हत्याराच्या मुठी तसेच कोरीव कामाच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. लाकडाचा लगदा वेस्टन कागद तयार करण्यासाठी वापरता येतो. बेलाचा डिंक उत्तम प्रकारचा असतो. पाने आणि कोवळ्या डहाळ्या गुरांना चार म्हणून देतात.
कथा (१) : लक्ष्मीचा त्याग
देवी लक्ष्मी ही विष्णुपत्नी. असे असले तरी ती रोज श्रीशिवाची पूजा करत
असे. कारण प्रत्येक देवाला त्याचे स्वताचे असे स्थान आणि महत्व स्वर्गलोकात
दिले जात असे. लक्ष्मी आपली दासींकडून रोज एक हजार कमळे अर्पण करीत असे.
एके दिवशी संध्याकाळच्या वेळी ती पिंडीला कमले अर्पण करताना रोजच्यासारखी
मोजू लागली. कमळे ९९९ होती. म्हणजे एक हजाराला एक कमळ कमी होते. रात्र होऊ
लागली. कमळांनी आपल्या पाकळ्या मिटून घ्यायला सुरुवात केली होती! तेव्हा
यापुढे कमळ तोडण्यात काहीच अर्थ नव्हता.
लक्ष्मीने विचार केला. ९९९ कमळेच शंकराला वाहणे अशुभ होईल. कमळाचे फूल मिळणे तर अशक्यच होते. स्वताचे मस्तक तोडून त्या कमलांबरोबर स्वताचे शिरकमळ वाहावे असा तिने निश्चय केला. कट्यारीने ती आपले मस्तक कापणार एवढ्यात पिंडीतून मूर्तिमंत शंकर प्रकट झाले. त्यांनी तिला थांबवले. तिच्या भक्तीमुळे ते तिच्यावर संतुष्ट झाले होते. या प्रसंगाची आठवण म्हणून त्यांनी पृथ्वीवर बेलाचे फळ टाकले. त्यातील बियांतून पुढे पृथ्वीवर शंकराच्या देवळाजवळ असंख्य बेलाचे वृक्ष निर्माण झाले!
कथा (२) : व्याधाची भक्ती आराधना
वाराणसी येथे एक नास्तिक व्याध / पारधी राहत
होता. एके दिवशी तो अरण्यात शिकार करण्यासाठी गेला. तिथे एका हरणाचा पाठलाग
तो दिवसभर करत राहिला. पान त्या हरीनाने त्याला हुलकावण्या दिल्या आणि
रात्र पडू लागली तरी त्याला त्याची शिकार करता आली नाही. एवढे होईपर्यंत तो
अरण्याच्या अगदी आतल्या भागापर्यंत खोलवर पोचला हता. दिवसभर त्याला उपवासच
घडला. आता परत वाट शोधीत घरी जायला त्याला शक्तीच राहिली नव्हती. तेव्हा
ती रात्र तेथेच काढायची त्याने ठरवले. तो एका बेलाच्या झाडावर चढला आणि
स्वस्थपणे झोपता यावे म्हणून थोडेसे सुरक्षित अंथरून तयार करण्यासाठी
त्याने बेलाची पाने खाली टाकायला सुरुवात केली. या बेलाच्या झाडाखाली
शंकराची एक पिंड होती. व्याधाने जी पाने तोडून खाली टाकली ती पिंडीवर पडली.
पहाटेपासून शिकारीच्या मागे लागल्यामुळे त्याने काही खाल्ले नव्हते.
म्हणजे त्याला अनायासे उपवास घडला होता. तो दिवस होता महाशिवरात्रीचा!
शंकराच्या आराधानेतील सर्वाच्या सर्व गोष्टी व्याधाला नकळत त्याच्या हातून
घडत होत्या या आराधनेमुळे श्रीशंकर प्रसन्न झाले आणि त्यामुळे नास्तिक
असूनही तो पारधी मरण पावल्यावर थेट स्वर्गाला गेला.
(संदर्भ : असे वृक्ष असे देव भाग २ - शा प्र दीक्षित; आपले वृक्ष भाग १ - श्री . द महाजन ; आपले वृक्ष कुळकथा आणि लोककथा - मनेका गांधी ).
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा