४) शमी (Prosopis Cineraria)
" वक्रतुंडाय नमः। शमीपत्रं समर्पयामि।। "
वैशिष्ट्य :
शमी हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. शमी हा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय असला तरी इतर सर्व देवांनासुद्धा शमी वंदनीय आहे. वेदांनी शमीला अग्नीची अधिष्ठात्री वृक्षदेवता मानले आहे. शमीचं नुसतं नाव घेता अनंत पापांचा नाश होतो. मनुष्याने भारी वस्त्रे, सुवर्ण, रत्ने यांनी पूजा केली तरी दुर्वा आणि शमीपत्रांवाचून ती व्यर्थ ठरते. केवळ दुर्वा आणि शमीपत्रही त्याच्या संतोषासाठी पुरेसे ठरते.
शमी नेहमी मंगलदायकच होता असे नाही कारण महाभारतकाळी शमी हा एक अमंगल वृक्ष समजाला जात असे. त्या काळी काही वन्य जमाती पांढऱ्या वस्त्रात प्रेते गुंडाळून शमीवृक्षात ठेवत असत. शमीवृक्षात प्रेते असल्यामुळे हा वृक्ष अस्पर्श व अमंगल समजण्यात येई. म्हणूनच पांडवांनी अज्ञातवासात असताना आपलीशस्त्रे पांढऱ्या वस्त्रात गुंडाळून शमीवृक्षात लपवून ठेवली होती.
सर्वसाधारण वर्णन :
शमी हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष आहे. फांद्याच्या सर्वांगावर अणुकुचीदार काटे असतात. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असतात. पाच पाकळ्यांची फूले अतिशय लहान आणि पिवळट रंगाची असतात. शेंगा लांबट निमुळत्या असून त्या मण्यांच्या माळेसारख्या दिसतात. आतला गर कोरडा असला तरी गोड असतो. त्यात बिया असतात. शेंगेत कप्पे असून एका कप्प्यात एकच बी असते. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. पानांच्या मागे काटे असतात त्यावरुन शमीची पाने ओळखतात येतात.
औषधी उपयोग :
शमी शरीरातील उष्णतेचा नाश करते. शरीरावर जखमेचे व्रण राहिल्यास शमीच्या झाडाची साल उगाळून लेप लावतात. अतिसारावर शमीच्या झाडाची साल ताकात उगाळून देतात.
इतर उपयोग :
वेदकाळी अग्नीनिर्माण करण्यासाठी प्रामुख्याने शमीच्या लाकडाच्या उपयोग केला जाई. शमीमध्ये अग्निचा वास असल्यामुळे अग्निहोत्री लोक शमीच्या काष्ठांचं मंथन करतात. शमीच्या समिधांचा वापर होम करण्यासाठी करतात कारण त्यांच्या घर्षणातून अग्नी प्रजल्वित होतो. झाडाच्या सालीपासून विहिरीतल्या पाणी काढण्याच्या मोटेकरीता 'नाडा' तयार करतात.
कथा :
पूर्वी ‘प्रियव्रत’ नावाचा एक धर्मशील व कीर्तीमान राजा होता. त्यास ‘कीर्ती’ व‘प्रभा’ अशा दोन राण्या होत्या. तो राजा प्रभेच्या पूर्ण आहारी गेला. थोरली पत्नी कीर्ती त्याला आवडत नसे. एकदा प्रभेने कीर्तीला अपमानीत केले, लाथमारुन हाकलून दिले. त्यामुळे अत्यंत निराश होऊन विष प्राशन करुन आपल्या देहाचा नाश करावा असे तिला वाटू लागले. अशा विव्हल अवस्थेत ती असताना देवल नावाच्या ऋषिंनी तिला गजाननाची उपासना सांगितली. कीर्तीने लगेच मंदार वृक्षाच्या लाकडाची गणेशमूर्ती तयार करुन त्याच्या उपासनेस आरंभ केला. कीर्तीने गजाननाची षोडशोपचारे पूजा केली. दुर्वा, पुष्पे, दक्षिणा अर्पण करुन मनोभावे नमस्कार केला. हात जोडून प्रार्थना केली. त्याच्या परात्पर, विश्वव्यापी, अनादी, अनंत, सर्वांचे आदिकरण अशा स्वरुपाची स्तुती केली.
अशा रीतीने कीर्ती रोज गजाननाची उपासना करीत असता जेष्ठाच्या महिन्यातील एके दिवशी तिच्या सख्या गजाननासाठी दुर्वा आणावयास गेल्या. पण त्यांना दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी शमीची पाने आणून ती कीर्तीला दिली. कीर्तीने दुर्वा मिळेपर्यंत भोजन करावयाचे नाही अशी प्रतिज्ञा करुन शमीच्या पानांनी गजाननाची पूजा केली. तथापि शमी गजाननाला प्रिय असल्याने तो तिच्यावर प्रसन्न झाला. स्वप्नात तिला दृष्टांत देऊन म्हणाला, "तू शमीच्या पानांनी माझी पूजा केलीस म्हणून मी प्रसन्न झालो आहे. तुझा पती तुला वश होईल. तुला माझी भक्ती करणारा पुत्र होईल. त्याचं तू ‘क्षिप्रप्रसादन’ असं नाव ठेव. चौथ्या वर्षी तो विष प्रयोगानं मृत होईल, पण गुत्समद ऋषी त्याला पुन्हा जिवंत करतील. नंतर तो चिरायू होऊन सुखानं राज्य करील."
कालांतराने प्रियव्रत राजाची आवडती राणी प्रभा निस्तेज झाली आणि तिला रक्तपिती भरली. पुढे गणेशाच्या प्रेरणेने तो राजा कीर्तीच्या घरी आला आणि तिच्या अधीन झाला. यथाकाल तिला पुत्र झाला. असूयेने तिच्या मुलावर प्रभेने विषप्रयोग केला. कीर्ती आपल्या मृत पुत्राला घेऊन अरण्यात जाऊन शोक करीत गजाननाचे स्तवन करु लागली. दैवयोगाने त्याच वेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी, महाबुद्धीवान आणि गजाननाचे परमभक्त गुत्समद ऋषी त्या वाटेने चालले होते. त्यांना तिच्या दु:खाने करुणा आली आणि ते म्हणाले "तू पूर्वी शमी पत्रानं गजाननाची पूजा केलीस. ते पुण्य जर या बालकाला दिलेस तर तो पुन्हा जिवंत होईल." त्यांचे हे भाष्य ऐकून राणीला परमानंद झाला. तिने तात्काळ शमीच्या पूजनापासून प्राप्त झालेले पुण्य त्या बालकाच्या हातावर सोडले. असे करताच अमृतवृष्टी झाल्याप्रमाणे तिचा सुकुमार पुत्र जिवंत झाला. राणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने त्या थोर ऋषींचे पाय धरले. त्यांना शमीचे माहात्म्य विचारले. त्यावर गुत्समद म्हणाले, "शमीचं नुसतं नाव घेता अनंत पापांचा नाश होतो."
(संदर्भ : ओंकारगणेशा ब्लॉग ; आपले वृक्ष कुळकथा आणि लोककथा - मनेका गांधी ).
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा