ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ०६ : दूर्वा


५) दूर्वा   (Cynodon Dactylon)

" गजमुखाय नम: । दूर्वापत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य : 


गणेशास दूर्वा अतिशय प्रिय आहेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस जो केवळ एक दूर्वा वाहून गणेशाची पूजा करतो व प्रदक्षिणा घालतो, तो गजाननास थोर वाटतो. मनुष्याने भारी वस्त्रे, सुवर्ण, रत्ने यांनी पूजा केली तरी दूर्वा आणि शमीपत्रांवाचून ती व्यर्थ ठरते. केवळ दूर्वा आणि शमीपत्रही त्याच्या संतोषासाठी पुरेसे ठरते.

दूर्वा या मुळासहित वाहत नाहीत. दूर्वा बहुधा विषम संख्येने (किमान ३ किंवा ५, ७, २१ वगैरे) वाहतात. गणपतीला विशेषकरून २१ दूर्वा वाहतात. दूर्वा एकत्र बांधतात व एकत्रित बांधल्याने त्यांचा सुगंध बराच काळ टिकतो. त्या जास्त वेळ ताज्या रहाव्यात म्हणून पाण्यात भिजवून मग वाहतात. गणपतीला वाहायच्या दूर्वा कोवळ्या असाव्यात. जुन्या झाल्यास त्या गवताच्या एका प्रकारात मोडतात.

दूर्वा या अमर आहेत. पण त्या अमर उगीच झाल्या नाहीत तर देव, दानवांना जेव्हा सागरमंथनातून अमृत प्राप्त झाले तेव्हा त्यांनी अमृतकुंभ दूर्वांच्या आसनांवर ठेवला. त्या कुम्भातील काही थेंब दूर्वांवर पडले आणि दूर्वा अमर झाल्या.


सर्वसाधारण वर्णन :



दूर्वा ही एक चिवट व त्रीदलीय वनस्पती आहे. कितीही उपटल्या तरीही त्या परत परत येत राहतात. दूर्वांचा नाश करणे जवळ-जवळ अशक्य आहे. 


औषधी उपयोग :


दूर्वा ही एक पूजनीय वनस्पती असून ती औषधी देखील आहे. दुर्वांच्या रसाने जखमा ताबडतोब बऱ्या होतात. उन्हातान्हात काम करणारे कष्टकरी, शेतकरी तसेच उन्हात हिंडणारी, खेळणारी लहान मुले यांना प्रखर उन्हाचा त्रास होतो. त्यावेळी त्याच्या शरीरातील अति उष्णता यावर दूर्वारस उपयुक्त ठरतो.

इतर उपयोग :

एका काडीपासून अनेक दूर्वा सहज निर्माण होतात, तिचा प्रसार सर्वत्र होतो म्हणून ती बहुप्रसवतेचेचं प्रतिक आहे त्यमुळे दूर्वांमुळे अपत्यप्राप्तीदेखील होते असे मानले जाते. "आपल्या मुळ्यांच्या वाढीप्रमाणे आमच्या वंशाची वाढ कर" म्हणून पूर्वी दूर्वाकडे गाऱ्हाणी घातली जातात. दूर्वा या जश्या संततीसाठी उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे वंधत्व नाहीसे करतात. सौभाग्य, आरोग्य आणि संततीप्राप्तीसाठी दुर्वा सेवानाबरोबरच दूर्वात्रिसन्न, दूर्वालक्ष, दृवाष्टमी इ. व्रतवैकल्येही पार पडली जातात.


कथा (१) :

सुवर्णापेक्षाही जास्त मौल्यवान व अमृततुल्य दूर्वा पृथ्वीवर कश्या उत्पन्न झाल्या? कोणी निर्माण केल्या याबाबतची कथा पुढीलप्रमाणे आढळते - अमृतमंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी करण्यात आली होती. सापाच्या दोरीने ही रवी घुसळन्यात येत होती. परंतु मंदार पर्वत स्थिर होईना. तो आपल्या वजनाने समुद्रात खोल खोल जाऊ लागला. तेव्हा श्रीविष्णूंनी त्याला आधार दिला. मंदार पर्वत गरगर फिरू लागला. फिरता-फिरता तो श्रीविष्णूंच्या अंगाला घासू लागला. त्याच्या घर्षणाने श्रीविष्णूंच्या अंगावरील केस झडू लागले. हे झडलेले असंख्य केस सागरांच्या लाटांनी पृथ्वीकिनारी आणून टाकले. त्या केसांपासून दूर्वा निर्माण झाल्या असे म्हणतात.

कथा (२) :

दूर्वा महात्म्य एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून 'अनल' नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला.

त्या राक्षसाच्या भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेले आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत, पोळीत, जे काही सापडेल त्याचं भक्षण तो करु लागला. हा प्रकार पाहून सर्वजण भयभित झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले. त्यांची करुणावाणी ऐकून लहान बालकाच्या रुपात गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला "मला तुम्ही अनलासुरापुढे नेऊन सोडा".

श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास अनलासुरापुढे नेऊन सोडले तेथे जाताच छोटा गणेश एकदम पर्वता एवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले. त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला. तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत व्हावा म्हणून प्रत्येकाने काहीना काही दिले : 

  • इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून 'भालचंद्र' म्हटले जाऊ लागले. 
  • ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा दोन मानसकन्या निर्माण करुन त्या अर्पण केल्या. 
  • विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ दिले, त्यामुळे गणेशास 'पद्मपाणी' म्हटले जाऊ लागले. 
  • वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला. 
  • शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशास 'व्यालबद्धोदर' असे नाव प्राप्त झाले. 

इतके उपहार मिळूनसुद्धा श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना. तेव्हा तेथे आलेल्या ८०,००० ऋषिंनी प्रत्येक २१ अशा हिरव्यागार  दूर्वा श्रीगजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या, तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला.

तेव्हा गजानन म्हणाला, "अनेक उपायांनी माझ्या दाहाचं क्षमन झालं नाही, ते दूर्वांनी झालं, म्हणूनच मी या  दूर्वाना प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणा-याला पुण्य लाभेल".

(संदर्भ : ओंकारगणेशा  ब्लॉग ; असे वृक्ष असे देव भाग १ - शा. प्र. दीक्षित ).
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters