ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १९ : बृहती / कांताकारी


१८) बृहती / डोरली / रिंगणी / कांताकारी / काटेरिंगणी / नाईटशेड (Brihatti)

 

 " एकदंताय नम: । बृहस्पतीपक्षं समर्पयामि ।।"


वैशिष्ट्य :

गोवर्धन पूजेत कांताकारीला विशेष महत्व असते.


सर्वसाधारण वर्णन :

हे झाड वांग्यासारखे असून एक काटेरी झुडूप म्हणून ओळखले जाते. याची ऊंची साधारणत: 0.6 ते 2 मीटरपर्यंत असते. याचे तीन प्रकार आहेत ते फुलांवरून ओळखता येतात. या वनस्पतीस पांढरी / जांभळी / पिवळी फुले असतात. पांढरी फुले असणारी वनस्पती इतरांच् तुलनेत उंच आणि ताठ वाढते तर जांभळ्या फुलांची वनस्पती जमिनीवर विपुलतेने पसरत जाते. या वनस्पतीचे खोड लहान असून त्यास मोठ्या प्रमाणावर फांद्या फुटतात. त्या फांद्या लवदार केशयुक्त व तारांकित असतात. या वनस्पतीची पाने अंडाकृती असून त्यावर काटे असतात. फळे गोलाकार असून त्यावर रंगांचे वेडेवाकडे ठिपके असतात. ही सुरुवातीस हिरवट असतात, पिकल्यानंतर पिवळी वा शेंदरी होतात. या फळांना मिनी टरबूज असेही म्हणतात. फळातील बिया गुळगुळीत असतात. 
औषधी उपयोग :
ही वनस्पती गळा व फुफुसांशी संबंधित विकारांवर अत्यंत उपयुक्त आहे. डोरलीची मूळे गुणकारी असून ती त्वचारोग, पोटाचे विकार, मुरडा, वाताच्या विकारांवर, गर्भधारणेसंबंधी विकार व मूत्ररोगात गुणकारी ठरतात. कफ, सर्दी, दम पोटदुखी, डोकेदुखी यावर गुणकारी. याची मुळे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात. घरगुती औषधांमध्ये दातांच्या किडीवर रामबाण उपाय म्हणून याच्या पावडरीची वाफ कीड असलेल्या दातांवर देतात. पाने व फळे विषारी असून अधिक प्रमाणात पोटात गेल्यास हानिकारक असते.

कथा :

पूर्वी गावातील स्त्रिया अत्यंत भक्तिभावाने गोवर्धन पूजा करीत असत. श्रीकृष्णाने बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच पाडव्याला गोवर्ध्रन पुजेस सुरुवात झाली. त्यानिमित्त पाडव्याला श्रीकृष्ण, इंद्र, गोप-गोपिका, यशोदा, सुदामा आणि गोवर्धन पर्वत यांच्या देखाव्यांची पूजा केली जाते.


आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांचे रक्षण व्हावे या हेतूने हि पूजा घातली जाई. गावाच्या मध्यभागी एका ठिकाणी सर्व स्त्रिया एकत्र येवून शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करत. त्यावर कान्ताकारी, कुश आणि इतर तृणमुल्य वनस्पतीच्या डहाळ्या लावल्या जात. त्यानंतर सर्व स्त्रिया तयार केलेल्या गोवर्धन पर्वताच्या भोवती गोल बसत. त्यातील एक स्त्री उठून सर्वाना गोवर्धन पूजेची सुरुवात कशी झाली याबाबतची पुढील कथा सर्वांना ऐकवत असे :


पूर्वी इंद्रास पर्जन्याची देवता म्हणून ओळखला जाई. त्यामुळे पर्जन्यराजाची कृपादृष्टी आपल्यावर होण्यासाठी इंद्रयाग करुन इंद्राला प्रसन्न केले जाई. एकदा असेच सर्व गोपवासी इंद्रदेवाची पूजा करायला निघतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतो इंद्राची पूजा करण्यापेक्षा तुम्ही गोवर्धन पर्वताची पूजा करा, तोच तुम्हाला गाई-गुरांसाठी चारा देतो ज्यामुळे तुम्ही दुधाचा व्यवसाय करु शकता, लाकुडफाडा पुरवितो, अनेक बहुमोल औषधी वनस्पती देतो. त्यामुळे तुम्ही या पर्वताची पूजा करणे म्हणजे निसर्गाची पूजा करणेच जास्त योग्य आहे. हे ऐकून गोपवासीयांनी खरोखर इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली. आपली पूजा बंद झाल्याचे पाहून इंद्र चिडला व त्याने पर्जन्याची भरपूर वृष्टी केली. तेव्हा श्रीकृष्णाने हाच गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलून सर्व गोपवासियांना व त्यांच्या गाई-गुरांना त्या पर्वताच्या मदतीने सुरक्षित ठेवले होते.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters