ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १८ : मधुमालती / मालती


१७) मधुमालती / मालती  (Rangoon Creeper)


सुमुखाय नम:। मालतीपत्रं समर्पयामि ।।"



वैशिष्ट्य :

मधुमालतीलाच माधवी, मालती, हळदवेल किंवा चमेली असेही म्हणतात. या वेलवर्गीय वनस्पतीस भक्कम आधाराची आवश्यकता असते.


सर्वसाधारण वर्णन :

ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. याची पाने सदाहरित असतात तर या वनस्पतीला लाल-गुलाबी / पांढरीदेखील फुले झुबक्यांनी येतात. फुले पाच पाकळयांची असून लांब देठाची असतात. ही फुले सुगंधित असून ती सायंकाळी फुलतात. बीया या तीन पंख असणा-या असतात.


औषधी उपयोग :

मालती / मधुमालती ही उष्ण गुणधर्माची असून रक्तातील दोषांचा नाश करणारी आहे. माधवी / मधुमालती या वनस्पतीत असणा-या औषधी गुणधर्मांमुळे ही वनस्पती खरुज व इतर त्वचाविकारामध्ये फार गुणकारी ठरते. या झाडाची सुगंधी साल विशेषत: दमा व संधिवात यांसारख्या आजारांवरील उपचारांमध्ये उपयुक्त ठरते. विविध प्रकारचे स्त्रीरोग, दमा व फुफुसांचे विकार, डोके, डोळे व दात यांचे आजार यावर गुणकारी आहे.


कथा  : 

ययाती नावाचा राजाला देवयानी आणि शर्मिष्ठा नावाच्या दोन पत्नी होत्या. देवयाणी राणीस यदू नावाचा पुत्र झाला तर शर्मिष्ठास पुरु नावाचा पुत्र झाला. नंतर ययातीच्या घरी आणखीन तीन पुत्ररत्न जन्मास आले आणि राजा ययाती एकूण पाच पुत्रांचा पिता झाला. 

राजा ययाती वृद्ध झाल्यावर इंद्राने त्यास भेटीस बोलाविले. भेटीदरम्यान राजा इंद्र व ययाती यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर राजा ययाती प्रभावित होऊन आपल्या राज्यात परत आला व त्याने आपल्या राज्यातील लोकांना फर्मान सोडले की, सर्वांनी कोणत्याही प्रकारची अभिलाषा वा वासना न बाळगता न्याय, शुद्ध आणि पवित्र आयुष्य जगण्याच्यादृष्टिने आपले वर्तण ठेवावे, जेणेकरुन आपणा सर्वांस अमरत्वाची प्राप्ती होईल.

सर्व प्रजेने राजाची आज्ञा शिरसावंद्य मानली, परिणामी राज्यातील लोकांना मृत्यू येईना. जीवनमृत्यूच्या चक्रावर परिणाम होऊ लागल्याने राजा इंद्र मोठ्या चिंतेत पडला. खूप विचार केल्यानंतर इंद्राने एक युक्ती शोधून काढली. त्याने असुरविंदूमती नामक कामदेवाच्या मुलीस राजा ययातीकडे पाठविले. कामदेवाच्या मुलीचे सौदर्य पाहून राजा ययाती घायाळ झाला. आपण आपल्या प्रजेस केलेला उपदेश तो विसरला. त्याने त्या सुंदर कन्येशी विवाह करण्याचा निश्चय केला. पण राजा ययाती हा वृद्धत्वाकडे झुकलेला तर असुरविंदूमती ही अत्यंत सुंदर व मादक यौवना होती.

राजा ययातीने आपल्या पाचही पुत्रांना बोलावून आपल्या लग्नाचा विचार आणि त्यामध्ये येणारी वृद्धत्वाची अडचण त्यांच्यासमोर मांडली. पुत्रांनी ही अडचण सोडवून आपल्या पित्यास लग्नासाठी मदत करावी अशी इच्छा ययातीने व्यक्त केली. त्यासाठी कोणत्याही एका पुत्राने आपल्या पित्याचे वृद्धत्व पत्करुन आपले तारुण्य त्यास बहाल करावे असा प्रस्ताव होता. पित्याचा प्रस्ताव ऐकताच सर्व पुत्र विचारात पडले. पाचपैकी चार पुत्रांनी या प्रस्तावास नकार दिला तर पुरु नामक अत्यंत निष्ठावंत व प्रेमळ पुत्राने या प्रस्तावाचा स्वीकार करण्यास संमत्ती दर्शविली. ठरल्याप्रमाणे राजा ययातीने वृद्धत्वाच्या बदल्यात आपल्या पुरुनामक पुत्राचे तारुण्य घेतले व असुरविंदूमतीशी विवाह केला. कालांतराने या दांपत्यास कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या म्हणजे वसंत ऋतूचा दूत आहे किंवा वसंत ऋतूच कन्येच्या रुपात अवतरलेला आहे असे प्रतीत होई. तीचे नाव मालती असे ठेवण्यात आले. 

कालांतराने असूरविदूमती स्वर्गात परत गेली. राजा ययातीने नंतर हजारो वर्षे आनंदाने आपल्या निरोगी आयुष्याचा उपभोग घेतला. शेवटी एकदा त्याला तारुण्याचा कंटाळा आला आणि त्याने आपल्या पुत्रास तारुण्य परत केले. ययाती संसारत्याग करुन जंगलात निघून गेला. अन्नपाण्याचा त्याग करुन शेवटी तो मरण पावला व स्वर्गात गेला. त्याच्या पाचही पुत्रांनी वारसाप्राप्त संपत्ती वाटून घेतली. 

पुत्री माधवी एक सुंदर व आकर्षक यौवना झाली होती. एके रात्री वनराईत तिला एका आंब्याच्या झाडाच्या टोकावरुन काहीतरी कुजबूज ऐकू आली. तिने विचारले, "कोण?" त्यावर उत्तर आले, "मी तुझ्यासाठी आलो आहे. माझ्या प्रिये, माझ्याजवळ ये." माधवी आवाजाच्या दिशेने आंब्याच्या झाडाकडे गेली. तीने झाडाच्या बुंध्यास स्पर्श करताच, झाडाचे एका तरुण व रुबाबदार पुरुषामध्ये रुपांतर झाले. तो पुरुष म्हणजे सृष्टीनिर्मात्या प्रजापतीचा अवतार होता. तेव्हापासून आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन आंब्याच्या झाडावर माधवी / मधुमालती ही वेलवर्गीय वनस्पती बनून ते दोघेही एकत्र राहू लागले. 

रुबाबदार आंबा हा जीवनातील सृजनतेचे, भक्कम आधाराचे तर माधवी हे वसंतातील सुंदरतेते यांचे प्रतिक आहे. आंबा हे फळ सृष्टिनिर्मात्याचा आर्शिवाद तर मालती हे प्रेम आणि अध्यात्मिक यश याचे प्रतिक मानले जाते. 

याबाबत आणखीन काही संदर्भ सापडतात. विष्णूचे दूसरे नाव माधव असेही आहे व विष्णूपत्नी म्हणजे माधवी हिच्यामुळे या वनस्पतीला माधवी हे नाव पडले. आंब्याचे झाड हे विष्णूचे प्रतिक मानले जाते तर त्याची पत्नी माधवी हि लता बनून आपल्या पतीसमवेत त्याच्या आधाराने वाढते. तसेच आंब्याचे झाड व माधवी यांना दुष्यंत आणि शकुंतला यांचेही प्रतिक मानले जाते.


(संदर्भ : आंतरजालावरून  साभार )
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters