ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

गोकर्ण महाबळेश्वर स्थापना...


त्रेतायुगात राक्षसांचा राजा ‘रावण’ हा लंकेवर राज्य करीत होता. लंकाधीश रावण हा अत्यंत दृष्ट व महापराक्रमी राजा असला तरीदेखील शिवभक्त म्हणून ओळखला जाई. रावणाची माता कैकसी हीदेखील शिवभक्त होती.

कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन मातीचे शिवलिंग तयार करी, त्याची प्राणप्रतिष्ठा करुन पूजा व अभिषेक करत असे. मात्र समुद्राच्या प्रवाहात हे मातीचे शिवलिंग वाहून जाई. तरीदेखील कैकसीचा नित्यनेम चुकत नसे. हे पाहून एकदा रावण कैकसीस म्हणाला “माते तू रोज मातीचे शिवलिंग तयार करुन त्याची पूजा का करतेस? मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकरांचे आत्मलिंग आणून देतो. आत्मलिंग म्हणजे शंकरांच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग, ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचे फळ मिळते.”

रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्तही होता. आपल्या मातेस महादेवांचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकराची कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, “लंकाधीश, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग.” मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली. शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करुन ते रावणाच्या हाती दिले व म्हणाले, “लंकाधिपती, हे माझे आत्मलिंग आहे. हे तुझ्या लंकापूरीत घेऊन जा, तिथे याची स्थापना कर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस. हे जिथे ठेवले जाईल तिथेच ते स्थापन होईल.” भगवान शंकरांची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला.

भगवान शंकरांनी महापराक्रमी पण दृष्ट रावणास आत्मलिंग दिल्याचे समजताच सर्व देवदेवता चिंतेत पडले. साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेस लाभल्याने दृष्ट रावण अधिक बलशाली व दिग्वीजयी होईल. त्याचा उन्मतपणा आणखी वाढेल व देवगणांना याचा त्रास होईल या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवदेवतांनी श्रीनारदमुनींसह विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे धाव घेतली. श्रीगणेशास आपली विवंचना सांगून रावण आत्मलिंग घेऊन लंकेस पोचता कामा नये अशी विनंती केली. श्रीगणेशाने देवांची विनंती मान्य करुन त्यांना निश्चिंत होण्यास सांगितले.

श्रीगणेश एका ब्राह्मण बालकाचे रुप धारण करुन रावणाकडे निघाले. रावण समुद्रकिनाऱ्याजवळ येताना दिसताच, श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचे नाही मग आता संध्या कशी करायची? असा विचार करीत असतानाच, रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले. रावणाने बालगुराख्यारुपी गणेशास मदत मागितली. रावण गणेशास म्हणाला, “मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत कर. मी समुद्रात जाऊन संध्या करुन येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ, मी लगेचच येतो. पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस.” बालगुराखीरुपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली व त्यास सांगितले, “महाराज, मी आपणांस मदत करण्यास तयार आहे. परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरुन राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणांस तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या अन्यथा मी हे खाली ठेवीन” बालगुराखीरुपी गणेशाचे म्हणने मान्य करुन रावण संध्येस निघून जातो.



रावणाने संध्या सुरु करताच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतो. तो घाईघाईने रावणास तीनदा हाक मारतो व हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेऊ नकोस अशा इशारा रावण लांबून करुनही तिकडे लक्ष न देता गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेऊन देतो. श्रीगणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवदेवता आनंदाने श्रीगणेशावर फूलांची वृष्टी करतात. हे पाहून रावणास कळून चुकते की, हे काम देवदेवतांचेच आहे. क्रोधीत रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आत्मलिंग तसूभरही हलत नाही. मग आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्वशक्तीनीशी आत्मलिंग जोरजोरात हलवितो आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परततो.

गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर). अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले व कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण ‘गोकर्ण महाबळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असेदेखील संबोधले जाते.

आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या. गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले :

१) गोकर्ण महाबळेश्वर - महादेवांचे मुख्य आत्मलिंग 
२) सज्जेश्वर - आत्मलिंग आणलेला डब्बा पडला ते ठिकाण (३५ कि.मी. अंतरावर)
३) धारेश्वर - आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण (४५ कि.मी. अंतरावर)
४) गुनावंतेश्वर - जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण (६० कि.मी. अंतरावर)
५) मुरुडेश्वर - आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण (७० कि.मी. अंतरावर)

अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्रीगणेशामुळे 'गोकर्ण महाबळेश्वर' या ठिकाणी स्थापना झाली.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters