ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

महाभारताचा लेखनिक श्रीगणेश...




महाभारताची रचना ही महर्षी वेदव्यास यांनी केलेली आहे. अर्थात महर्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथ निर्माण केला असला तरी त्यांचा लेखनिक म्हणून श्रीगणेशाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. महर्षी वेदव्यास यांनी कथन केलेले महाभारत श्रीगणेशाने लिहून घेतले आहे.

महर्षी वेदव्यास हे महाभारताचे रचयिताच नाही तर त्या सर्व घटनांचे साक्षीदार म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांपर्यत महाभारत पोचावे ही महर्षी वेदव्यासांची कळकळ होती.

वेदव्यासांनी हिमालयातील एका पवित्र गुहेत तपश्चर्या करुन महाभारतातील घटना आदिपासून-अंतपर्यंत स्मरण करुन महाभारत रचले खरे परंतु त्यानंतर त्यांच्यासमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली. महाभारत हे महाकाव्य वेदव्यास जसजसे कथन करतील तसेच्या तसे त्याच वेगाने न चुकता लिहून काढण्याकरीता त्यांना एका उत्तम लेखनिकाची आवश्यकता होती.

महाभारतासारखे महाकाव्य सहजपणे लिहून घेणे हे काम अत्यंत कठीण होते. महर्षी व्यासांपुढे मोठा पेच निर्माण झाला. मग महर्षी वेदव्यास ब्रह्मदेवांकडे गेले व त्यांनी महाभारताची रचना करण्याकरीता उत्तम लेखनिक सुचविण्यास ब्रह्मदेवांना विनंती केली. ब्रह्मदेवांनी उमा-शंकर यांचा पुत्र श्रीगणेश याचे नाव सुचविले. महाभारत ग्रंथ निर्मितीकरीता गणेशासारखा उत्तम लेखनिक या भुतलावर सापडणार नाही असेही सांगितले.

ब्रह्मदेवांनी सुचित केल्यानुसार वेदव्यास महाभारताचे लिखान करण्याचे निवेदन घेऊन श्रीगणेशाकडे गेले. वेदव्यास श्रीगणेशास म्हणाले, हे गणेशा, सर्वसामान्यांपर्यत महाभारत पोचण्यासाठी महाभारत ग्रंथरचनेचे कार्य मी हाती घेत आहे. या कामी आपण मला लेखनिक म्हणून सहाय्य करावे अशी माझी विनंती आहे.

महर्षी वेदव्यासांचा मानस ओळखून श्रीगणेशाने त्यांनी विनंती मान्य केली खरी परंतु त्यावर त्यांना एक अट घातली. श्रीगणेशाने त्यांनी सांगितले की, महर्षी मी आपणास महाभारत रचनेकामी लेखनिक म्हणून मदत करण्यास तयार आहे परंतु आपण एकदा महाभारत कथन सुरु केल्यानंतर शेवटपर्यंत थांबता कामा नये. ज्या क्षणी आपला मंत्रोच्चार बंद होईल त्याक्षणी माझ्या लेखनीस पूर्णविराम लागेल व मी पुन्हा लेखणी हाती घेणार नाही. ही अट जर आपणांस मान्य असेल तरच मी तुमचा लेखनिक म्हणून तुम्हांस मदत करेल.

श्रीगणेशाने घातलेली अट काही सामान्य नव्हती. महर्षी वेदव्यास हे अनेक ग्रंथाचे ज्ञानी होते. त्यांना ज्ञात होते की कोणत्याही श्लोकाची रचना करताना थोडाफार वेळ तर नक्कीच लागणार. महर्षींनी गणेशाची ही अट मान्य करत मोठ्या चतुराईने त्यासही एक अट घातली. ते म्हणाले, गणराया, मला आपली अट मान्य आहे. परंतु, मी कथन केलेला प्रत्येक श्लोक लिहताना त्याआधी आपणांस त्याचा अर्थ समजायला हवा. अर्थात कोणत्याही श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तो लिहला जाऊ नये.

श्रीगणेशाने महर्षींची अट मान्य केली व महाभारत ग्रंथ रचनेस सुरुवात झाली. महर्षी वेदव्यास मध्ये मध्ये काही कठीण श्लोकांची रचना करत जेणेकरुन गणेशास त्या श्लोकांच्या अर्थावर विचार करावयास वेळ लागे आणि दरम्यान वेदव्यासांना नविन श्लोक रचण्यास वेळ मिळे.

अशा प्रकारे श्रीगणेश आणि महर्षी वेदव्यास यांनी मिळून एक लाख श्लोक असणाऱ्या महाभारत या महान ग्रंथाची रचना केली. संपूर्ण महाभारत लिहण्यास त्यांना एकूण ३ वर्षांचा कालावधी लागला. 
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters