ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग २२ : जाई


२१) जाई (Jasmin)


 " चतुर्भुजाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। "



वैशिष्ट्य : 


जाई हा हस्त नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. जाईला चमेली, जातिका, चंबेली, जस्मिन या नावांनीदेखील ओळखले जाते. जाई ही सुगंधी पुष्पवेल म्हणून प्रसिद्ध आहे. मांडवावर पसरणारी ही वेल श्रावणात पांढ-या मनोहर फुलांनी फुलते व बहरते. जाईच्या फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्वसाधारण वर्णन : 



सरळ रेषेत वाढणारा, सदाहरित जातीचा हा एक देखणं वृक्ष आहे. याचे खोड  मनगटाएवढे जाडही होऊ शकते. याची बाह्याकृती काहीशी शेलाटी असून बारक्या बारक्या फांद्या खाली झुकलेल्या असतात. सालीचा रंग पिवळट, खाकी किंवा काहीसा राखाडी असून साल भेगाळलेली, तडकलेली असते. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असून त्यावरच्या रेषा स्पष्ट असतात. फुलांचे झुबके फांद्यांच्या टोकाशी असतात. जाईची पाने संयुक्तपर्णी असून ५-७ पाकळयांची मिळून एक पान बनते. फुले पांढरी शुभ्र, अत्यंत सुवासिक व नाजूक असून ती सायंकाळी फुलतात. फुलांच्या पाकळया खलच्या बाजून फिक्कट गुलाबी-जांभळट असतात. फुले अल्पायुशी असून सुकल्यानंतर लाल होतात.

उपयोग :


उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे. जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. जाईच्या फुलांत सॉलिसिलिक ऍसिड असल्याने ते जंतुनाशक आणि व्रणनाशक आहे. केसगळतीवर, मुखरोगात जाई उपयुक्त असते. जुनाट तापावरही उपयुक्त. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात. याच्या लाकडाचा उपयोग बारक्या बारक्या लाकडी वस्तू करण्यास होतो.

लोककथा :

एका गावात चमेली नावाची एक सुंदर मुलगी होती. तिला सहा मोठे भाऊ होते, ते सगळे तिचा खूप खूप लाड करीत. परंतु त्या सहाही भावांच्या बायकांना म्हणजे चमेलीच्या भावजयीना ते आवडत नसे. चमेलीचे भाऊ तिला नेहमी छान छान कपडे आणीत. खायला उत्तमसें पदार्थ आणीत. मात्र तिचे इतके लाड केल्याबद्दल भावजयीना तिचा मस्तर वाटे.


एकदा काय झाले, कामानिमित्त सहाही भावांना एकाच वेळी घर सोडून लांब जायची वेळ आली. तेव्हा त्यांनी आपल्या सहाही बायकांना एकत्र बोलावले आणि सांगितले ,"आम्ही आमच्या बहिणीला, चमेलीला तुमच्यावर सोपवून जात आहोत. तिची काळजी घ्या. ती लाडात वाढली आहे. तशीच तिला वागवा!"


भावजयीनी भावांच्या देखत ते कबूल केले. पण भाऊ परगावी गेल्यावर त्यांनी आपली कारवाया सुरु केल्या. चमेलीला बोलावून घेतले. तिचे चांगले कपडे तिला काढायला लावून फाटकेतुटके मळके कपडे तिला घालायला लावले. "घरातील सगळी कामे आजपासून तुला करायचीत" असा तिला हुकूम सोडला. त्या दिवसापासून चमेली रोज घर झाडूनपुसून स्वच्छ करायची. घर सारवायची. स्वयंपाक करायची, भांडी घासायची, कपडे धुवायची. तिला चांगलंचुंगलं खायला पण त्या द्यायच्या नाहीत. उरलंसुरलं शिळंपाकं अन्न त्या तिला खायला लावायच्या. रात्रभर ती थंडीत कुडकुडत राहायची. त्या तिला रोज मारहाण करू लागल्या.


आतापर्यंत चमेलीचे आयुष्य सुखात गेलेले होते. त्यामुळे हा त्रास तिला सहन होईना. बरेच दिवस तिने कसेतरी ढकलले, पण मग मात्र ती चांगलीच आजारी पडली. त्या आजारपणातच औषधपाण्याविना तिचा मृत्यू ओढवला. मग मात्र त्या भावजया घाबरल्या. त्यांनी चमेली मेली असे कोणालाच सागितले नाही. कारण चमेलीच्या शरीरावर माराच्या खुणा ठिकठिकाणी दिसून येत होत्या. अंधार पडेपर्यंत त्या तशाच थांबल्या आणि रात्री त्यांनी तिला बागेच्या एका कोपऱ्यात पुरून टाकले.
 

काही दिवसांनंतर भाऊ परत आले. त्यांना चमेलीच्या मृत्यूबद्दल कळले तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि ते ढसाढसा रडू लागले. पण असा काही प्रकार घडला असेल, आपली बायकांनी तिला जाच केला असेल, असा त्यांना जरासुद्धा संशयही आला नाही. उलट त्यांना त्या बायकांनी सांगितले की चमेलीला तिच्या भावांचा विरह सहन झाला नाही आणि त्या दुःखापोटी ती मेली.


चमेलीला जेथे पुरले होते तेथे एक उंच टवटवीत झाड उभे राहिले. त्याला सुंदर चंदेरी रंगाची फूले फळे आली आणि त्यांच्या सुगंधाने आसमंत दरवळून गेले. त्या सहाही भावांना ते झाड खूप आवडले, पण त्या भावजया त्या झाडाचाही द्वेष करू लागल्या. "ते झाड उपटून टाका" असा त्यांनी आग्रह धरला. त्यांचा हा हट्ट इतका वाढला की एका दिवशी एका भावाने ते झाड उपटायचे ठरवले. कुऱ्हाड व फावडे घेवून तो झाडाजवळ गेला. आता तो कुऱ्हाडीचा घाव झाडावर घालणार, तेवढ्यात ते झाड अचानक बोलू लागले. गोड आणि सौम्य आवाजात ते म्हणाले, "भाऊ, भाऊ, मला तोडू नकोस. अरे मी तुझी चमेली आहे!"


ते ऐकताच तो भाऊ त्या बायकांकडे गेला. त्या चांगल्याच घाबरल्या होत्या. मग त्या एकमेकींना दोष देवू लागल्या. प्रत्येकजण दुसरीला म्हणे, "तू त्रास दिलास चमेलीला!" त्यांच्या बोलाचालीतून सत्य प्रकार सहाही भावांच्या लक्षात आला. त्यांनी त्या बायकांचा त्याग केला.


त्यांनी त्या चमेलीच्या झाडाला मिठी मारली. त्यांना खूप वाईट वाटले. पण त्या वेळेपासून शेवटपर्यंत त्यांनी त्या चमेलीच्या झाडाची खूप काळजी घेतली आणि ते जपले आणि त्या झाडाला चमेली असे नाव पडले.


(संदर्भ : आपले वृक्ष कुळकथा आणि  लोककथा - मनेका गांधी).


नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters