ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

लक्ष्मीदेवींचा मानसपुत्र श्रीगणेश...


विष्णूलोकांत एकदा श्रीविष्णू आणि लक्ष्मीदेवी गप्पा मारत असतात. सर्वत्र एैश्वर्यप्राप्तीसाठी आपली आराधना केली जाते या गोष्टीचा लक्ष्मीदेवींना अहंकार झाल्याचे श्रीविष्णूंना गप्पांमधून जाणवले. लक्ष्मीदेवीचा अहंकार दूर करण्यासाठी श्रीविष्णू लक्ष्मीदेवीस म्हणाले, “देवी तुम्ही एैश्वर्यप्रदाता असून सर्वसंपन्न अशा आहात. संपत्तीप्राप्तीसाठी सर्वत्र आपली आराधना केली जाते. परंतु देवी मातृसुखापासून मात्र आपण वंचित राहीलात याचे मला अत्यंत वाईट वाटते”. श्रीविष्णूंचे हे विधान ऐकताच लक्ष्मीदेवींचा अहंकार तर दूर झालाच परंतु त्या अत्यंत दु:खी झाल्या. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या आपली सखी पार्वतीदेवींकडे गेल्या.


लक्ष्मीदेवींनी पार्वतीदेवींकडे आपले मन मोकळे केले व त्यांना त्यांच्या दोन पुत्रांपैकी (कार्तिकेय व गणेश) एक पुत्र आपल्याला द्यावा अशी विनंती केली जेणेकरुन आपणांसही मातृसुख प्राप्त होईल. पार्वतीदेवींना त्यांचे म्हणणे पटले परंतु आपल्या दोन पुत्रांपैकी कोणता पुत्र लक्ष्मीदेवींस द्यावा याचा पार्वतीदेवींना मोठा प्रश्न पडला. त्यांचे आपल्या दोन्ही मुलांवर तितकेच प्रेम होते. मग पार्वतीदेवींनी मनात विचार केला की, “लक्ष्मीदेवी अत्यंत चंचल आहेत. त्या एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत. त्यामुळे आपण आपला एक पुत्र त्यांना दिला तरी त्या एका ठिकाणी स्थिर राहत नसल्याने पुत्राच्या संगोपनाची जबाबदारी निश्चितच आपल्याकडे येईल”. या विचाराने पार्वतीदेवींनी लक्ष्मीदेवींची मागणी मान्य केली व आपला पुत्र गणेश त्यांना देण्याचे मान्य केले.


श्रीगणेश पुत्र म्हणून मिळाल्याने लक्ष्मीदेवी अत्यंत खुश झाल्या व त्यांनी जाहिर केले की, “यापुढे गणेशास माझ्या मानसपुत्राचा मान दिला जाईल. माझ्याकडील सर्व सिद्धी मी गणेशास प्रदान करीत आहे. माझ्याबरोबर गणेशाची आराधना करणाऱ्यांवर माझी विशेष कृपादृष्टि राहील. त्याचप्रमाणे तिन्ही लोकांत जो कोणी माझा मानसपुत्र, गणेश याची पूजा न करता निंदा करेल ती व्यक्ती कायम लक्ष्मीपासून वंचित राहील” अशा रीतीने श्रीगणेश हा लक्ष्मीदेवींचा मानसपुत्र झाला.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters