दिवाळी हा सण अश्विन महिन्यातील शेवटचे दोन दिवस
आणि कार्तिक महिन्यातले पहिले दोन दिवस असा चार दिवसांचा असतो. वैभवाचे प्रतीक
असणाऱ्या लक्ष्मीपूजनाला दिवाळीत खूप महत्त्व असते. अश्विन महिन्यातील अमावस्येला प्रदोषकाळी
(सायंकाळी) लक्ष्मीदेवीचे पूजन करुन लक्ष्मीपूजन
साजरे केले जाते. प्रत्येकाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता ही लक्ष्मीप्राप्तीतच
असते. यासाठी देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी होऊन आपणांस व आपल्या
कुटुंबीयांस धन-धान्य, सुख-समृद्धी व एैश्वर्य यांची सुब्बता व्हावी या हेतूने दिवाळीत
लक्ष्मीपूजन केले जाते.
लक्ष्मी देवी ही संपत्तीची, एैश्वर्य प्रदान
करणारी देवता असून ती अत्यंत चंचल आहे असा समज आहे. लक्ष्मी देवी हरीप्रिया असून
ती नित्य श्रीविष्णूंच्या सेवेत असते. त्यामुळे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात कायम
रहावे म्हणून नेहमी लक्ष्मीसोबत श्रीविष्णूंची पूजा केली जाते. मात्र दिवाळीत
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा श्रीविष्णूंसोबत केली जात नाही. त्याचे कारण
एकदा बळी नामक अत्यंत पराक्रमी व श्रीमंत राजाने सर्व देवांना आणि लक्ष्मीदेवींना
बंदिस्त केले होते. त्यावेळी लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी म्हणजेच अश्विन महिन्यातील
अमावस्येला श्रीविष्णूंनी वामनाचे रुप धारण करुन लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या
कारावासातून मुक्त केले व ते क्षीरसागरात निद्रिस्त झाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णू
निद्रिस्त असल्याने लक्ष्मीसोबत श्रीविष्णूंची पूजा केली जात नाही. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या
दिवशी लक्ष्मीदेवींसोबत त्यांचा मानसपुत्र श्रीगणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा केली
जाते. [श्रीगणेश
लक्ष्मीदेवींचा मानसपुत्र कसा झाला ही कथा वाचण्यासाठी येथे क्लीक करा]
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एैश्वर्यप्रदाता
देवी ‘लक्ष्मी' यांच्यासोबत ज्ञानदायी
देवी ‘सरस्वती’ आणि विघ्नहर्ता व विवेक
देवता ‘श्रीगणेश’ यांच्या पूजेस विशेष
महत्त्व आहे. देवी लक्ष्मी धन-धान्य आणि समृद्धिचे प्रतिक आहे, देवी सरस्वती
ज्ञानाचे प्रतिक तर विघ्नहर्ता गणेश बुद्धी आणि विवेक यांचे प्रतिक आहेत. लक्ष्मीदेवीच्या
कृपेने संपत्ती प्राप्त होते, किंबहुना संपत्ती प्राप्तीबरोबरच तीचे महत्त्व ज्ञात
असणे, तिचा यथायोग्य विनियोग करुन लक्ष्मी संचय करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
अन्यथा केवळ लक्ष्मीप्राप्तीने मनुष्य अहंकारमय होऊन लक्ष्मी व्यर्थ खर्च करुन
टाकतो.
लक्ष्मीदेवींची पूजा केल्याने संपत्ती, एैश्वर्य
प्राप्त होते. देवी सरस्वतीच्या कृपेने प्राप्त संपत्तीचे महत्त्व व यथायोग्य
विनियोग करण्याचे ज्ञान प्राप्त होते आणि श्रीगणेशाच्या आर्शिवादाने संपत्ती प्राप्तीच्या
मार्गातील विघ्नांचा नाश होतो, प्राप्त संपत्तीचा विवेकाने वापर करण्याची
सद्बुद्धी होते ज्यामुळे समृद्धी टिकून राहते व दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. ज्ञान,
बुद्धी व विवेक असल्याशिवाय लक्ष्मी टिकून राहूच शकत नाही म्हणजेच समुद्धीसाठी लक्ष्मीच्या
जोडीस ज्ञान व विवेक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी म्हणजेच अश्विन
महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीदेवी, सरस्वतीदेवी व श्रीगणेश यांची एकत्र पूजा
केल्याने लक्ष्मी प्राप्तीतील सर्व विघ्ने नाश पावतात. घरात धन-धान्यांची सुबत्ता येऊन
एैश्वर्यप्राप्ती होते. विशेषत: दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकाच वेळी धनवान, बुद्धीवान
आणि समृद्धवान होण्याचा आर्शिवाद प्राप्त होतो.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा