श्रीगणेशास चतुर्थी या तिथीचा स्वामी मानले जाते. भारतीय कालगणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे ‘संकष्ट चतुर्थी’ तर शुक्ल पक्षातील चौथा दिवस म्हणजे ‘विनायक चतुर्थी’ असते. हीच संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यास हा एक अत्यंत शुभ व महत्वपूर्ण योग मानला जातो, व त्यास ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात.
गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने अंगारकीचा उपवास करतात व संकष्ट चतुर्थीप्रमाणे चंद्रोदयाच्या वेळी हा उपवास सोडतात. अशा या अंगारकीचा उपवास केल्यास १२ संकष्ट चतुथींचा उपवास केल्याचे पुण्य मिळते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.
अंगारक संकष्ट
चतुर्थीची कथा
अवंतीनामक नगरात वेद व वेदांगे जाणणारा भरद्वाज नावाचा एक गणेशभक्त्ा ऋषी राहत होता. तो अग्निहोत्री असून शिष्यांना विद्या सांगत असे. एके दिवशी नदीतीरावर जाऊन उभा राहून तो अनुष्ठान करीत असता तिथं एक अप्सरा जलक्रिडा करताना त्याला दिसली. तिला पाहून भरद्वाज ऋषीच्या मनात कामवासना निर्माण झाली. ऋषीच्या कामवासनेतून एक जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रंगाचे बालक निर्माण झाले. धरणीमाता म्हणजेच पृथ्वी या बालकाचे पालन-पोषण आपल्या पुत्र समजून मोठ्या प्रेमानं करु लागली.
सात वर्षे उलटून गेल्यावर या बालकाने धरणीमातेस विचारले, “माते, मी असा इतर मुलांपेक्षा वेगळा कसा काय दिसतो? माझा रंग असा लालभडक का आहे? माझे पिता कोण आहेत? ते मला कधी भेटले का नाहीत?” मुलाच्या प्रश्नांवर धरणीमातेने त्याला त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितली. पृथ्वी केवळ त्याची पालन-पोषण करणारी असून प्रत्यक्षात त्याचे पिता भरद्वाज ऋषी आहेत हे बालकास समजले. बालकाने पित्यास भेटायला जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे पृथ्वी बालकास घेऊन भरद्वाज ऋषींकडे गेली व त्यांना नमस्कार करुन म्हणाली, “मुनीवर, या तुमच्या मुलास मी आजपर्यंत सांभाळलं आहे. आता आपण त्याचा स्विकार करुन यापुढे त्याचे पालन करावे.”
मुलाला भरद्वाज ऋषींकडे सोपवून पृथ्वी निघून गेली. पुत्रप्राप्तीमुळे भरद्वाज ऋषी आनंदित झाले. शुभमुहुर्तावर त्यांनी त्याचे उपनयन केले. वेद व शास्त्रे यांचे ज्ञान त्यास दिले. तसेच त्याला गणेशाचा शुभ मंत्रही देऊन गणेशाचे हे अनुष्ठान तू दिर्घकाळपर्यंत कर असे सांगितले. पित्याच्या उपदेशाप्रमाणे मुलाने नर्मदा नदीकाठी जाऊन तपश्चर्या केली.
एक सहस्त्र वर्ष तपश्चर्या केल्यावर माघ शु्द्ध चतुर्थीच्या दिवशी गजानन त्याला प्रसन्न झाले व इच्छित वर माग असं म्हणाले. त्यावर तो भूमीपुत्र म्हणाला, “मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे, माझं नाव त्रिभुवनात विख्यात व्हावं. तसंच ज्या चतुर्थीस तू मला प्रसन्न झालास ती चतुर्थी कल्याणकारी होवो.”
यावर गजानन म्हणाले, “भूमिपुत्रा, तू देवांसह उत्तम प्रकारे अमृत प्राशन करशील. तसेच ‘मंगल’ या नावानं जगात प्रसिद्ध होशील. अवंती नगरीचे राजपद तुला मिळेल. तू अतिलाल असा वसुंधरापुत्र आहेस. त्यामुळे तुला ‘अंगारक’ असंही म्हटलं जाईल. जे कोणी भूलोकी अंगारक चतुर्थी करतील, त्यांस एक वर्षभर संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ मिळेल. त्यांच्या सर्व कार्यांची निर्विघ्नपणे परिपूर्ती होईल.” असा वर देऊन गजानन अंतर्धान पावले. नंतर मंगलानं त्या ठिकाणी दहा हात व शुंडायुक्त मुख अशी गजाननाची सर्वांगसुंदर मुर्ती तयार करुन तिची स्थापना केली. त्या मूर्तीलाच मंगलमूर्ती असे नाव पडले. हे मंगलमूर्तीचे स्थान पारनेरच्या पश्चिमेस आहे, त्यालाच ‘चिंतामणिक्षेत्र’ असे म्हणतात.
नंतर गणेशाच्या दूतांनी अंगारकास विमानात बसवून गणेशाच्या चरणापाशी नेलं. भौम म्हणजे भुमीपुत्र. भौमवार म्हणजे मंगळवार. चतुर्थीच्या दिवशी त्याला गजानन प्रसन्न झाले म्हणून भौमवारी/मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा