श्रीगणेशास चतुर्थी
या तिथीचा स्वामी मानले जाते. भारतीय कालगणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण
पक्षातील चौथा दिवस म्हणजे ‘संकष्ट चतुर्थी’. गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास
करतात. सायंकाळी पंचांगानुसार, चंद्रोदयाच्या वेळी गजाननाची व चंद्राची पूजा करुन संकष्ट
चतुर्थीचा उपवास सोडला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी
आल्यास हा एक अत्यंत शुभ व महत्वपूर्ण योग मानला जातो व त्यास ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. या अंगारक चतुर्थीपासूनच संकष्ट चतुर्थीच्या व्रताची सुरुवात
करतात. [अंगारक संकष्ट चतुर्थीचे महात्म्य वाचण्यासाठी क्लीक करा]
संकष्ट चतुर्थी
केल्याने पूर्वजन्माचे पाप नाहिसे होऊन धर्म, अर्थ, काम एवं मोक्ष प्राप्तीचा
मार्ग सुलभ होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
संकष्ट चतुर्थीची कथा
कृतवीर्य नावाचा एक बलवान
व अपार वैभव असणारा महापराक्रमी, दाता, महारथी व जितेंद्रीय असा राजा होता. त्याच्याकडे
बारा हजार ब्राह्मण नेहमी भोजनास असत. त्याला सुगंधा नावाची पत्नी होती. परंतु हे
दांपत्य पुत्ररहीत होतं. पुत्रप्राप्तीस्तव त्यांनी अनेक पुण्यकर्म केली, पण जन्म-जन्मांतरीच्या
पापानं यश आलं नाही. शेवटी एकदा अतिदु:खी होऊन कृतवीर्य राजाने आपल्या मंत्र्यांना बोलावलं
आणि सारा राज्यकारभार त्यांच्यावर सोपवून कृतवीर्य राजा पत्नी सुगंधासोबत वनात
निघून गेला. उभयतांनी राजवस्त्र आणि दागदागिन्यांचा त्याग करुन वल्कलं आणि अजिनं परिधान
केली. दोघे पती-पत्नी वनात तप करु लागले.
उभयतांची तपस्या पाहून
नारदमुनी पितृलोकात असलेल्या कृतवीर्याच्या पित्यास म्हणाले, “पुत्र न झाल्याने तुझा
पुत्र कृतवीर्य मृत्यूलोकी राजपदाचा त्याग करुन वनात घोर तपस्या करीत आहे. तो
एक-दोन दिवसात मरेल.” नारदमुनींचं हे बोलणं ऐकून कृतवीर्याच्या पित्यास अत्यंत दु:ख
झाले. आपला कुलक्षय होणार या विचाराने कृतवीर्याचा पिता तात्काळ ब्रह्मदेवांकडे
गेला आणि त्यांना म्हणाला, “माझा पुत्र एवढा सदाचारी आणि सदभक्त असता त्याला पुत्रसंतान
का बरं नाही? राज्य प्रधानांच्या स्वाधीन करुन तो वायुभक्षण करीत वनात राहीला आहे. त्याच्या
अस्थिमात्र शिल्लक राहिल्या आहेत, त्यामुळे तो उद्या किंवा परवा मरेल. प्रभो, जन्मजन्मांतरी
घडलेलं त्याचं पातक ज्या उपायानं नष्ट होईल तो उपाय कृपा करुन मला सांगा.” त्यावर ब्रह्मदेव म्हणाले,
“तुझा पुत्र याच नगरीत पूर्वी साम या नावाचा अंत्यज होता. त्यानं एकदा
द्रव्यलोभापायी बारा ब्राह्मणांचा घात केला होता. त्या ब्राह्मणांस ठार करुन,
त्यांच्या जवळचं सर्व लुटून त्यांची प्रेतं त्यानं एका गुहेत ठेवली होती. त्या
दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. सकाळपासून तो अंत्यज वाटमारी करण्यास टपून बसला
असता ओघानंच त्याला उपवास घडला. सुमारे प्रहर रात्री ही पापकर्म करुन तो घरी आला.
त्याचा गणेश नावाचा एक पुत्र होता. त्याला ‘गणेशा’, गणेशा’ म्हणून त्यानं हाका मारल्या. नंतर त्यानं
पुत्रासह भोजन केलं. अशा रीतीनं अजाणताच त्याला चतुर्थीचं उपोषण घडलं होतं. पण तेवढया
पुण्याईनंच त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. त्या पुण्याईचं पुष्कळ फळ त्यानं
स्वर्गलोकी भोगलं. पण जेव्हा त्याची पुण्याई संपत आली, तेव्हा मृत्यूलोकात राजकुलात
त्याचा जन्म झाला. तोच तुझा पुत्र कृतवीर्य होय. त्यानं पूर्वी ज्या ब्रह्महत्या केल्या
होत्या, त्या पातकामुळं त्याला पुत्रसंतान होत नाही. परंतु तुझा पुत्र जर संकष्टचतुर्थी
व्रत करेल, तर त्याचं पूर्वजन्मार्जित पाप नाहीसं होऊन त्याला पुत्र होईल”. यावर कृतवीर्याचा पिता
अत्यंत खुश झाला व त्याने ब्रह्मदेवांस संकष्ट चतुर्थीचं व्रत सविस्तर सांगण्याची
विनंती केली.
ब्रह्मदेव पुढे
सांगू लागले, “ज्या दिवशी माघ चतुर्थी मंगळवारी येईल (अंगारकी), त्या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रतास आरंभ करावा.
उपवास करुन गजाननाचा मंत्र जपावा. पापनिंदा न व्हावी म्हणून मौनाचा स्विकार करावा.
परद्रोह, दुर्जनपणाची दृष्ट कृत्य वर्ज्य करावीत. सायंकाळी गजाननाचं षोडशोपचारानं
पूजन करावं. नंतर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू यापैकी कोणत्याही पदार्थाचा
नैवेद्य दाखवावा. गजाननास २१ दुर्वा अर्पण करुन आरती ओवाळावी. नंतर चंद्रोदयाच्या
वेळी चंद्राची अतिथीस्वरुपात पूजा करावी. चंद्राला अर्ध्य अर्पण करुन करुन प्रथम
गणपतीस व नंतर चंद्रास नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास ब्राह्मणास भोजन घालावं. अशा
प्रकारे भक्तीभावाने जो कोणी वर्षभर अढळ भक्तीने हे संकष्ट चतुर्थी व्रत करील,
त्याला पुत्र संतती होईल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.” व्रताची माहिती घेतल्यावर
ब्रह्मदेवांना वंदन करुन कृतवीर्याचा पिता निघाला. कृतवीर्य मृत्यूलोकांत होता तर
त्याचा पिता पितृलोकांत. त्यामुळे ब्रह्मदेवांनी कथन केलेलं संकष्ट चतुर्थीचं व्रत
मुलास देण्यासाठी कृतवीर्याचा पिता त्याच्या स्वप्नात गेला.
कृतवीर्याच्या स्वप्नात
जाऊन त्याचा पिता म्हणाला, “मुला, तू पुत्रप्राप्तीसाठी अनेक प्रकारे परिश्रम करीत
आहेस. तेव्हा आता मी सांगतो तो उपाय कर. नारदमुनींच्या भेटीनंतर मी ब्रह्मदेवांकडे
गेलो व त्यांना तुला संततीप्राप्ती व्हावी यासाठी काय करता येईल हे विचारले.
त्यावर तुझ्या पुत्रास संकष्टीचतुर्थीचं व्रत करायला सांग असे ब्रह्मदेव म्हणालेत.
पुत्रा, ब्रह्मदेवांनी कथन केल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीचं व्रत तू एक वर्षभर कर म्हणजे सर्व संकटांचं हरण करणारा सिद्धीविनायक प्रसन्न होईल
व त्याच्या कृपाप्रसादानं तुला पुत्रप्राप्ती होईल.” असे सांगून कृतवीर्याचा पिता अंर्तधान पावला
आणि कृतवीर्य स्वप्नातून जागा झाला.
यानंतर कृतवीर्य
पत्नीसमवेत आपल्या राज्यात परतला व त्याने आपल्या पित्याने स्वप्नात सांगितलेले
ब्रह्मदेवकथीत संकष्ट चतुर्थी व्रत मोठ्या भक्तीभावाने केले. गजाननाच्या मंत्राचा
जप केला. जप, हवन, पूजन करुन असंख्य ब्राह्मणांना भोजन घालून, दहा हजार गायी देऊन,
दीन, अंध, दरिंद्री लोकांस अन्नदान करुन सर्व ब्राह्मणांकडून पुत्र प्राप्तीचे
आर्शीवाद घेतले. थोडयाच काळात राजाची पत्नी गर्भवती झाली व शुभसमयी त्यांना पुत्रप्राप्ती
झाली. त्याचे नाव ‘कार्तवीर्य’ ठेवले गेले व हाच पुत्र पुढे ‘सहस्त्रार्जुन’ या नावानेदेखील ओळखला जाऊ
लागला.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा