श्रीगणेशास १२ वर्ष पूर्ण झाल्याने भाद्रपद चतुर्थीच्या शुभदिनी पार्वतीने बारा वर्षे झालेल्या आपल्या बालकास न्हाऊ घालून, कुंकूमतिलक लावले. सुवासिनींना आमंत्रित करुन त्यांना वायने म्हणजेच उत्सवानिमित्त दिली जाणारी मिठाई दिली. इतक्यात श्रीविष्णूंचा परमभक्त असणारा ‘विश्वदेव’ नावाचा एक दैत्य तिथे आला. शंख, चक्र, गदा, पद्म यांनी त्याचे शरीर सुशोभित दिसत होते.
पार्वतीने अचानक आलेल्या या ‘विश्वदेव’ नामक अतिथीचे यथोचित स्वागत केले. त्याला आसन ग्रहन करण्यास सांगून गणेशाने त्याचे पाय धुतले. पार्वतीने विश्वदेवास भोजन वाढले. पण विश्वदेव मात्र भोजन ग्रहन न करता चिंतातूर होऊन तसाच बसून राहिला. पार्वती त्यास भोजनाचा आग्रह करु लागली. त्यावर विश्वदेवाने सांगितले, “मी नेहमी श्रीविष्णूंना पाहून त्यांना नमस्कार करुनच भोजन करतो. पण आज मात्र श्रीविष्णूंना नमस्कार करण्याचे विसरलो आता मी भोजन कसे काय ग्रहन करु?” यावर गणेश त्यांना म्हणाला, “तुमच्या मनात जर श्रीविष्णूंबद्दल दृढ भाव असेल तर तुम्हाला तुमच्या पद्मनाभाचं (श्रीविष्णूंचं) दर्शन इथंच होईल. केवळ जन्मजन्मांच्या पुण्याईनं आज पार्वतीमातेच्या हातचं अन्न ग्रहन करण्याचा योग तुम्हांस प्राप्त होत आहे.”
त्यावर विश्वदेव म्हणाला, “मी रमापती श्रीविष्णूंचा दास आहे. यास्तव मी दुसऱ्या कुणालाही नमस्कार करणार नाही. तू जर सर्वरुप असशील तर जो अनामय नारायण विश्वेश्वर, त्यास दाखव.” त्यावर गणेश गुप्त झाला आणि लगेच विष्णूरुपात प्रकट झाला. विश्वदेवाने पितांबरधारी, शंख, चक्र, गदा पद्मधारी अशा त्या नारायणरुपी गणेशास नमस्कार केला आणि म्हणाला, “आज मी व माझे पितर धन्य झाले.” श्रीविष्णूंरुपी गणेशाने भक्तास आलिंगन दिले आणि म्हणाले, “माझ्याकरीता तू भोजन नाकारलंस. तुझा हा दृढ निश्चय आणि भक्ती पाहून मी क्षीरसागराहून इथं आलो. मला भक्त सदा प्रिय आहेत.”
श्रीविष्णूंना नमस्कार करुन विश्वदेवाने भोजन ग्रहन करण्यास सुरुवात केली. भोजन झाल्यावर गणेशाने विश्वदेवाला त्यांच्या मनातील भेदाभेद वृत्ती जाण्यासाठी एका बालकाची गोष्ट सांगितली - “भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सर्व मुनीपुत्रांनी मृत्तिका (माती) आणून आपापल्या मतीप्रमाणे गणेशाच्या विविध मूर्ती तयार केल्या. या मुनीपुत्रांमध्ये महात्मा वसिष्ठांचा चार वर्षांचा नातू ‘पराशरमुनी’ हा ही होता. त्यानेही गणेशाची मातीची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीची पूजा केली, मूर्तीपुढे नृत्य केले. मातीच्या मूर्तीस मोठ्या आनंदाने नैवेद्य दाखविला व हा नैवेद्य तू खा असे म्हणून तो मूर्तीकडे हट्ट करु लागला. बालकाचा भक्तीभाव पाहून मातीची गणेशमूर्ती सचेतन झाली व तिने नैवेद्य खाल्ला.”
ही गोष्ट विश्वदेवास सांगत असताना गणेश कधी श्रीविष्णू तर कधी गणेशाच्या रुपात दिसू लागला. हे पाहून विश्वदेवाच्या मनातील श्रीगणेश आणि श्रीविष्णूंचे अभेदत्व नाश पावले.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा