ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

एकवीस (२१) या अंकाचे गणेश पूजनातील महत्त्व...


सुखकर्ता व दु:खहर्ता असा श्रीगणेश हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर श्रीगणेशाची आराधना केली जाते. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये श्रीगणेशास अग्रमान दिला जातो. कोणत्याही शुभ कार्यास सर्वप्रथम श्री गणेशाय नम: म्हणून सुरुवात केली जाते. शुभकार्य करताना येणारी अमंगल विघ्ने श्रीगणेश कृपेने दूर व्हावीत हा त्यामागील हेतू असतो. ही विद्येची देवता असल्याने विद्या अध्ययनास सुरुवात देखील श्रीगणेशा करुनच होते. श्रीगणेश हा सकल विघ्नांचे हरण करणारा व मंगलमूर्ती असून त्याच्या पूजनाने सुख-समृद्धी, यश-ऐश्वर्य, विद्या-बुद्धी प्राप्त होते.

श्रीगणेशपूजानात तसेच गणेश उपासनेमध्ये एकवीस (२१) या अंकास विशेष महत्त्व असल्याचे खालीलप्रमाणे दिसून येते :

1) एकवीस नामावली : विद्याप्राप्तीसाठी, शुभकार्यप्रसंगी, संकटकाळी श्रीगणेशाची २१ नावे उच्चारल्यास मंगलकारक अनुभव येतात. त्याचप्रमाणे शत्रुपिडा निवारणार्थ २१ नावांचा जप केला जातो. गणेशास नैवेद्य दाखवितानाही ही २१ नावे घेतली जातात. गणेशाची २१ नामावली खालीलप्रमाणे –

हेरम्बाय नमः || सुराग्रजाय नमः || उमापुत्राय नमः || वक्रतुंडाय नमः || गजमुखाय  नमः || हरसूनवे नम:  || शूर्पकर्णाय नम:  || गणाधीशाय  नम: || लंबोदराय  नम:  ||   गुहाग्रजाय नम: ||   विनायकाय नम:  ||   कपिलाय नम:  ||   भालचंद्राय नम:  ||   सिद्धिविनायकाय नम:  ||   सर्वेश्वराय नम:  ||   विकटाय नम: ||   सुमुखाय नम: ||   एकदंताय नम:  ||   बटवे नम:  ||   विघ्नराजाय नम:  ||   चतुर्भुजाय नम: ||

2) एकवीस वृक्षवल्लरी : गणेशउत्सवामध्ये गणपती बसतात त्या दिवशी (भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीला) श्रीगणेशास २१ प्रकारच्या पत्री म्हणजेच विविध वृक्षवल्लींची पाने मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने अर्पण केली जातात. त्यात पिंपळ, देवदार, बेल. शमी, दूर्वा, धोतरा, तुळस, माका, बोर, आघाडा, रुई/मंदार, अर्जुनसादडा, मरवा, केवडा, अगस्ती/हादगा, कण्हेर, मालती/मधुमालती, बृहती, डाळींब, विष्णूकांत / शंखपुष्पी, जाई यांचा समावेश असतो. या प्रत्येक पत्रीचे गणेश पूजनातील तपशीलवार महत्त्व जाणून घेण्याकरीता क्लीक करा.

3) एकवीस फुले : गणेशास २१ प्रकारची फुले वाहिली जातात - जास्वंद, बकुळ, चमेली, धोतरा, गुलमोहर, जाई, जुई, जांभळी रुई, हातगा, केवडा, कण्हेर, लाल कमळ, मांदार, मधुमालती, मोगरा, मरवा, पारिजातक, नागकेशर, पांढरे कमळ, सोनचाफा, शेवंती इ.

4) एकवीस दूर्वा : श्रीगणेशास दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणेशपूजेत पांढऱ्या रंगाच्या दूर्वेला जास्त महत्त्व आहे. दूर्वा या नेहमी विषम संख्येने (किमान ३ किंवा ५, ७, २१) वाहतात. श्रीगणेशास विशेषकरुन २१ दूर्वा वाहिल्याने त्या अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते.

5) एकवीस मोदकांचा नैवेद्य : नैवेद्यामध्ये श्रीगणेशास मोदक अतिप्रिय आहेत. मोदकाचा आकार नारळासारखा असून ते महाबुद्धीचे व ज्ञानाचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असेही म्हणतात. मोद म्हणजे आनंद व म्हणजे छोटासा भाग; याचाच अर्थ मोदक म्हणजे आनंदाचा छोटासा भाग होय. गणेशास २१ मोदकांचा नैवेद्य हा श्रेष्ठ समजला जातो. २१ मोदकांचा नैवेद्य २१ नामांच्या मंत्रोच्चरासहीत गणपतीस अर्पण केल्यास गणेश नामावलीचा हजार जप केल्याचे पूण्य मिळते व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विद्यार्थ्यांनी ही आराधना केल्यास त्यांना प्रखर बुद्धीमत्ता लाभते.

6) एकवीस गणेशस्थाने : मोरगाव–मयुरेश्वर, काशी–ढुंढिराज, प्रयाग–ओंकारगणेश, कदंब-चिंतामणी, आधासा-शमीविघ्नेश, पालि-बल्लाळेश्वर, पारिनेर-मंगलमूर्ती, गंगामसले-भालचंद्र, राक्षसभुवन-विज्ञानगणेश, थेऊर-चिंतामणी, सिद्धटेक-सिद्धीविनायक, रांजणगाव-त्रिपुरारीवरद, विजयपूर-विघ्नराज, कश्यापाश्रम-विनायक, गणेशपूर-गणेश, लेण्याद्री-गिरीजात्मज, वेरुळ-विनायक, एरंडोल-प्रवाळगणेश, नामलगाव-आशापूरक गणेश, राजूर-महागणपती, कुंभकोणम-श्वेतगणेश.

7) गणेशाने संहार केलेले २१ राक्षस : अनलासुर, देवांतक, दंभासुर, गजासुर, कमलासुर, क्रोधासुर, कामासूर, कैटभ, लोभासुर, मायासुर, मधु, मोहासूर, मदासूर, मत्सरासुर, मेषासुर, मलकासूर, नरांतक, सिंदुरासुर, त्रिपुरासुर, विघ्नासुर, व्योमासुर.

8)  एकवीस अंकाशी निगडीत काही गणेश उपासना :

§ चतुर्थीपासून दररोज ओळीने २१ दिवस शक्यतो ठराविक वेळी ठराविक गणेशमूर्तीचेच दर्शन घेणे

§ गणेश मंदिरास २१ प्रदक्षिणा घालणे

§   गणेश मंदिरावर २१ नारळांचे तोरण बांधणे

§   २१ दूर्वांची माळ श्रीगणेशास २१ दिवस घालणे

§   २१ दिवस गणेशास दूर्वा वाहिल्याशिवाय न जेवणे

§   ओळीने २१ चतुर्थ्या उपवास करणे

§   २१ दिवसांचे गणेशव्रत : श्रावण शुद्ध चतुर्थी ते श्रावण वद्य चतुर्थी गणपतीची २१ दिवस दररोज पूजा करावी. गणेशास २१ दूर्वा, २१ पत्री व २१ फुले, २१ प्रदक्षिणा, २१ अर्घ्य व २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणास १० मोदकांचे वायन द्यावे.

§   तिळी चतुर्थी व्रत : हे व्रत माघ शुद्ध चतुर्थीस करावे. गणेशपूजन करुन दिवसभर उपवास करुन रात्री सोडावा. पांढऱ्या तीळाच्या २१ लाडवाचा नैवेद्य श्रीगणेशास दाखवावा.

§   अंगारकी चतुर्थीच्या एका दिवशी अथवा इतर कोणतेही ओळीने २१ दिवस शमी अथवा मंदार वृक्षाच्या मुळाशी बसून उपासना करावी आणि शास्त्रोक्त पूजापूर्वक त्याची मुळी काढून त्यातून गणेशमूर्ती बनवून घ्यावी. नंतर त्याची २१ वर्षे सतत उपासना घडल्यास गणेश अवश्य प्रसन्न होतो.

§   अथर्वशीर्ष उपासना : २१ अक्षता घ्याव्यात. एक-एक अक्षता अथर्वशीर्ष मंत्राने गणपतीवर वाहून आवाहन करावे. नंतर ताम्हणात मूर्ती घेऊन २१ अथर्वशीर्ष मंत्रानी अभिषेक करावा. त्यानंतर आसनावर २१ दूर्वांकूर प्रत्येकी एक-एक अथर्वशीर्षाने मंत्रून आसन तयार करावे व त्यावर श्रीगणेशाची स्थापना करावी. पुन्हा २१ दूर्वांकूर अथर्वशीर्षाने मंत्रून गणेशावर वहावे. शेवटी २१ अक्षतांनी पहिल्याप्रमाणे अथर्वशीर्षाने मंत्रून गणपतीवर वहावे. हा विधी चतुर्थीला सुरु करुन २१ दिवस चालू ठेवावा. २२ व्या दिवसापासून रोज प्रत्येकी एका अथर्वशीर्षमंत्राने एक असे २१ वेळा रोज हवन करायचे. असे चतुर्थीपर्यंत करावे व चतुर्थीच्या दिवशी उपवास करुन रात्री सुवासिनी-ब्राह्मणांसह उपवास सोडावयाचा. या ३०/३१ दिवसांच्या काळात गं गणपतये नमः या मंत्राचा फुरसतीचे वेळी जप चालू ठेवावा.

भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्रीगणेशाच्या आराधनेमध्ये बहुतांशवेळा हा २१ आकडा का बरं येत असावा?

२१ आकडयाचे गणेश पूजनातील महत्त्व जाणून घेण्याकरीता गणेश उपासनेच्या सगुणोपासनाया प्रकाराचा  आधार घेण्यात आला आहे. त्रेतायुगात मयुरेश अवतारामध्ये गणेशाने गणेश आराधनेबाबत निरुपन केले आहे.  या निरुपनामध्ये सगुणोपासना व निर्गुणोपासना याचे विवेचन आहे. सविस्तर वाचण्याकरीता क्लीक करा.

गणेशगीता विषद करताना गणेशाने राजा वरेण्यास सगुणोपासनेबाबत सांगितले आहे की, माझ्या साकार रुपाची भक्तीभावाने सेवा करतो त्याची आराधना मला मान्य आहे. कारण तो भक्त पंचमहाभूतांचे हित करणारा, आपले हृदय माझ्यात निमग्न करणारा व इंद्रियास आपल्या अंकीत ठेवणारा उपासक असतो. जो सर्व भावांच्या आणि विकारांच्या पलिकडे गेला आहे तो भक्तीमान मला प्रिय आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, पंच कमेंद्रीये, पंच ज्ञानेंद्रिये आणि मन या सर्वांच्या सत्वाचा स्विकार करुन माझी भक्ती करणे योग्य. एखाद्या भक्तास काही जरी समजत नसले, तो फारसा ज्ञानी नसला तरी सर्व विद्वानात तो श्रेष्ठ आहे. भक्तीने भजन करणारा चांडालदेखील मला ब्राहृणाहून श्रेष्ठ वाटतो. यासाठी राजा, भक्तीनेच तू मला येऊन मिळावेस हेच श्रेयस्कर. अंत:करण निश्चयाने मला समर्पण कर

सगुणोपासनेस अनुसरुन ज्ञानेंद्रीये, कमेंद्रीये, पंचप्राण, पंचमहाभूते व मन यासर्वांपासून एकवीस (२१) या अंकास गणेशपूजनात महत्त्व मिळाल्याचे दिसून येते. २१ या अंकाची उक्ती खालीलप्रमाणे :
२१= (५+५+५+१)
५ – ज्ञानेंद्रीये (त्वचा, नाक, कान, डोळे, जीभ)
५ – कमेंद्रीये (हात, पाय, वाणी, उपस्थ, गुद, मन)
५ – पंचप्राण (प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान)
५ – पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश)
१ – मन

अशा प्रकारे २१ अंकाचा उपयोग करुन उपासना केल्यास गणेशाची सगुणात्मक उपासना केल्याचे फळ प्राप्त होते.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters