महोदर इति ख्यातो
ज्ञानब्रहृमप्रकाशक: |
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ||
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ||
(अर्थ : श्रीगणेशाचा महोदर अवतार हा ब्रहृमज्ञान
प्रकाशक असुन, मोहासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे)
श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘महोदर’ हा तिसरा अवतार मोहासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. तारकासुर नामक दैत्यराज सर्व देवदेवतांना आणि ऋषि-मुनींना त्रास देत होता. सर्व धार्मिक कार्यांमध्ये विघ्न निर्माण करत हाता. त्यामुळे जप, तप आणि यज्ञांसारखी धार्मिक कार्यांमध्ये बाधा निर्माण होत होती. तारकासुराच्या कृत्यांमुळे सर्व ऋषि-मुनी हैराण झाले होते. त्यावेळी महादेवांच्या आर्शिवादाने त्यांचा पुत्र कार्तिकेय याने असुरांचा राजा तारकासुर याचा वध केला.
तारकासुराच्या वधाने असुरांवर मोठे संकट निर्माण झाले. दैत्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कोणत्या असुरास दैत्यराज पद बहाल करावे या विचाराने दैत्यगुरु शुक्राचार्य यांना ग्रासले. मोहासुर नामक एक पराक्रमी राक्षस दैत्यगुरु शुक्राचार्यांचा शिष्य होता. शुक्राचार्यानी त्यास दैत्यराज पद बहाल करता येऊ शकते असा विचार केला व त्यास तपश्चर्या करण्यास सांगितले. दैत्यगुरुंच्या आज्ञेनुसार मोहासुराने सुर्यदेवांची कठोर तपश्चर्या केली व सुर्यदेवास प्रसन्न करुन घेतले. सुर्यदेवांकडून मोहासुराने सर्वत्र विजयी होण्याचे वरदान मिळविले. वरदान मिळताच मोहासुर दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे आला व त्यांना हकीकत सांगितली. शुक्राचार्यांनी मोहासुरास दैत्यांचा राजा घोषीत केले व त्याचा राज्यभिषेकदेखील केला.
मोहासुराने आपल्या पराक्रमाने त्रिलोकांवर विजय मिळविला. तिन्ही लोकांवर मोहासुराचे राज्य प्रस्थापित झाले, सगळीकडे हाहाकार माजला. सुर्यदेवांच्या वरदानामुळे उन्मत्त झालेला मोहासुर सर्वांना त्रास देऊ लागला. त्याच्या भयाने त्रिलोकांमधील सर्व देवदेवता आणि ऋषि-मुनी घाबरुन गेले. सुर्यदेवांच्या वरदानामुळे मोहासुरास सर्वत्र विजय प्राप्त होत आहे त्यामुळे मोहासुराच्या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवदेवता आणि ऋषि-मुनी सुर्यदेवांकडे गेले व त्यांना मोहासुराच्या जाचातून सुटका होण्याचा मार्ग विचारला.
सुर्यदेवांनी त्यासर्वांना श्रीगणेशाच्या एकाक्षरी मंत्राद्वारे गणेशाची आराधना करण्यास सांगितले. मोहासुराच्या त्रासातून त्रिलोकांना वाचविण्यासाठी सर्व देवदेवता आणि ऋषि-मुनी श्रीगणेशाची आराधना करु लागले. त्यांच्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन श्रीगणेश महोदर या अवतारात प्रकट झाले. सर्वांनी श्रीगणेशाची मनोभावे स्तुती केली व मोहासुराच्या त्रासातुन त्रिलोकांस मुक्तता मिळवून द्यावी अशी याचना केली. सर्वांना मोहासुराच्या त्रासातून निश्चितच मुक्त करेन असे आश्वासन देऊन महोदर उंदिरावर स्वार होऊन मोहासुराशी यु्द्ध करण्यास रवाना झाले.
इकडे देवर्षी नारदमुनींनी ही बातमी मोहासुरापर्यंत पोचविली आणि महोदराच्या अनंत पराक्रमी़, दिव्य आणि अनंतकोटी ब्रहृमांडे ज्याच्या उदरात सामावली आहेत अशा महोदराच्या स्वरुपाबाबतही सांगितले. दैत्यगुरु शुक्राचार्यांनीदेखील मोहासुरास महोदरास शरण जाण्याबाबत सुचित केले. तेवढयात महोदराचा दूत म्हणून भगवान विष्णू मोहासुराकडे आले व त्यास म्हणाले, “असुरराज मोहासुर, मी अनंत पराक्रमी भगवान महोदर यांचा दूत आहे. तुम्ही महोदरास शरण जाऊन त्रिलोकांस धर्मपूर्वक जीवन व्यतीत करण्यामध्ये कोणतीही बाधा आणणार नाही असे वचन दिल्यास भगवान महोदर तुम्हाला क्षमा करतील. जर तुम्ही त्यांना शरण नाही गेलात तर मात्र युद्धभुमीवर तुमचा बचाव असंभव आहे.” हे ऐकताच मोहासुराचा अहंकार नष्ट झाला. त्याने भगवान विष्णूंना सांगितले की, “तुम्ही भगवान महोदरांना आमच्या नगरात आणून त्यांच्या दर्शनाचा लाभ आम्हांस करुन द्यावा.” यावर भगवान महोदराने मोहासुराच्या नगरीत प्रवेश केला.
मोहासुराने महोदरांचे यथोचित स्वागत केले. त्यांच्या स्वागताला पुष्पवृष्टी केली त्यांना वाजतगाजत महालात आणले. त्यांची श्रद्धापूर्वक पूजा-अर्चा करुन स्तुती केली. आपल्याकडून झालेल्या अपराधांची क्षमायाचना केली. भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे मोहासुराने त्रिलोकांस धर्मपूर्वक जीवन व्यतीत करण्यामध्ये कोणतीही बाधा आणणार नाही असे वचन महोदरास दिले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महोदराने मोहासुरास अभय दिले, त्याच्या अपराधांना क्षमा केली. मोहासूराने महोदरास वचन दिल्याप्रमाणे देवदेवता आणि ऋषि-मुनी यांना त्रास देणे बंद केले. सर्व धार्मिक कार्ये निर्विघ्नपणे पार पडू लागले. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, मोहाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या मोहाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या महोदरास प्रणाम असो!!!
~*~
- 'अष्टावतार श्रीगणेशाचे भाग २ : एकदंत' ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
- 'अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ४ : गजानन' ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा