ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

अष्टावतार श्रीगणेशाचे भाग २ : एकदंत


एकदंतावतारौ वै देहिना ब्रह्मधारकः |
मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः || 

(अर्थ : श्रीगणेशाचा एकदंत अवतार हा ब्रम्हांडस्वरुप सर्व देहांना धारण करणारा, मदासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे)


श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘एकदंत’ हा दुसरा अवतार मदासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. महर्षी च्यवन यांनी आपल्या तपश्चर्येने मदासुर या दैत्यास निर्माण केले. पुढे हा मदासुर अत्यंत बलवान व पराक्रमी असा दैत्य च्यवनपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. मदासुरास समस्त ब्रह्मांडावर राज्य करण्याची प्रबळ इच्छा होती. याकरीता त्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचेकडे जाऊन आपली इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्यांनी मदासुरास आपले शिष्य बनवून घेतले व प्रकृतीच्या (देवी शक्तीच्या) एकाक्षरी मंत्राची दिक्षा दिली. मदासुराने शक्तीची दीक्षा घेतली व तो वनात तपश्चर्येसाठी निघून गेला. मदासुराने घाेर तपश्चर्या सुरु केली. 

मदासुराची कठोर तपश्चर्या बरीच वर्षे चालू होती, त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारुळे तयार केली, त्याच्या आसपास वृक्षवेली तयार झाल्या. त्यानंतर त्याच्या तपश्चर्येवर देवी प्रकृती प्रसन्न झाली व तिने मदासुरास सदैव निरोगी राहण्याचे व ब्रह्मांडावर राज्य करण्याचे वरदान दिले. 

मदासुराने सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे स्वर्गाकडे आगेकूच केले व इंद्रदेवांस पराभूत करुन स्वर्गदेखील काबीज केला. त्यानंतर त्याने प्रमदासुर या दैत्याच्या सालसा नामक कन्येशी विवाह केला. दैत्यकन्या सालसेल तीन पुत्र झाले. मदासुराने कैलासपती महादेवांसही पराजित केले. आता मदासुराचे त्रिलोकावर शासन प्रस्थापित झाले. मदासुराने सगळीकडे हाहाकार माजविण्यास सुरुवात केली. त्रिन्ही लोकांना त्याने जेरीस आणले.

शेवटी सर्व देवदेवता श्रीगणेशास शरण गेले व त्यांनी मदासुराच्या त्रासापासुन मुक्ती मिळण्यासाठी श्रीगणेशाची आराधनेस सुरुवात केली. त्यांच्या तपश्चर्येस शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्रीगणेश त्यांचेसमोर एकदंत या अवतारामध्ये प्रकट झाले. एकदंताचे स्वरुप अत्यंत भयानक होते, भव्य शरीर व हातात परशु, पाश अशी आयुधे असून ते उंदरावर स्वार होते. एकदंताने देवदेवतांना मदासुरापासून मुक्तीचे वरदान दिले. 

इकडे नारदमुनींनी मदासुरास सुचित केले की एकदंताने सर्व देवदेवतांना वरदान दिलेले आहे व आता एकदंत तुझा अंत करण्याकरीता तुझ्याशी युद्ध करणार आहेत. हे समजताच मदासुर क्रोधाने भडकला व आपल्या सर्व सैन्य घेऊन एकदंताशी यु्द्ध करण्यास निघाला.

मदासुर व एकदंत युद्धासाठी एकमेकांना सामोरे आले. एकदंताने मदासुराच्या दूताकडे निरोप पाठविला, “तुला जर जिवंत रहायचे असेल तर देवदेवतांचा द्वेश करणे बंद कर, त्यांचे राज्य त्यांना परत कर. तू जर असे केले नाहीस तर तुझा अंत निश्चित आहे.” हे एकून मदासुर क्रोधान युद्धास सरसावला. त्याने आपल्या धनुष्यावर बाण सरसावला पण तेवढयात एकदंताचा परशू मदासुरास येऊन लागला व मदासुर बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर मदासुरास कळून चुकले की एकदंत म्हणजेच सर्वसामर्थ्यशाली परमात्मा आहेत. मदासुर एकदंतास शरण आला. मदासुराने एकदंताची क्षमा मागितली व श्रीगणेशाची दृढ भक्ती आपणांस प्राप्त व्हावी यासाठी त्यांची स्तुती करु लागला. 

एकदंताने मदासुरावर प्रसन्न होऊन सांगितले की, “माझी भक्ती करायची असेल तर यापुढे जिथे माझी पूजा-अर्चना चालू असेल तिथे तू अजिबात जायचे नाहीत. यापुढे तू पाताळात जाऊन रहा.” त्यानुसार मदासुर पाताळात निघून गेला व सर्व देवदेवता आनंदाने एकदंताचा जयजयकार व गणेशस्तुती करु लागले. 


त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, मदाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवतांना त्रास देणाऱ्या असुराच्या द्वेशाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या एकदंतास प्रणाम असो!!!

~*~

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters