ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

अष्टावतार श्रीगणेशाचे भाग १ : वक्रतुंड


वक्रतुण्डावताराश्च देहिनां ब्रह्मधारकः |
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः || 


(अर्थ : श्रीगणेशाचा वक्रातुंडावतार हा ब्रम्हांडस्वरुप सर्व देहांना धारण करणारा, मत्सरासुराचा संहारक आणि सिंह या वाहनावर आरुढ असा आहे)


श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘वक्रतुंड’ हा पहिला अवतार मत्सरासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. देवराज इंद्राच्या आर्शीवादाने मत्सरासुर राक्षसाचा जन्म झाला. हा मत्सरासुर शिवभक्त होता त्याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून भगवान शंकरांची शिव पंचाक्षरी (ॐ नमः शिवाय) दीक्षा प्राप्त करुन कठोर तपश्चर्या सुरु केली. त्याच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी मत्सरासुरास वरदान मागण्यास सांगितले. मत्सरासुराने अभय होण्याचे वरदान मागितले व भगवान शंकरांनी त्यास इच्छित वरदान दिले. 


वरदान प्राप्त होताच मत्सरासुराने पृथ्वी, स्वर्ग व पाताळ या त्रिलोकांवर आक्रमण केले आणि या युद्धात वरुणराज, कुबेर व यमदेवांचा पराभव झाला. मत्सरासुर तिन्ही लोकांचा अधिपती झाला. मत्सरासुरास सुंदरप्रिय व विषयप्रिय हे दोन पुत्र होते. आपले दोन्ही पुत्रांच्या मदतीने मत्सरासुराने सगळीकडे अत्याचार सुरु केला. सर्व देवदेवता भयभीत झाले व त्यांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली. भगवान शंकरांनी सर्व देवदेवतांना सांगितले की, “मत्सरासुराचा पराभव हा श्रीगणेशाकडून ‘वक्रतुंड’ या अवतारात होणार आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून श्रीगणेशाची आराधना करुयात.” यावर सर्व देवदेवतांनी मिळून मत्सरासुराच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी श्रीगणेशाची एकाक्षरी मंत्राद्वारे आराधना केली. त्यांच्या आराधनेवर संतुष्ट होऊन श्रीगणेश वक्रतुंड अवतारात प्रकट झाले व म्हणाले, “आपण सर्व निश्चिंत रहा. गर्विष्ट मत्सरासुराच्या त्रासातून मी आपली निश्चितच मुक्तता करेन.”


वक्रतुंडाने आपल्या सर्व गणांसहीत मत्सरासुराच्या नगरीस घेराव घातला व दोन्ही सैन्यांमध्ये घनघोर युद्धास सुरुवात झाली. मत्सरासुर व वक्रतुंड या दोघांमध्ये तसेच दोघांच्या सैन्यांमध्ये सलग ५ दिवस यु्द्ध सुरु होते. वक्रतुंडाच्या गणांनी मत्सरासुराच्या सुंदरप्रिय व विषयप्रिय या दोन पुत्रांचा वध केला. पुत्रांच्या निधनाने मत्सरासुर व्याकूळ झाला व वक्रतुंडास अपशब्द वापरू लागला. त्यावर वक्रतुंडाने विराट रुप धारण केले व मत्सरासुरास सुनावले, “मत्सरासुरा, तुला जर तुझे प्राण प्रिय असतील तर मला शरण ये अन्यथा तुलाही तुझ्या प्राणास मुकावे लागेल.” 


वक्रतुंडाच्या भयानक रुपास पाहून मत्सरासूर गर्भगळीत झाला. त्याला कळून चुकले की आता आपला अंत निश्चित आहे. तेव्हा मत्सरासुराने वक्रतुंडापुढे शरणागती पत्करली व भितीपोटी घाबरुन जाऊन अत्यंत विनयपूर्वक गणेशस्तुती गाऊ लागला व वक्रतुंडाकडे अभय मिळावे म्हणून प्रार्थना करु लागला. त्याच्या प्रार्थनेवर संतुष्ट होऊन वक्रतुंडाने मत्सरासुरास अभय प्रदान केले व पुढील आयुष्य शांततेत घालविण्याकरीता पाताळात जाण्याची आज्ञा केली. वक्रतुंडाच्या आज्ञेप्रमाणे त्याने पाताळाकडे गमन केले. हाच मत्सरासुर पुढे गणपती भक्त झाला. मत्सरासुराच्या त्रासातुन मुक्त झालेल्या सर्व देवदेवतांनी देखील वक्रतुंडाची स्तुती करुन आभार मानले.

त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या व मत्सरामुळे सर्व देवदेवतांना त्रास देणाऱ्या असुराच्या मत्सराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या वक्रतुंडांस प्रणाम असो!!!

~*~
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters