लम्बोदरावतारो वै
क्रोधासुरनिबर्हणः ।
शक्तिब्रह्माखुगः सद् यत् तस्य धारक उच्यते: ||
शक्तिब्रह्माखुगः सद् यत् तस्य धारक उच्यते: ||
(अर्थ : श्रीगणेशाचा लंबोदर हा अवतार शक्तीब्रहृमधारक
तथा सत्स्वरुप असुन, क्रोधासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे)
समुद्रमंथनाच्या वेळी श्रीविष्णूंनी अत्यंत सुंदर असे मोहिनीरुप धारण केले होते. श्रीविष्णू मोहिनी रुपात इतके रुपवान दिसत होते की, सर्व देव व दैत्य यांना त्यांच्या रुपाची भुरळ पडली होती. भगवान शंकरदेखील श्रीविष्णूंच्या मोहिनीरुपावर भाळले. श्रीविष्णूंनी जेव्हा मोहिनीरुपाचा त्याग केला तेव्हा भगवान शंकर अत्यंत नाराज झाले. वस्तुस्थिती लक्षात येता, महोदव अत्यंत क्रोधीत झाले व क्रोधामुळे त्यांच्या शरीरातून एक दैत्य निर्माण झाला. त्या दैत्याचा रंग अत्यंत काळा असून डोळे तांबूस रंगाचे होते.
हा दैत्य दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे गेला. शुक्राचार्यांनी आपणांस दीक्षा प्रदान करावी या हेतूने तो त्यांना विनंती करु लागला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याच्या विनंतीस मान दिला व त्याला आपले शिष्य बनवून घेतले. महादेवांच्या क्रोधामुळे हा दैत्य निर्माण झाला असल्यामुळे शुक्राचार्यांनी या दैत्याचे नाव ‘क्रोधासुर’ असे ठेवले व शांबर नामक दैत्याची लावण्यवती कन्या प्रिती हिच्यासमवेत त्यांनी क्रोधासुराचा विवाहदेखील लावून दिला. क्रोधासुरास ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याची इच्छा होती हे जाणून शुक्राचार्यांनी त्यास विधीपूर्वक सुर्यमंत्राची दिक्षा प्रदान केली व सुर्यकृपा प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्यास वनात निघून जाण्याचा आदेश दिला.
गुरुंच्या आदेशाप्रमाणे क्रोधासुराने वनात जाऊन अन्नपाणी त्याग करुन, एका पायावर उभे राहून सूर्यदेवांच्या कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. अनेक तपांनंतर क्रोधासुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन सुर्यदेव प्रकट झाले. क्रोधासुराने सुर्यदेवांकडे वरदान मागितले, “देवा, मला संपूर्ण ब्रहृमांड जिंकण्याची अभिलाषा आहे. मृत्यूवरदेखील मला विजय मिळवायचा आहे. आपण मला अमरत्व बहाल करावे.” सुर्यदेवांनी क्रोधासुरास इच्छित वरदान दिले.
वरदान प्राप्त झाल्यानंतर क्रोधासुर ब्रहृमांड जिंकण्यास सज्ज झाला. शुक्राचार्यांनी त्याला दैत्यराज पद बहाल केले. पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत करुन त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे वैकुंठ आणि कैलासावरदेखील त्याची सत्ता प्रस्थापित झाली. क्रोधासुराने सुर्यदेवांवरदेखील आक्रमण करुन सुर्यलोक काबिज केले. आपल्याच वरदानामुळे आपल्याला सुर्यलोकाचा त्याग करावा लागतोय हे पाहून सुर्यदेवही हताश झाले.
क्रोधासुर सर्वत्र अहंकाराने राज्य करु लागला. त्याच्या त्रासास कंटाळून देवदेवता व ऋषिमुनींनी सुखकर्ता-दुखहर्ता श्रीगणेशाची आराधना सुरु केली. त्यांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन श्रीगणेश लंबोदर या अवतारात प्रकट झाले व क्रोधासुराच्या त्रासातून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले. ही वार्ता क्रोधासुरापर्यंत पोचली.
इकडे लंबोदराने क्रोधासुरावर आक्रमण केले. उंदिरावर आरुढ झालेला मोठया उदराच्या लंबोदराचे तेजस्वी रुप पाहून क्रोधासुर चकीत झाला. लंबोदर व क्रोधासुर या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. एकामागून एक पराक्रमी राक्षस धारातीर्थी पडू लागलेले पाहून क्रोधासुर चवताळून लंबोदरास म्हणाला, “मी समस्त ब्रहृमांड जिंकलेले आहे. तु माझा काय पराजय करणार? मला अमरत्वाची प्राप्ती आहे.” यावर लंबोदराने क्रोधासुरास सुनावले, “कोणत्याही वरदानाचा वापर हा धर्म आणि निती यांस अनुसरुन करावयाचा असतो. मात्र वरदान मिळताच तू उन्मत्त झालास. सगळीकडे अराजकता माजविलीस. तुझ्या कृत्यांमुळे प्राप्त वरदानातील शुभता नष्ट झाली आहे. तुझा अंत करण्याकरीताच मी हा अवतार घेतला आहे. तुझ्या गुरुंना सर्व ज्ञात आहे. तु त्यांचेशी विचारविनिमय करु शकतोस. तुझा यापुढे जिवंत रहायचे असेल तर मला शरण ये अन्यथा तुझा अंत निश्चित आहे.” क्रोधासुराने दैत्यगुरु शुक्राचार्यांना लंबोदराबद्दल विचारले. शुक्राचार्यांनीदेखील त्यास लंबोदराच्या अवताराबाबत सविस्तर सांगितले आणि लंबोदरास शरण जाण्याचा सल्ला दिला.
क्रोधासुर लंबोदरास शरण आला व त्याने आपल्या अपराधांची क्षमा मागितली. तो लंबोदराची अर्चना व स्तुती करु लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन लंबोदर प्रकट झाले. क्रोधासुराने लंबोदराकडे आपल्या अपराधांना क्षमा करण्याची याचना केली. त्यास क्षमा करुन लंबोदराने पातालात गमन करण्याचा आदेश दिला. क्रोधासुर लंबोदरास वंदन करुन पातालात निघून गेला. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिन्ही लोकांमध्ये लंबोदराचा जयजयकार होऊ लागला.
बहृमांडावर विजय मिळविलेल्या, क्रोधाग्नीने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या क्रोधाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या गजाननास प्रणाम असो!!!
~*~
‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ४ : गजानन’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ६ : विकट’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा