बहुतेकांना प्रश्न असतात : हिंदू संस्कृतीमध्ये दारात तुळस लावून त्याची
नित्यनेमाने पुजाअर्चा का केली जाते?, तुळशीस हरीप्रिया का मानले जाते, दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशीचे
लग्न श्रीविष्णूंसोबत का लावले जाते? विष्णूपुजनात तुळशीपत्रांना एवढे महत्त्व का आहे, श्रीविष्णूंना
नैवेद्य तुळशीपत्रांविना का दाखविला जात नाही, सत्यनारायणाच्या पुजेत व प्रसादात तुळशीपत्र
का वापरले जाते? विष्णूंचा शाळीग्राम अवतार, शाळीग्राम व तुळशीचे एकत्र पुजन का केले जाते?, तुळस गणेश पूजनात निषिद्ध
का मानली जाते?, आणि जर तसे असेल तर गणपती बसतात त्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला २१
पत्रींसोबत गणेशास तुळस का वाहिली जाते? रामायणपर्वात रावणाने का केले सीतेचे अपहरण, रामास
का सहन करावा लागला पत्नीवियोग? या व अशा अनेक प्रश्नांची उकल -
धर्मध्वज राजाची लावण्यवती कन्या 'वृंदा' ही विष्णूभक्त होती. तिला श्रीविष्णूंशी
विवाह करण्याची इच्छा होती. यासाठी तिने विष्णूवनात जाऊन एक लक्ष वर्ष तपश्चर्या
केली व त्याच्या प्रभावाने तिला अंर्तज्ञान प्राप्त झाले.
एकदा वृंदेने भागीरथी नदीकाठी श्रीगणेशास ध्यान करताना पाहिले व अंर्तज्ञानाच्या
प्रभावाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञात झाले व त्यामुळे ती श्रीगणेशावर
मोहित झाली. तिने गणेशाकडे आपल्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, गणेशाने
मी विवाह करुन मोहपाषात अडकू इच्छित नाही असे सांगून तिला नकार दिला. गणेशाच्या नकाराने
संतापलेल्या वृंदेने गणेशास “तू विवाह करशीलच” असा शाप दिला. त्या शापास प्रतिउत्तर म्हणून
गणेशाने “तू वृक्ष होऊन मूढ योणीत
पडशील” असा शाप वृंदेस दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली
व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.
दयावान गणेशाने तिची
तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले,
"देवी तू असुरकन्या म्हणून जन्म घेशील व एका महापराक्रमी असुराशी तुझा
विवाह होईल. त्या असुराचा मृत्यू होताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत
त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील.
त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू
धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला
त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने
घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला मात्र तू भाद्रपद
शुक्ल चतुर्थीचा अपवाद वगळता वर्ज्य असशील."
श्रीगणेशाच्या श्रापामुळे वृंदेने राक्षसकुळात जन्म घेतला. ती विष्णूभक्त
असल्याने बालपणापासूनच श्रीविष्णूंची नित्यनेमाने पूजा करीत असे. उपवर झाल्यावर तिचा
विवाह राक्षसकुळातीलच ‘जालंधर’ नामक महापराक्रमी अशा असुराशी झाला. विष्णूभक्त वृंदा ही
अत्यंत धर्मशील पतिव्रता होती. वृंदेशी विवाह झाल्यामुळे तिच्या महापातिव्रत्य व
पावित्र्याच्या तेजाने जालंधरास अधिक शक्ती प्राप्त झाल्या व तो सर्वत्र विजय
प्राप्त करु लागला.
जालंधरास समस्त पृथ्वीवर विजय मिळविण्याची अभिलाषा होती. वृंदेच्या
पावित्र्याने व पुण्याईने महापराक्रमी झालेला जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरु
लागला. त्याने समस्त राक्षस व पृथ्वीलोकांवर विजय तर मिळवीलाच पण आता तो देवदेवता
व ऋषीमुनींनाही त्रास देऊ लागला. स्वर्गाचा अधिपती होण्यासाठी उन्मत्त जालंधराने
देवदेवतांशी युद्ध पुकारले.
जालंधर युद्धास निघाला तेव्हा वृंदा त्यास म्हणाली, “स्वामी, आपण जोपर्यंत युद्धभुमीवर आहात तोपर्यंत मी आपल्या
विजयासाठी इथे अनुष्ठान सुरु ठेवते. तुम्ही विजयी होऊन परत येईपर्यंत मी काही माझा
संकल्प सोडणार नाही.” जालंधर युद्धास निघून
गेला व वृंदा पुजेस बसली.
जालंधर व देवतांमध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. पतिव्रता वृंदेच्या
अनुष्ठानाच्या प्रभावाने जालंधरावर देवदेवता विजय प्राप्त करु शकत नव्हते.
जालंधराच्या विजयाची चिन्हे दिसू लागली तशी सर्व देवदेवता व ऋषीमुनींनी मदतीकरीता
श्रीविष्णूंकडे धाव घेतली. वृंदेच्या जाज्वल्य पातीव्रत्यामुळे जालंधरास कोणीही
पराभूत करु शकत नाही हे निश्चित होते. याचाच अर्थ वृंदेचे पातिव्रत्याचा प्रभाव
कमी केल्यास जालंधराचे सामर्थ्य आपोआप कमी होईल हे श्रीविष्णूंनी ताडले. परंतु,
वृंदा ही निस्सीम विष्णूभक्त असल्यामुळे श्रीविष्णूंसमोर मोठा पेच निर्माण झाला.
श्रीविष्णू देवदेवतांना म्हणाले, “वृंदेचे
पातिव्रत्याचा प्रभाव कमी केल्यास आपोआपक जालंधर पराभूत होईल, परंतु वृंदा ही माझी निस्सिम भक्त आहे व तुमच्या
मदतीकरीता मी माझ्या भक्तास कोणत्याही संकटात टाकू इच्छित नाही” यावर सर्व देवांनी श्रीविष्णूस जालंधरामुळे तिन्ही लोकांवर
कशा प्रकारे संकट ओढवले आहे व धर्म कर्म नष्ट होऊन कशा प्रकारे अधर्म माजत आहे हे
पुन:श्च सांगितले. तसेच लोककल्याणाकरीता वृंदेचे पातिव्रत्य भंग करण्याशिवाय आता
कोणताही पर्याय नाही हेदेखील पटवून दिले. शेवटी श्रीविष्णू देवदेवतांना मदत
करण्यास तयार झाले व जालंधराचे रुप धारण करुन ते वृंदेचे पातिव्रत्य भंग करण्यास
निघाले.
जालंधराचे रुप घेऊन श्रीविष्णू वृंदेच्या महालात पोचले. जालंधररुपी विष्णूंस
पाहताच आपला पती युद्धात विजयी होऊन परत आला आहे या विचाराने वृंदेने अनुष्ठान
सोडले व त्यांच्या चरणास स्पर्श करण्यास गेली. वृंदेने विष्णूंच्या चरणास स्पर्श
करताच तिचे पातिव्रत्य भंग पावले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रताभंगामुळे
जालंधराभोवतीचे संरक्षणकवच नष्ट झाले व त्याक्षणी युद्धात देवांनी जालंधरावर विजय
मिळविला व जालंधराचे शीर धडापासून वेगळे केले. ते शीर वृंदेच्या महाली येऊन पडले.
सोबत जालंधररुपी श्रीविष्णू असताना जालंधराचे शीर अचानक समोर येऊन पडलेले पाहून
वृंदा घाबरली व आपल्यासोबत आपला पती नसून दुसराच कोणीतरी आहे हे तिने ताडले. अत्यंत
क्रोधीत होऊन वृंदेने जालंधररुपी श्रीविष्णूंस जाब विचारला. विष्णूं आपल्या मूळ
रुपात प्रकट झाले. श्रीविष्णूंना पाहताच सारा प्रकार वृंदेच्या लक्षात आला.
आपल्या पतीस पराभूत करण्यासाठी कपटीपणाने व खोट्या वागणूकीतून आपले तप आणि
पातिव्रत्याचा भंग करण्यात आलेला आहे हे समजताच क्रोधीत वृंदेने श्रीविष्णूंना शाप
दिला, “तुम्ही माझे सतीत्व भंग केलेत, आता तुम्ही दगड
बनून रहाल आणि ज्याप्रकारे तुम्ही माझ्याशी खोटे वागून कपट केले आणि मला पतीवियोग
घडवून आणला आहे. त्याचप्रमाणे तुम्हालाही एक जन्म असा घ्यावा लागेल की त्यात तुम्हास
अशाच प्रकारे पत्नीवियोग सहन करावा लागेल. पत्नीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला
मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल.” (या श्रापाचा प्रभाव म्हणून श्रीविष्णूंना रामअवतारी
पत्नीवियोग सहन करावा लागला. रावणाने अशाच प्रकारे खोटे वागून कपटाने सीतेचे हरण
केले).
वृंदेच्या श्रापाने श्रीविष्णूचे तत्काळ एका दगडामध्ये रुपांतर झाले. यामुळे
श्रीविष्णूंना ‘शाळीग्राम’ या नावाने ओळखले जाते. विष्णूभक्त शाळीग्राम या रुपातदेखील
त्यांची पूजा करतात. श्रीविष्णूंना शापातून मुक्त करण्यासाठी लक्ष्मीसह सर्व
देवदेवतांनी वृंदेकडे प्रार्थना केली. वृंदेने
श्रीविष्णूस श्रापातून मुक्त केले व जालंधरासह सती गेली.
सती गेलेल्या वृंदेच्या राखेतून एक रोपटे उगवले. तेव्हा विष्णूंनी सांगितले
की, “या रोपास ‘तुळस’ या नावाने संबोधले जाईल. आपल्या अंगणात तुळशीचे रोप लावून
त्याची नित्य पूजा केल्यास घरात सुखसमृद्धी नांदेल. याच्या केवळ दर्शन व पूजनानेच सकल
पाप नष्ट होतील. तसेच माझ्या दगडरुपास ‘शाळीग्राम’ या नावाने संबोधले जाईल व त्याची तुळशीबरोबर पूजा केली
जाईल. जी व्यक्ती कार्तीकमासातील शुक्लपक्ष एकादशीस तुळशीचे लग्न माझ्याशी लावेल त्याला
यश प्राप्ती आणि कन्यादानाचे पुण्य प्राप्त होईल. विष्णू व तुळशीचा विवाह हा
विष्णू व लक्ष्मी यांच्या विवाहाचेच प्रतिक असेल. यापुढे तुळशीपत्राविना दाखविलेला
नैवेद्य मी ग्राह्य करणार नाही.” तेव्हापासून तुळस
ही विष्णूप्रिया मानली जाऊ लागली व श्रीविष्णूंसह तिची पूजा होऊ लागली.
उठोनियां प्रात:काळी | तुळस वंदावी माऊली | तुळस संतांची साऊली | मुगुटीं वाहिली विष्णूनें ||१||
तुळस असे ज्याचे द्वारीं | लक्ष्मी वसे त्याचे घरीं | येवोनी श्रीहरी | क्रिडा करी स्वानंदी ||२||
तुळशीसी मंजुरा येतां | पळ सुटे यमदूतां | अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां | नासे दुरित चित्ताचें ||३||
जे जे तुळसी घालिती उदक | ते नर पावती ब्रह्मसुख | नामा म्हणे पंढरीनायक | तुळसी जवळी उभा असे ||४||
~*~
‘तुळसगणेश पूजनात निषिद्ध (भा. शु. चतुर्थीचा अपवाद वगळता)’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
'२१ पत्री - तुळस' ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
'२१ पत्री - तुळस' ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा