ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.
चतुर्थी व्रत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चतुर्थी व्रत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संकष्ट चतुर्थीचे महात्म्य...



श्रीगणेशास चतुर्थी या तिथीचा स्वामी मानले जाते. भारतीय कालगणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी. गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात. सायंकाळी पंचांगानुसार, चंद्रोदयाच्या वेळी गजाननाची व चंद्राची पूजा करुन संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यास हा एक अत्यंत शुभ व महत्वपूर्ण योग मानला जातो व त्यास अंगारक संकष्ट चतुर्थीअसे म्हणतात. या अंगारक चतुर्थीपासूनच संकष्ट चतुर्थीच्या व्रताची सुरुवात करतात. [अंगारक संकष्ट चतुर्थीचे महात्म्य वाचण्यासाठी क्लीक करा]

संकष्ट चतुर्थी केल्याने पूर्वजन्माचे पाप नाहिसे होऊन धर्म, अर्थ, काम एवं मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.


संकष्ट चतुर्थीची कथा


कृतवीर्य नावाचा एक बलवान व अपार वैभव असणारा महापराक्रमी, दाता, महारथी व जितेंद्रीय असा राजा होता. त्याच्याकडे बारा हजार ब्राह्मण नेहमी भोजनास असत. त्याला सुगंधा नावाची पत्नी होती. परंतु हे दांपत्य पुत्ररहीत होतं. पुत्रप्राप्तीस्तव त्यांनी अनेक पुण्यकर्म केली, पण जन्म-जन्मांतरीच्या पापानं यश आलं नाही. शेवटी एकदा अतिदु:खी होऊन कृतवीर्य राजाने आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि सारा राज्यकारभार त्यांच्यावर सोपवून कृतवीर्य राजा पत्नी सुगंधासोबत वनात निघून गेला. उभयतांनी राजवस्त्र आणि दागदागिन्यांचा त्याग करुन वल्कलं आणि अजिनं परिधान केली. दोघे पती-पत्नी वनात तप करु लागले.

उभयतांची तपस्या पाहून नारदमुनी पितृलोकात असलेल्या कृतवीर्याच्या पित्यास म्हणाले, पुत्र न झाल्याने तुझा पुत्र कृतवीर्य मृत्यूलोकी राजपदाचा त्याग करुन वनात घोर तपस्या करीत आहे. तो एक-दोन दिवसात मरेल. नारदमुनींचं हे बोलणं ऐकून कृतवीर्याच्या पित्यास अत्यंत दु:ख झाले. आपला कुलक्षय होणार या विचाराने कृतवीर्याचा पिता तात्काळ ब्रह्मदेवांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, माझा पुत्र एवढा सदाचारी आणि सदभक्त असता त्याला पुत्रसंतान का बरं नाही? राज्य प्रधानांच्या स्वाधीन करुन तो वायुभक्षण करीत वनात राहीला आहे. त्याच्या अस्थिमात्र शिल्लक राहिल्या आहेत, त्यामुळे तो उद्या किंवा परवा मरेल. प्रभो, जन्मजन्मांतरी घडलेलं त्याचं पातक ज्या उपायानं नष्ट होईल तो उपाय कृपा करुन मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा पुत्र याच नगरीत पूर्वी साम या नावाचा अंत्यज होता. त्यानं एकदा द्रव्यलोभापायी बारा ब्राह्मणांचा घात केला होता. त्या ब्राह्मणांस ठार करुन, त्यांच्या जवळचं सर्व लुटून त्यांची प्रेतं त्यानं एका गुहेत ठेवली होती. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. सकाळपासून तो अंत्यज वाटमारी करण्यास टपून बसला असता ओघानंच त्याला उपवास घडला. सुमारे प्रहर रात्री ही पापकर्म करुन तो घरी आला. त्याचा गणेश नावाचा एक पुत्र होता. त्याला गणेशा’, गणेशाम्हणून त्यानं हाका मारल्या. नंतर त्यानं पुत्रासह भोजन केलं. अशा रीतीनं अजाणताच त्याला चतुर्थीचं उपोषण घडलं होतं. पण तेवढया पुण्याईनंच त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. त्या पुण्याईचं पुष्कळ फळ त्यानं स्वर्गलोकी भोगलं. पण जेव्हा त्याची पुण्याई संपत आली, तेव्हा मृत्यूलोकात राजकुलात त्याचा जन्म झाला. तोच तुझा पुत्र कृतवीर्य होय. त्यानं पूर्वी ज्या ब्रह्महत्या केल्या होत्या, त्या पातकामुळं त्याला पुत्रसंतान होत नाही. परंतु तुझा पुत्र जर संकष्टचतुर्थी व्रत करेल, तर त्याचं पूर्वजन्मार्जित पाप नाहीसं होऊन त्याला पुत्र होईल. यावर कृतवीर्याचा पिता अत्यंत खुश झाला व त्याने ब्रह्मदेवांस संकष्ट चतुर्थीचं व्रत सविस्तर सांगण्याची विनंती केली.

ब्रह्मदेव पुढे सांगू लागले, ज्या दिवशी माघ चतुर्थी मंगळवारी येईल (अंगारकी), त्या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रतास आरंभ करावा. उपवास करुन गजाननाचा मंत्र जपावा. पापनिंदा न व्हावी म्हणून मौनाचा स्विकार करावा. परद्रोह, दुर्जनपणाची दृष्ट कृत्य वर्ज्य करावीत. सायंकाळी गजाननाचं षोडशोपचारानं पूजन करावं. नंतर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गजाननास २१ दुर्वा अर्पण करुन आरती ओवाळावी. नंतर चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची अतिथीस्वरुपात पूजा करावी. चंद्राला अर्ध्य अर्पण करुन करुन प्रथम गणपतीस व नंतर चंद्रास नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास ब्राह्मणास भोजन घालावं. अशा प्रकारे भक्तीभावाने जो कोणी वर्षभर अढळ भक्तीने हे संकष्ट चतुर्थी व्रत करील, त्याला पुत्र संतती होईल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. व्रताची माहिती घेतल्यावर ब्रह्मदेवांना वंदन करुन कृतवीर्याचा पिता निघाला. कृतवीर्य मृत्यूलोकांत होता तर त्याचा पिता पितृलोकांत. त्यामुळे ब्रह्मदेवांनी कथन केलेलं संकष्ट चतुर्थीचं व्रत मुलास देण्यासाठी कृतवीर्याचा पिता त्याच्या स्वप्नात गेला.

कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याचा पिता म्हणाला, मुला, तू पुत्रप्राप्तीसाठी अनेक प्रकारे परिश्रम करीत आहेस. तेव्हा आता मी सांगतो तो उपाय कर. नारदमुनींच्या भेटीनंतर मी ब्रह्मदेवांकडे गेलो व त्यांना तुला संततीप्राप्ती व्हावी यासाठी काय करता येईल हे विचारले. त्यावर तुझ्या पुत्रास संकष्टीचतुर्थीचं व्रत करायला सांग असे ब्रह्मदेव म्हणालेत. पुत्रा, ब्रह्मदेवांनी कथन केल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीचं व्रत तू एक वर्षभर कर  म्हणजे सर्व संकटांचं हरण करणारा सिद्धीविनायक प्रसन्न होईल व त्याच्या कृपाप्रसादानं तुला पुत्रप्राप्ती होईल. असे सांगून कृतवीर्याचा पिता अंर्तधान पावला आणि कृतवीर्य स्वप्नातून जागा झाला.

यानंतर कृतवीर्य पत्नीसमवेत आपल्या राज्यात परतला व त्याने आपल्या पित्याने स्वप्नात सांगितलेले ब्रह्मदेवकथीत संकष्ट चतुर्थी व्रत मोठ्या भक्तीभावाने केले. गजाननाच्या मंत्राचा जप केला. जप, हवन, पूजन करुन असंख्य ब्राह्मणांना भोजन घालून, दहा हजार गायी देऊन, दीन, अंध, दरिंद्री लोकांस अन्नदान करुन सर्व ब्राह्मणांकडून पुत्र प्राप्तीचे आर्शीवाद घेतले. थोडयाच काळात राजाची पत्नी गर्भवती झाली व शुभसमयी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव कार्तवीर्य ठेवले गेले व हाच पुत्र पुढे सहस्त्रार्जुन या नावानेदेखील ओळखला जाऊ लागला. 

चतुर्थी व्रत - बारा महिन्यांचे विधी व त्यांचे महात्म्य (भाग १ )


प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात - शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष. दोन्ही पक्षात पौर्णिमा व अमावसेशिवाय इतर तिथींची नावे सारखीच असतात जसे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी (चतुर्थी). चतुर्थी ही सर्वात पहिली तिथी. तिच्यापासूनच मग प्रतिपदा ते पौर्णिमा व अमावास्या या तिथी निर्माण झाल्याने  चतुर्थी ही सर्व तिथींची जननी मानली जाते. 

पूर्वी सृष्टी निर्माण करून प्राणिमात्रांच्या कालधारणेसाठी ब्रह्मदेवानी समाधी लावली असता सर्व तिथींची जननी प्रकृती चतुर्थी त्यांच्या शरीरापासून निर्माण होऊन तिने तप केले. त्यामुळे गणेशाने सर्व तिथींचे मातृत्व व भक्ती देऊन 'माझी जन्मतिथी तूच' असा तिला वर दिला. तेव्हा स्वतःपासून तिने प्रतिपदा ते पौर्णिमा-अमावस्या तिथी निर्माण केल्या. त्यांच्यासह एक वर्षभर तपस्या करून गणेशस्तुती केली आणि शुक्ल-कृष्ण चतुर्थाना सिद्धिदायक वर गणेशाकडून मिळवले. स्वत: गणेश प्रतीपतादी तिथीकडे गेले व सर्व तिथी व्रतयुक्त करून सिद्ध केल्या. त्या व्रतयुक्त चतुर्थ्यांचे विधी आणि महात्म्य खालीलप्रमाणे असून प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाची विशेष उपासना हि अत्यंत शुभ, लाभकारक आणि संकटनाशक  असते :

(१) चैत्र चतुर्थी - चैत्र महिन्यातल्या चतुर्थीला वासुदेवस्वरूप गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना सुवर्णदक्षिणा दिल्यास मनुष्य विष्णुलोकी जातो.

(२) वैशाख चतुर्थी - वैशाख चतुर्थीला संकर्षण गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना शंख दान दिल्यास तो मनुष्य संकर्षणलोकी जातो.

(३) जेष्ठ चतुर्थी - जेष्ठ महिन्यातल्या चतुर्थीला प्रदुम्नरुपी गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना  फळफळावळ दान दिले असता मनुष्यास स्वर्ग प्राप्त होतो. जेष्ठ चतुर्थीचे दुसरे एक व्रत आहे त्याला सतीव्रत म्हणतात. स्त्रियांनी हे व्रत केले असता त्या पर्वतीलोकी जातात. 

(४) आषाढ चतुर्थी - आषाढ चतुर्थीला अनिरुद्धस्वरूप  गणेशाची पूजा करून संन्याशांना कमंडलू दान दिले मनुष्याची इच्छा पूर्ण होते. आषाढी चतुर्थीचे दुसरे एक व्रत आहे, त्या दिवशी मनुष्याने श्रद्धापूर्वक अंतकरणाने विधीपूर्वक गणपतीची पूजा केली असता अतिशय दुर्लभ अशी फलप्राप्ती होते. 

(५) श्रावण चतुर्थी - श्रावण चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीला अर्ध्य द्यावे आणि गणपतीचे ध्यान करावे. नंतर गणपतीची विधीपूर्वक  पूजा करावी आणि त्याला लाडवाचा नैवेद्य दाखवावा. मग प्रसाद भक्षण करून रात्री गणपतीची पूजा करावी. हे व्रत केल्यामुळे मनुष्याची मनोकामना पूर्ण होते. 

(६) भाद्रपद  चतुर्थी - (अ) भाद्रपद कृष्ण चतुर्थीच्या दिवशी बहुला गणेशाची (बहुला गायारूपी गणेशाची) गंध, माळ, गवत इ. वस्तूंनी पूजा करावी. नंतर आपल्या शक्तीप्रमाणे दान करावे. ते शक्य नसेल तर बहुला गायरुपी गजाननाला नमस्कार करून त्याचे विसर्जन करावे. याप्रमाणे पाच, दहा, किंवा सोळा वर्षांपर्यंत हे व्रत करावे व नंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्या वेळी दूध देणाऱ्या गाईचे दान करावे. या व्रताने मनुष्य गोलोकी जातो. 

(ब) भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक व्रत करावे. त्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक  पूजा करून सिद्धिविनायकाचे ध्यान करावे आणि भक्तिपूर्वक गणेशाची २१ नावे घेऊन पुढील २१ प्रकारची पत्री त्याला अर्पण करावी - शमीपत्र, बिल्वपत्र, दुर्वादल, बोरीचे पान, धोत-याचे फुल, तुलसीदल, वालाचे पान, आघाडा, रिंगनीचे पान, सिंदूर वृक्षाचे पान, दालचिनी, अगस्त्याचे पान, कन्हेरीचे पान, दगडफूल, रुईचे पान, अर्जुन वृक्षाचे पान, देवदाराचे पान, मारावा, गांधारी पत्र, केतकीचे पान. नंतर दोन दुर्वा घेऊन त्या गंध, फुल आणि अक्षता यांसह गणेशाला वाहाव्यात. असा पद्धतीने भक्तिपूर्वक पूजा करून गणेशाला पाच लाडवांचा नैवेद्य दाखवावा आणि आचमन करून गणेशाला नमस्कार व प्रार्थना करून त्याचे विसर्जन करावे. नंतर करवा साहित्यासाहित गणपतीची ती सुवर्ण प्रतिमा ब्राह्मणाला दक्षिणेसह अर्पण करावी. असे ५ वर्षांपर्यंत गणेशाची भक्तिपूर्वक पूजा आणि उपासना केली तर मनुष्य परलोकी जाऊन सुखी होतो. ह्या चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघू नये, चंद्राकडे जर बघितले तर खोटा आरोप येतो. जर चुकून त्या दिवशी चंद्राकडे बघितलेच तर त्याचा दोष लागू नये म्हणून पुढील श्लोक म्हणावा :


 "सिंह: प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हत:|
  सुकुमारक मा रोदीस्तव हृयेष स्यमन्तक:  ||"


(७) अश्विन चतुर्थी - अश्विन शुक्ल चतुर्थीच्या दिवशी षोडोपचारे कपर्दीश विनायकाची पूजा करावी. ही पूजा पुरुषांनी करावी असा उल्लेख आढळतो. 
[क्रमश:]

चतुर्थी व्रत - बारा महिन्यांचे विधी व त्यांचे महात्म्य (भाग २ )


पुढे चालू :


(८) कार्तिक चतुर्थी - कार्तिक कृष्ण चतुर्थीच्या व्रताला कर्काचतुर्थी व्रत असे म्हणतात. हे व्रत फक्त स्त्रियांसाठीच सांगितलेले आहे. त्या दिवशी स्त्रियांनी स्नान करून चांगली वस्त्रे नेसून गणपतीची पूजा करावी. नंतर पक्वानांनी भरलेली दहा ताटे भक्तिपूर्वक अर्पण करावीत. गणेशाची प्रार्थना करावी. नंतर सुवासिनी स्त्रियांना आणि ब्राह्मणांना ती दहा ताटे वाटून द्यावीत. नंतर रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला विधीपूर्वक अर्ध्य द्यावे आणि भोजन करून व्रत पूर्ण करावे. असा तऱ्हेने हे व्रत १२ किंवा १६ वर्षे केल्यानंतर त्याचे उद्यापन करावे आणि नंतर मग ते सोडून द्यावे किंवा इच्छा असल्यास तसेच पुढे चालू ठेवावे. 

(९) मार्गशीर्ष चतुर्थी -मार्गशीर्ष चतुर्थीपासून एक वर्ष प्रत्येक चतुर्थीला एकभुक्त (एकवेळ जेवण) राहावे. दुसऱ्या वर्षी नक्त (फक्त रात्री एकदा जेवण करणे) करावे. तिसऱ्या वर्षी प्रत्येक  चतुर्थीला अयाचित (न मागता मिळेल त्यावर राहून) वृतीने राहावे आणि चौथ्या वर्षी दिवसभर उपवास करावा. अश्या रीतीने हे व्रत ओळीने चार वर्षे केल्यानंतर शेवटी व्रत-स्नान करावे. त्या वेळी सोन्याची गणेश मूर्ती तयार करावी किंवा ते शक्य नसेल तर जमिनीवर रंगबिरंगी रांगोळ्यांनी कमलपत्रासह कमळ काढून  त्यावर कलश ठेवावा आणि त्या कलशावर तांब्याचे भांडे ठेऊन त्यात अक्षदा घालाव्यात. त्यावर दोन लाल वस्त्रांनी आच्छादलेली गणेशमूर्ती स्थापन करावी. गंध फुलांनी तिची पूजा करावी. गणेशाला लाडवाचा नैवेद्य दाखवून रात्री गायन, वादन, भजन, कीर्तन इ. कार्यक्रम करीत, ऐकत जागरण करावे. पाहत झाल्यावर स्नान करून तीळ, तांदूळ , जव, पिवळी मोहरी, तूप व साखर यांनी युक्त आहुती देऊन विधीपूर्वक  होम करावा. गण, गणाधिप, कूष्मांड, त्रिपुरांतक, लंबोदर, एकदंत, रुक्मदंष्ट्र, विघ्नप, ब्रह्मा, यम, वरुण, सोम, सूर्य, हुताशन, गंधमादी आणि परमेष्ठी ह्या प्रत्येक  सोळा नावाला प्रत्येक  वेळी प्रारंभी 'प्रणव' आणि अंती चतुर्थी, विभक्ती आणि 'नम:' लावून अग्नीमध्ये एक-एक आहुती द्यावी. नंतर 'वक्रतुंडाय हुम ' या मंत्राने १०८ वेळा आहुती द्याव्यात. नंतर यथाशक्ती होम करून पूर्णाहुती करावी. दिक्पालांचे पूजन करून २४ ब्राह्मणांना लाडू आणि खीर यांचे जेवण घालावे. पुरोहिताला दक्षिणा आणि सवस्त गाय  दान करावी, इतर ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. नंतर नमस्कार करून प्रसन्न चित्ताने सर्वांबरोबर जेवण करावे. अश्या तऱ्हेने हे व्रत केले असता मनुष्य इहलोकी उत्तम प्रकारचे भोग भोगू शकतो आणि परलोकी त्याला विष्णूचा लाभ होतो ह्या व्रताला 'वरव्रत' असेही म्हणतात. 

(१०) पौष चतुर्थी - पौष चतुर्थीला भक्तिपूर्वक गणेशाची पूजा करून ब्राह्मणांना लाडवाचे भोजन घालून दक्षिणा द्यावी. हे व्रत केले असता मनुष्याला द्रव्यप्राप्ती होते. 

(११) माघ चतुर्थी - (अ) माघ कृष्ण चतुर्थीला 'संकष्टव्रत' म्हणतात. त्या दिवशी व्रत करणाऱ्या मनुष्याने उपवासाचा संकल्प करावा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमपूर्वक राहावे. चंद्रोदय झाल्यावर मातीची गणेशमूर्ती करून तिची पिठावर स्थापना करावी. गणेशमूर्तीबरोबर त्याचे आयुध आणि वाहन असले पाहिजेत असा नियम आहे. अश्या गणेशमूर्तीची स्थापना करून तिची षोडोपचारे विधीपूर्वक पूजा करावी आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा. नंतर तांब्याच्या भांड्यात रक्तचंदन, दर्भ, दुर्वा, फूल, अक्षता, शमीपत्र, दही आणि पाणी एकत्र करून चंद्राला अर्ध द्यावे. त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा :


"गगनार्णवमाणिक्यं चन्द्रं दाक्षायानिपते |
 गृहाणाअर्ध्यं माया दत्तं गणेशप्रतिरुपकं ||"


अश्या प्रकारे गणेशाला अर्ध्य देऊन यथाशक्ती ब्राह्मणांना जेवण घालून आपणही जेवावे. अश्या प्रकारे गणेशाला अर्ध्य देऊन यथाशक्ती ब्राह्मणांना जेवण घालून आपणही जेवावे. अश्या प्रकारे संकष्ट व्रताचे पालन केले असता मनुष्य धन-धान्यांनी समृद्ध होतो. 

(ब) माघ शुद्ध चतुर्थीला 'गौरी व्रत' करतात. त्या दिवशी गनांसहित गौरीची पूजा करावी. या दिवशी विशेषत: स्त्रियांनी कुंद-पुष्प, कुंकू, लाल दोरा, लाल फूल, निरांजन-उदबत्ती, गूळ, आले, पालक, दूध, खीर, मीठ इत्यादिनी गौरीची पूजा करावी. सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी सत्पात्र ब्राह्मणांची पूजा करावी. नंतर सर्वांबरोबर जेवण करावे. काही जण या व्रताला 'ढुण्ढि व्रत' म्हणतात; काही 'कुंड व्रत'; काही 'ललिता व्रत' तर काही 'शांती व्रत' म्हणतात. या तिथीला केलेले स्नान, दान, जप आणि होम हे सर्व गणेशाच्या कृपेने हजारपट होत असतात. 

(१२) फाल्गुन चतुर्थी - फाल्गुन चतुर्थीला 'ढुण्ढिराज व्रत' सांगितले आहे. ह्या वेळी तीळयुक्त मोदकांचे ब्राह्मणांना भोजन घालून आपणही जेवावे. ह्या दिवशी गणेशाची आराधना करताना तिळाचे दान, होम आणि पूजा केली असता मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. ह्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे सोन्याची गणेशमूर्ती बनवून तिची पूजा करून ती ब्राह्मणाला दान द्यावी. कोणत्याही महिन्यातील चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आली असता हे चतुर्थी व्रत केल्याने विशेष फलप्राप्ती होते. 
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters