ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.
21 Ganesh Patri लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
21 Ganesh Patri लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१ पत्री - भाग २२ : जाई


२१) जाई (Jasmin)


 " चतुर्भुजाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। "



वैशिष्ट्य : 


जाई हा हस्त नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. जाईला चमेली, जातिका, चंबेली, जस्मिन या नावांनीदेखील ओळखले जाते. जाई ही सुगंधी पुष्पवेल म्हणून प्रसिद्ध आहे. मांडवावर पसरणारी ही वेल श्रावणात पांढ-या मनोहर फुलांनी फुलते व बहरते. जाईच्या फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्वसाधारण वर्णन : 



सरळ रेषेत वाढणारा, सदाहरित जातीचा हा एक देखणं वृक्ष आहे. याचे खोड  मनगटाएवढे जाडही होऊ शकते. याची बाह्याकृती काहीशी शेलाटी असून बारक्या बारक्या फांद्या खाली झुकलेल्या असतात. सालीचा रंग पिवळट, खाकी किंवा काहीसा राखाडी असून साल भेगाळलेली, तडकलेली असते. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असून त्यावरच्या रेषा स्पष्ट असतात. फुलांचे झुबके फांद्यांच्या टोकाशी असतात. जाईची पाने संयुक्तपर्णी असून ५-७ पाकळयांची मिळून एक पान बनते. फुले पांढरी शुभ्र, अत्यंत सुवासिक व नाजूक असून ती सायंकाळी फुलतात. फुलांच्या पाकळया खलच्या बाजून फिक्कट गुलाबी-जांभळट असतात. फुले अल्पायुशी असून सुकल्यानंतर लाल होतात.

उपयोग :


उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे. जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. जाईच्या फुलांत सॉलिसिलिक ऍसिड असल्याने ते जंतुनाशक आणि व्रणनाशक आहे. केसगळतीवर, मुखरोगात जाई उपयुक्त असते. जुनाट तापावरही उपयुक्त. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात. याच्या लाकडाचा उपयोग बारक्या बारक्या लाकडी वस्तू करण्यास होतो.

लोककथा :

एका गावात चमेली नावाची एक सुंदर मुलगी होती. तिला सहा मोठे भाऊ होते, ते सगळे तिचा खूप खूप लाड करीत. परंतु त्या सहाही भावांच्या बायकांना म्हणजे चमेलीच्या भावजयीना ते आवडत नसे. चमेलीचे भाऊ तिला नेहमी छान छान कपडे आणीत. खायला उत्तमसें पदार्थ आणीत. मात्र तिचे इतके लाड केल्याबद्दल भावजयीना तिचा मस्तर वाटे.


एकदा काय झाले, कामानिमित्त सहाही भावांना एकाच वेळी घर सोडून लांब जायची वेळ आली. तेव्हा त्यांनी आपल्या सहाही बायकांना एकत्र बोलावले आणि सांगितले ,"आम्ही आमच्या बहिणीला, चमेलीला तुमच्यावर सोपवून जात आहोत. तिची काळजी घ्या. ती लाडात वाढली आहे. तशीच तिला वागवा!"


भावजयीनी भावांच्या देखत ते कबूल केले. पण भाऊ परगावी गेल्यावर त्यांनी आपली कारवाया सुरु केल्या. चमेलीला बोलावून घेतले. तिचे चांगले कपडे तिला काढायला लावून फाटकेतुटके मळके कपडे तिला घालायला लावले. "घरातील सगळी कामे आजपासून तुला करायचीत" असा तिला हुकूम सोडला. त्या दिवसापासून चमेली रोज घर झाडूनपुसून स्वच्छ करायची. घर सारवायची. स्वयंपाक करायची, भांडी घासायची, कपडे धुवायची. तिला चांगलंचुंगलं खायला पण त्या द्यायच्या नाहीत. उरलंसुरलं शिळंपाकं अन्न त्या तिला खायला लावायच्या. रात्रभर ती थंडीत कुडकुडत राहायची. त्या तिला रोज मारहाण करू लागल्या.


आतापर्यंत चमेलीचे आयुष्य सुखात गेलेले होते. त्यामुळे हा त्रास तिला सहन होईना. बरेच दिवस तिने कसेतरी ढकलले, पण मग मात्र ती चांगलीच आजारी पडली. त्या आजारपणातच औषधपाण्याविना तिचा मृत्यू ओढवला. मग मात्र त्या भावजया घाबरल्या. त्यांनी चमेली मेली असे कोणालाच सागितले नाही. कारण चमेलीच्या शरीरावर माराच्या खुणा ठिकठिकाणी दिसून येत होत्या. अंधार पडेपर्यंत त्या तशाच थांबल्या आणि रात्री त्यांनी तिला बागेच्या एका कोपऱ्यात पुरून टाकले.
 

काही दिवसांनंतर भाऊ परत आले. त्यांना चमेलीच्या मृत्यूबद्दल कळले तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि ते ढसाढसा रडू लागले. पण असा काही प्रकार घडला असेल, आपली बायकांनी तिला जाच केला असेल, असा त्यांना जरासुद्धा संशयही आला नाही. उलट त्यांना त्या बायकांनी सांगितले की चमेलीला तिच्या भावांचा विरह सहन झाला नाही आणि त्या दुःखापोटी ती मेली.


चमेलीला जेथे पुरले होते तेथे एक उंच टवटवीत झाड उभे राहिले. त्याला सुंदर चंदेरी रंगाची फूले फळे आली आणि त्यांच्या सुगंधाने आसमंत दरवळून गेले. त्या सहाही भावांना ते झाड खूप आवडले, पण त्या भावजया त्या झाडाचाही द्वेष करू लागल्या. "ते झाड उपटून टाका" असा त्यांनी आग्रह धरला. त्यांचा हा हट्ट इतका वाढला की एका दिवशी एका भावाने ते झाड उपटायचे ठरवले. कुऱ्हाड व फावडे घेवून तो झाडाजवळ गेला. आता तो कुऱ्हाडीचा घाव झाडावर घालणार, तेवढ्यात ते झाड अचानक बोलू लागले. गोड आणि सौम्य आवाजात ते म्हणाले, "भाऊ, भाऊ, मला तोडू नकोस. अरे मी तुझी चमेली आहे!"


ते ऐकताच तो भाऊ त्या बायकांकडे गेला. त्या चांगल्याच घाबरल्या होत्या. मग त्या एकमेकींना दोष देवू लागल्या. प्रत्येकजण दुसरीला म्हणे, "तू त्रास दिलास चमेलीला!" त्यांच्या बोलाचालीतून सत्य प्रकार सहाही भावांच्या लक्षात आला. त्यांनी त्या बायकांचा त्याग केला.


त्यांनी त्या चमेलीच्या झाडाला मिठी मारली. त्यांना खूप वाईट वाटले. पण त्या वेळेपासून शेवटपर्यंत त्यांनी त्या चमेलीच्या झाडाची खूप काळजी घेतली आणि ते जपले आणि त्या झाडाला चमेली असे नाव पडले.


(संदर्भ : आपले वृक्ष कुळकथा आणि  लोककथा - मनेका गांधी).


२१ पत्री - भाग २१ : विष्णुकांत / शंखपुष्पी



२१) विष्णुकांत / शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides) 

" विघ्नराजाय नमः। विष्णुकांत पत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य :

विष्णुकांत / शंखपुष्पी या वनस्पतीचे सकाळी-सकाळी अचानक दर्शन झाल्यास काहीतरी मंगल घडते असा समज आहे. अभ्यासात मंद असणा-या विद्यार्थ्यांसाठी शंखपुष्पी वनस्पती ही अत्यंत बुद्धीवर्धक ठरते. हिला स्मृतीसुधा असेही संबोधतात.


स्वरूप :

शक्यतो माळरानात आढणारी ही वनस्पती दिर्घायू असून छोट्या गवतासारखी वाढत जाऊन जमिनीलगत आसपास पसरते. या वनस्पतीचा आकार शंखासारखा असल्याने त्या‍स शंखपुष्पी असे नाव पडले असावे. लाल / पांढरी / निळी अशा प्रकारच्या फुलांच्या वर्गीकरणानुसार या वनस्पतीचे तीन प्रकार आढळतात.
याची मूळे करंगळीएवढी असून १-१ इंच उंचीची असतात. शंखपुष्पीची पाने एकाआड एक, १ ते ४ सें.मी. लांब व तळाकडे निमूळती होत जाणारी व रेशमी केसांनी आच्छादलेली असतात. फळे छोटी, गोलसर व चमकदार असतात. शंखपुष्पीच्या आंतर्सालातून व लाकडामधून दूधासारखा पांढरा द्रव निघतो. याच्या फांद्या सुतळीसारख्या पातळ असतात.


उपयोग :
शंखपुष्पी ही वनस्पती बुद्धिवर्धक, तेजवर्धक व शक्तीवर्धक असून वातपित्तशामक आहे. कावीळ, अनिद्रा, ज्वर, वातसंबंधिक विकार, गर्भाशय व मेंदूशी संबंधित विकारांवर ही वनस्पती गुणकारी ठरते. ही जंतनाशक असून अमांशावर गुणकारी ठरते.


कथा :

विष्णुकांत / शंखपुष्पी याबाबत कथा उपलब्ध झाली नाही.

२१ पत्री - भाग २० : डाळिंब


१९) डाळिंब (Pomegranate)


 " बटवे नम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।।"



वैशिष्ट्य :


डाळिंब म्हणजे सर्जनचे प्रतिक, भरभराटीचा, वैभवाचा संकेत. ईश्वराचा प्रेषित महंमदयाने आपल्या अनुयायांना डाळिंब भक्षण करण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यामुळे सैतान लांब राहतो.


पारशी समाजात डाळिंबाच्या फांद्यांपासून पवित्र झाडू तयार करतात. त्यांच्या व्रतबंध समारंभात डाळिंबाच्या दाण्याच्या अक्षदा उधळतात. त्यामुळे दृष्ट शक्ती दूर होतात अशी मिथीका आहे. अंतिम घटका मोजणाऱ्याच्या मुखात डाळिंबाचा रस घालतात.



सर्वसाधारण वर्णन :
  
डाळिंबाचे झाड हे एक छोटेखानी गोलाकार झुडूप असते. डाळींबाचा वृक्ष ३ ते ५ मीटर उंचीचा, धुरकट तांबड्या रंगाचा बुंधा असलेला असतो. त्याच्या निमुळत्या कडक फांद्या अनुकूचिदार असतात. बुंधा / खोड उभे, तांबूस तपकिरी असते. नंतर ते राखाडी होते. त्याचे काही वाण सदाहरित तर काही पानगळी प्रकारचे आहेत. पाने काहीशी झुबक्यांनी येतात. ती आकाराने ५ ते ७ सें. मी. लांब, काहीशी भाल्यासारखी, अरुंद, चकचकीत आणि चिवट असतात. कोवळी पालवी तांबूस हिरवी असते. पण पाने जरा जून होताना हा रंग गडद होत जातो.

डाळींबाच्या फुलाची कळी म्हणजेच अनारकली. लालसर छटा असेलेली भगवी/शेंदरी फूले चांगली मोठी असून ती फांद्यांच्या टोकाशी येतात.

फळे गडद लाल रंगाची, सुमारे ५ सें. मी. व्यासाची असतात. यात लाल रंगाचे पाणीदार व गोड दाणे असतात. साल कठीण व जाड असते. फळात अनेक बिया असतात. प्रत्येक बी भोवती तांबूस तजेलदार मांसल आवरण असते. फळ परिपक्व झाले की ते हसते म्हणजेच उकलते. डाळिंबाची फळे खातात. बिया सुकवून त्यापासून मसाला करतात.


औषधी उपयोग :

झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे डाळींबाच्या फळातील दाण्यांचा रस, फळाची ओली अथवा वाळलेली साल, फूले आणि मूळ यांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. डाळिंब हे फळ पित्तशामक आहे. याची साल नुसती तोडात ठेवली तरी खोकला आटोक्यात राहतो. उष्णतेच्या विकारांवर डाळिंब अतिशय उपयुक्त आहे. अग्नी दीपन करणे, पचन सुधारणे, व अतिसाराचा नाश करणे हे त्याचे प्रमुख गुण असून गळ्याचे विकार, मुख रोग, तृष्णा, दाह, ज्वर व अतिसार या रोगांचे ते नाशक असते. डाळींबाच्या सालीत तुरट रसामुळे सूज कमी करणे, जंतूनाशक, जखम शुद्ध करून ती भरून आणणे हे गुण असतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे करण्यासाठी होतो.


लोककथा :


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. एकदा एक राजा आपल्या राज्यातील दूरवरच्या एका प्रदेशाला भेट देण्यासाठी घोड्यावरून निघाला. राजाला भयंकर तहान लागली. तेवढ्यात त्याला एकडाळिंबाचीबाग दिसली. राजाने तिथल्या माळ्याला विचारले, "मला थोडा डाळिंबाचारस मिळेल का?" त्यावर माळ्याने एक पिकलेले डाळिंब तोडले व ते घेऊन तोबागेच्या कोपऱ्यात असलेल्या आपल्या झोपडीकडे गेला. थोड्याच वेळात राजास डाळिंबाचा लाललाल ताजा रस मिळाला. राजाची तहान भागली. मग तो बागेकडे, त्यातील डाळिंबाच्या झाडांकडे चौफेर निरखून पाहू लागला. सगळीकडे डाळिंबाची झाडे बेफाम वाढलेली दिसली. मग राजाने माळ्याला विचारले, "ही डाळिंबे विकून तुम्हाला किती नफा होतो?" माळ्याने भाबडेपणाने सांगितले, "तीनशे दिनार मिळतात मला". त्यावर राजाने विचारले, "ठीक आहे. तर मग राजाच्या कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही त्यापैकी किती देता?" माळी उत्तरला, "नाही, काहीच नाही. धान्य उत्पादन करणाऱ्यावरच फक्त राजाचा १०% कर आहे. फळांच्या लागवडीवर करच बसवलेला नाही." डाळिंबाच्या झाडांची ती विपुल झाडे पाहून राजाच्या मनात आले, "बागेतील उत्पन्नावर सुद्धा आपण कर बसवला पाहिजे. साऱ्या राज्यभर मिळून अश्या कितीतरी बागा असतील." आपल्या मनात आलेल्या या विचाराने राजाला बरे वाटले. ताबडतोब राजधानीत जाऊन असे करावे या विचाराने त्याने घोड्यावर मांडही ठोकली. इतक्यात काही विचार येऊन तो पुन्हा खाली उतरला व पुन्हा डाळिंबाचा रस देण्याबाबत माळीबाबांना सांगितले.

डाळिंबाच्या झाडावरून आघाशीपणे फिरणारे राजाचे डोळे पाहून राजाच्या मनात काय चालले आहे याची कल्पना माळीबाबांना आली असावी. तो पुन्हा आपल्या झोपडीत गेला व रस घेवून आला. मात्र यावेळी आणलेला रस खूप थोडा होता. राजाला आश्चर्य वाटले. राजाने विचारले, "एवढाच रस?" तेव्हा माळीबुवा उत्तरले, "महाराज आपण मघाशी जेव्हा डाळिंबाचा रस मागितलात, डाळिंबानेही उदारपणे आपल्याला रस दिला. एकाच डाळिंबात त्यामुळे आपल्याला काठोकाठ कप भरून रस मिळाला. आता मात्र मी पाच डाळिंबे तोडली. पण रस मात्र एवढाच निघाला." "माळीबुवा जरा स्पष्ट करून सांगता का तुम्हाला काय म्हणायचे आहे ते" राजाने विचारले, "अगदी सोपं आहे ते, महाराज," माळीबुवा म्हणाले "आमच्या राजाचं मन फार मोठे आहे तो फळझाडे हवी तशी वाढून देतो. सगळ्यांनाच त्या फळांचा हिस्सा मनमोकळेपणाने मिळतो. झाडालाही माहित असते की, आपल्यामागे राजाचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे झाडेही आपल्या फळातून विपुल रस देतात. पण आज राजाच्या मनात आले की, फळांवर कर बसवावा! डाळिंबाच्या झाडाच्या ते लक्षात आले! त्यामुळे आपल्या मागील राजाचा आशीर्वाद संपला आहे असे त्याला वाटले व त्याला रस आटला"

राजाला आपल्या मनात आलेल्या लोभी विचारांची लाज वाटली व फळझाडांवर कर लादण्याची कल्पना त्याने मनातून काढून टाकली. त्याच्या मनावरच भार हलका झाला. राजाच्या मनोवृत्तीत पडलेला बदल माळीबुवांनी बरोबर हेरला. राजाने आणखी रस देण्यास सांगितले. या वेळचा रसाचा कप मात्र लाल ताज्या रसाने काठोकाठ भरून आलेला होता. राजाने माळ्याचे आभार मानले आणि तो घोड्यावर बसून निघून गेला.  (कथा संदर्भ :आपले वृक्ष कुळकथा आणि लोककथा - मनेका गांधी)
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters