ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

'एकदंत' या नावाची गणेशास प्राप्ती!



एकदा कार्तवीर्य नावाचा क्षत्रिय राजा मृगयेसाठी बाहेर पडला असता त्याला थकवा आला. शेजारीच जमदग्नी मुनीचा आश्रम पाहून तो तेथे गेला. मुनींनी त्याचे स्वागत केले व सर्वांसह त्याच्याही भोजनाची उत्तम व्यवस्था केली. मुनींच्या आश्रमात सम्राटालाही दुर्लभ अशी उत्तम व्यवस्था पाहून विस्मित झालेल्या कार्तवीर्याने सचिवाकरवी शोध घेतला. तेव्हा त्या मुनीच्या घरी कामधेनू असल्याचे कळले. कार्तवीर्याने कामधेनूची मागणी केली परंतु जमदग्नी मुनींनी त्याला नकार दिला. मग कार्तवीर्याने आपल्या सैन्यांना कामधेनूस नेण्यासाठी पाठवले, पण कामधेनूपासून निर्माण झालेल्या सैन्यांनी कार्तवीर्याच्या सैन्यांचा नि:पात केला. 

त्यानंतर कार्तवीर्याने कामधेनूच्या मागणीसाठी जमदग्नीकडे दूत पाठविला; कामधेनू द्यावी नाहीतर युद्धास तयार राहण्याबाबत कळविले. त्यामुळे जमदग्नी आणि कार्तवीर्य यामध्ये घोर युद्ध झाले. त्या युद्धात सर्व अस्त्रांचा उपयोग केला गेला. कार्तवीर्याने दत्तात्रयांनी दिलेली शक्ती जगदग्नीवर सोडली. अशा प्रकारे क्षत्रिय राजाने जमदग्नीजवळील कामधेनुच्या अभिलाषेने त्याच्याशी युद्ध करून त्यास ठार मारले व कामधेनु घेवून जाऊ लागला. हे पाहून ती कामधेनू शोकार्त होऊन गोलोकास निघून गेली.

जमदग्नी मुनींची पत्नी रेणूका हिने आपला पुत्र पुरुषोत्तम याचा धावा केला. त्या वेळी पुरुषोत्तम पुष्कर तिर्थावरुन परत आला. ते सर्व दृश्य पाहून परशूरामाने प्रतिज्ञा केली की, "मी कार्तवीर्याला ठार मारीन आणि २१ वेळा पृथ्वीला नि:क्षत्रिय करीन." मग रेणूका परशूरामाला म्हणाली की, "रामा, तू ही आता शोक करु नकोस. मला सती जायला अनुमती दे. सर्व तीर्थांचे स्मरण कर आणि मी सती गेल्यावर तू केलेली प्रतिज्ञा पूर्ण कर." नंतर रेणूका पतीसह सती गेली. परशुरामाने सर्व पितृक्रिया पार पाडली. तेथे आलेल्या ब्रम्ह्यदेवाने परशुरामाची प्रतिज्ञा ऐकली तेव्हा ते म्हणाले, "तुझी प्रतिज्ञा अवघड आहे. ती पार पाडण्यासाठी तुला फार प्रयत्न करावे लागतील. तू कैलासावर शंकराकडे जा. त्यांचेकडून श्रीकृष्णमंत्रकवच घे. त्याच्या सिद्धीने तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल."

त्याप्रमाणे परशूराम कैलासावर आला. परब्रम्ह्यस्वरुप असलेल्या शंकरांना हात जोडले व त्यांची स्तुती केली. शंकरांनी त्याला विचारले की, "हे मुला तू कोणाचा पुत्र आहेस? तू कुठे राहतोस? माझी स्तुती तू कशासाठी केलीस? मी तुझ्यासाठी काय करु?" तेव्हा परशूरामाने आपली सारी हकीकत शंकरांना सांगितली आणि स्वत: केलेली प्रतिज्ञाही सांगितली. त्यावेळी पार्वती व काली यांनी त्याच्या प्रतिज्ञेला विरोध केला. त्यावर परशूरामाला अतिशय दु:ख झाले व त्याच्या डोळयात पाणी आले. परंतु, शंकरांनी दयाळू होऊन, "आजपासून तू माझा पुत्र आहेस, तुझ्या कार्यसिद्धीसाठी मी तुला मंत्र देतो" असे सांगून सर्व प्रकारची शस्त्रास्त्रविद्या त्याला दिली. त्याला श्रीकृष्णकवचाचा विधी सांगून स्तवणही सांगितले; आणि याच्या यथायोग्य विधानानंतर त्याच्या प्रतिज्ञापुर्तीचे कार्य पार पडेल असा आर्शिवादही दिला.

शंकरांना नमस्कार करुन परशूराम पुष्कर तीर्थावर गेला. त्या ठिकाणी त्याने मंत्र सिद्ध केला. कृष्णाने साक्षात दर्शन देऊन त्याला यथायोग्य वर दिला. त्यानंतर परशूरामाने युद्ध करण्याहेतूने आपला दूत कार्तवीर्याकडे पाठविला. कार्तवीर्य ससैन्य समरांगणावर गेला. समोरासमोर दोघेही उभे ठाकले आणि दोघांचे तुमुल युद्ध झाले. निरनिराळया शस्त्रास्त्रांचा उपयोग झालेल्या त्या युद्धात परशूरामाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. त्या वेळी तेथे आलेल्या ब्रम्ह्यदेवाने परशूरामाला सांगितले की, " तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. तरी तू आता पुन्हा शंकराकडे जा." तेव्हा परशूराम कैलासावर जाण्यास निघाला.

परशूराम कैलासावर आला. त्या ठिकाणी असलेल्या नंदी, वीरभद्र यांसारख्या सर्व पराक्रमी गणांशी त्याची भेट झाली. इतक्यात गणेश त्याला भेटला आणि म्हणाला, "महादेव शंकर आता झोपले आहेत. मी त्यांची संमत्ती घेऊन येतो तोपर्यंत थांब. आपण नंतर मिळून जाऊयात."

यावर परशूराम गणेशाला म्हणाला, "अरे! मी परमेश्वराला नमस्कार करण्यासाठी अंत:पुरात जातो आहे. प्रणाम करुन मी ताबडतोब परत येईन. त्यांच्या कृपेने मी कार्तवीर्याला मारले; २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली, त्या जगदगुरुला शक्य तितक्या लवकर मला भेटलेच पाहिजे." हे ऐकताच गणेशाने सांगितले, "अरे, तू थोडा वेळ थांब. एकांतात असलेल्या स्त्री-पुरुषांना कधीही पाहू नये. तसे जर त्यांना पाहिले तर त्याचे परिणाम तुला माहित आहेत काय?"

तेव्हा परशूराम हसून म्हणाला, "होय, सर्व काही मला माहित आहे. पण तो दोष कोणाला? विकारी, कामी असलेल्या मानवांना! निर्दोष असलेल्या माझ्यासारख्या बालकाला कसला दोष! आई-वडिलांची लज्जा पोरांना कोढून?" एवढे बोलून परशूराम हसत हसत आत जाण्याची त्वरा करु लागला. गणेशाने त्याला खूप समजावले पण गणेशाचे बोलणे न मानता हातातील परशू सरसावून परशूराम निर्भयतेने आत जाण्यास निघाला. तेव्हा गणेशाने उठून त्याला अडवले. प्रेमाने, नम्रतेने त्याला बाजूस सारले. तेव्हा रागाने त्याला मारण्यासाठी परशूरामाने परशू उचलला. त्या धकाधकीत गणेश खाली पडला. पण तरीही स्वत:ला सावरुन त्याने परशूरामाला पुन्हा आत न जाण्याबद्दल बजावले. तरीही परशूराम ऐकेना.

तेव्हा मात्र गणेशाने स्वत:ची सोंड कोटी योजने वाढवून त्यात त्याला गुरफटून सारे सप्त लोक हिंडवून आणले. त्या भ्रमणाने शुद्ध गेलेला परशूराम जेव्हा सावध झाला तेव्हा गुरुदत्तांनी दिलेले स्त्रोत्रकवच म्हणून त्याने गणेशावर स्वत:चा परशू टाकला. तो व्यर्थ्य करण्यासाठी स्वत:चा डावा दात गणेशाने पुढे केला. परशूचा वार फुकट गेला परंतु गणेशाचा दात मात्र तुटून पडला!

सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सर्वजण जमा झाले. त्या गडबडीने शंकर-पार्वतीही तेथे आले. ते दृश्य पाहून पार्वती रागावली व परशूरामाला मारण्यास तयार झाली. तेव्हा परशूरामाने मनातून कृष्णाचे स्मरण केले व कृष्ण म्हणजेच श्रीविष्णू तेथे बालरुपात प्रकट झाले. शंकरांनी विष्णूची स्तुती केली. त्या स्तुतीने संतुष्ट होऊन विष्णू म्हणाले, "हे देवी पार्वती, माझे थोडे ऐक. तुला हा गजानन आणि कार्तिकेय जसा तसाच हा परशूराम आहे. मुलाचा मुलाशी जो वाद झाला तो दैवाच्या दोषामुळे. तरी आजपासून तुझ्या या मुलाचे नाव 'एकदंत' पडले आहे. हे दुर्गे, या परशूरामावर रागावू नकोस. गणेशाचे एकदंत हे नाव या घटनेनेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे या घटनेमधील पुत्रवत असलेल्या परशूरामाला अभय दे."

परशूरामानेही सर्व काही जाणून पार्वतीची स्तुती केली आणि गणेशाची यथाशास्त्र पूजा करुन श्रीविष्णूने सांगितलेल्या अष्टकाने त्याची स्तुती केली. तेव्हापासून श्रीगणेशास 'एकदंत' हे नाव प्राप्त झाले.

1 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

एक दंत नाव का पडले ही गोष्ट आवडली

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters