ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

वरद विनायक व्रत महिमा...

मालव देशात कर्ण नावाचं एक प्रसिद्ध नगर होतं. तिथे 'चद्रांगद' नावाचा एक पराक्रमी राजा राहत होता. तो अष्टसिद्धींनी युक्त आणि सर्व शास्त्रार्थ जाणणारा होता. त्याने मोठमोठे यज्ञ केले, दानधर्म केला. त्याची सभा पहिली म्हणजे इंद्राची 'सुधर्मा' नावाची सभा तुच्छ वाटत असे. 

एके दिवशी अमात्य क्रूर हिंसा सोडून द्या असे सांगत असतानाही तो कृष्ण वस्त्र परिधान करून मृगयेला गेला. अरण्यात अनेक श्वापदांचा त्याने वध केला. घोड्यावर बसून सैन्यासह अरण्यात हिंडत असता, एक मोठी राक्षसांची टोळी त्याच्या दृष्टीस पडली. ते पाहून सर्वाना भय वाटले कारण राक्षस तसे महाभयंकर दिसतच होते. त्यांच्या समूहात एक राक्षसीण होती. ती त्या चद्रांगद राजाचे सुंदर रूप पाहून मोहित झाली व ती त्या राजाबरोबर आलेल्या सेवकांचे भक्षण करू लागली. तेवढ्यात संधी साधून राजा जवळच्या तळ्यात बुडी मारून बसला. 

त्या तळ्यात अनेक नागकन्या क्रीडा करण्यासाठी आल्या होत्या. त्या कन्यकांनी राजाला आपल्याबरोबर पाताळात नेले. त्याचा आदरसत्कार करून त्याचं पूर्ववृत्त विचारलं, नंतर त्या त्यास म्हणाल्या, "तू जर आमचा पती होशील, तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील." त्यावर चद्रांगद म्हणाला, "मातोश्री, आम्ही सोमवंशातील राजे एकपत्नी व्रताचे आचरण करीत असतो. परद्रव्य, परदारा, परद्रोह यांचा स्वीकार आमच्या वंशातील पुरुष कधीच करीत नाहीत. वेदाध्ययन, याजन, दान, शरणागताच पालन, निषिद्ध कर्माचा त्याग आणि विहित कर्माचं आचरण हा तिन्ही वर्णांचा धर्म आहे. आपल्या घरी आलेल्याचे योग्य आतिथ्य करणे हा सर्वांचाच धर्म आहे. मी तुमचा अतिथी आहे म्हणून तुम्ही भलतीच गोष्ट सांगून मला दु:ख देऊ नका." राजाचे हे बोलणे ऐकून विव्हल झालेल्या नाग्कन्यानी त्याला शाप दिला कि, "तुझ्या स्त्रीशी तुझी ताटातूट होवो." राजाला पायात बेडी घालून त्यांनी त्याला बांधून ठेवले. 

इकडे त्या राक्षसीने राजा तळ्यात गेला आहे हे पाहून त्या तळ्यातील सारे पाणी पिवून टाकले. काही सेवक पळाले होते ते राजधानीत आले व त्यांनी राणीस आपला राजा तळ्यात बुडाल्याचे सांगितले. ती दु:खाने मूर्च्छित होऊन पडली. 

अनेक नागरिक आपले अश्रू पुसून राणीचे समाधान करू लागले. ते म्हणाले, "माते, शोक करू नकोस, मुलाकडे पहा. शोकाचे अश्रू प्रेतास जाळीत असतात. मर्त्य प्राण्यात चिरंजीव असा कोण आहे? जीर्ण वस्त्र टाकून नवं धारण करावं, त्याप्रमाणे जुना देह टाकून आत्मा नव देह धारण करीत असतो. स्वत: मृत्युच्याच दाढेत असणारा प्राणी दुसऱ्याच्या मृत्यूने शोक करतो हे आश्चर्य आहे. दैव आणि काल यांच्या स्वाधीन असलेले सर्व माझंच आहे असा तो मानतो. सारं काही नश्वर आहे हे जाणून शोक सोडून दे. तुझा पती धार्मिक होता, पुण्यशील होता. तो मुक्तीस गेला असेल किंवा स्वर्गलोकी जर जिवंत असेल तर केव्हा तरी परत येईल. भूत-भविष्य जाणणाऱ्या मुनीस आम्ही तो कोठे आहे ते विचारू आणि नंतर जे काही कर्तव्य असेल ते सारं करू." इंदुमतीला जरा धीर आला. तिने स्व:ताला सावरून आपले अश्रू पुसून टाकले. प्रजाजनांना निरोप दिला. सर्व उपभोगांचा त्याग करून बारा वर्षे विधवेप्रमाणे मोठ्या दु:खाने पण पवित्र आचरणाने काढली. 

एके दिवशी तिच्या घरी नारद आले आणि म्हणाले, "इंदुमती, शोक करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. तो कधी तरी तुला भेटेल. तू या वैधव्यदिक्षेचा त्याग कर. निलवस्त्र परिधान कर, कानात भूषण, हाती बांगडया, कपाळी कुंकू धारण कर. कंठात मंगळसूत्र घाल." नारदांचे हे भाषण ऐकून इंदुमातीला परमानंद झाला. तिने तत्काळ सर्व सौभाग्य अलंकार धारण केले. ही आनंदाची वार्ता घरोघरी साखर वाटून तिने कळवली. नारदास नमस्कार करून पतीप्रप्तीचा उपाय विचारला. 

नारदांनी तिला वरद विनायक व्रताचा उपदेश केला. मुर्तीकेची (मातीची) गणेश मूर्ती करून तिची रोज एक महिनाभर पूजा करायला सांगितली. श्रावण शुद्ध चतुर्थीस या व्रताचा आरंभ करायला आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत समाप्ती करायला सांगितले. इंदुमतीने मोठ्या आदराने व भक्तियुक्त अंत:करणाने हे वरद विनायक व्रत केले.

इंदुमतीचे हे व्रत समाप्त झाले असता गणपतीच्या प्रसादाने पाताळातील नागकन्यांची वृत्ती पालटली. त्यांनी राजाचा आदरसत्कार करून त्याला परत पाठवले. राजा सरोवराच्या बाहेर आला व स्नान करू लागला. त्याच वेळी त्याला नागरिकांनी पाहिले व ओळखले. राजाने इंदुमती व पुत्र यांचे क्षेमकुशल विचारले. लोकांनी राजाला इंदुमती व्रतामुळे कशी कृश झाली आहे व केवळ पुत्रासाठीच तिचे प्राण कसे शिल्लक राहिले आहेत ते सांगितले. 

कित्येक नागरिक नगरात गेले आणि राजा आल्याचे वर्तमान सर्वाना सांगितले. इंदुमातीस ही सुवार्ता कळताच तिला ब्रह्मानंद झाला. तिने लगेच राजाला सामोरे जाण्यासाठी प्रधानांस आणि सैनिकास आज्ञा दिली. लोकांनी नगर सुशोभित केले. सुवासिनी हातात आरती घेऊन त्या गायन, वाद्ये, यांच्या घोषासह सरोवरापाशी आल्या. अमात्य राजाला सामोरे गेले. नमस्कार करून त्याला प्रेमालींगण दिले. राजाने सर्वाना कुशल विचारले. त्यांचा आदर केला. त्याने गणेशपूजन पूर्वक पुण्याहवाचन करून शंकराची पुजा केली व ब्राह्मणास दक्षिणा देऊन संतुष्ट केले. श्रीफळ आपल्या पुढे काही अंतरावर फोडले आणि त्यापुढे जाऊन कृश इंदुमतीचे दर्शन घेतले. तिने सौभाग्यवती स्त्रीयांकरवी राजास ओवाळले, लाह्या आणि फुलांची वृष्टी केली. नंतर भरल्या अंतकरणाने ते परस्परांशी बोलू लागले. विरहाने भोगलेल्या व्यथा परस्परांना सांगितल्या. नंतर उभयतांनी मोठ्या थाटात हत्तीवरील अंबारीत बसून नगरात प्रवेश केला. रात्री एकांतात शयनमंदिरात ती दोघे बसली असता पत्नीने गणपतीच्या व्रताचा प्रभाव सांगितला. राजाच्याही मनात दृढ श्रद्धा निर्माण झाली आणि पुढच्याच वर्षी त्याने मोठ्या थाटाने श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गजाननाचा महोत्सव केला.
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

आरती संग्रहकोश

ऑनलाईन सोबती

वाचक संख्या

free counters