ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १० : बोर


९) बोर (Ziziphus Mauritiana)


" लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य :

बोर तसे प्राचिन काटेरी झाड फळझाड आहे. बोर वैदिक आणि महाकाव्य कालापासून परिचित आहे. रामायणात शबरीची हृदय कथा आहे तर महाभारताचे रचनाकार व्यास बादरायण म्हणूनही विख्यात आहेत. हिमालयात द्वैपायन भागात बोरीची भरपूर झाडे त्याकाळात होती; म्हणून बदरी म्हणजे बोरीशी संबंधित व तिथे जन्मलेले व्यास 'बादरायण'. हिमालयातील एक प्रसिद्ध क्षेत्र बदरीनाथ यांच्या आसपासही बोरीचीझाडे खूप होती म्हणूनच त्याला बदरीनाथ असे नाव पडले. थोडक्यात बोर हे रुचकर फळांचे झाड म्हणून माहित आहे.

सर्वसाधारण वर्णन :

बोर हे लालसर पिवळट रंगाचे फळ असून ते आंबटगोड लागते. बोरात असणारे बीला आटोळी असे म्हणतात. बोराची मोठाली म्हणजे अगदी २५ ते ३०फुट उंचीची झाडे होतात किंवा खुरटी झुडपे असतात. चन्यामन्या बोरीचा विस्तारवेलीसारखा होतो. लागवडीनंतर ४-५ वर्षांनंतर बोराला फळे येऊ लागतात.


औषधी उपयोग :

पौष्टिकतेत बोर सफरचंदापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणतात. क जिवनसत्वाच्या बाबतीत आवळा, पेरु यानंतर बोराचाच नंबर लागतो. त्यात कॅल्शीयम, फॉस्फरस आणिलोह हे धातूही अधिक प्रमाणात आढळतात. बोरं जशी खाण्यासाठी असतात तसेच बोराच्या झाडाचे इतर भागही उपयुक्त असतात. साल अतिसार आणि अमांश थांबवते. जंगली फळे पित्तनाशक, थंडावा देणारी, वेदनाहारक आहेत. बियांतला मगज निद्राकारक असतो. याच्या पानाचे चूर्ण मधुमेहावर तर पानांचा लेप केसतोडीवर गुणकारी ठरतो.


इतर उपयोग :

लाकूड अतिकठीण, मजबूत, टिकाऊ म्हणून शेतीची अवजारेकरण्यास योग्य असते. बियांचे तेल कातडी कमावण्यासाठी वापरतात. पाला गुरांना विशेषत: दुभत्या जनावरांना घालतात. त्यावर लाखेचे किडेही पोसतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताच्या बांधावर बोरी मुद्दाम लावतात. ग्रामीण भागात कोरडवाहू फळ म्हणून ते उत्पन्नाचे मोठे साधन आहे.


कथा  :

रामायणातील कथा (१) :

वनवासात असताना श्रीरामाची पत्नी सीता हिचे रावणाने हरण केले. परंतु रामाला सीताकोठे नाहीशी झाली ते माहित नव्हते. त्यामुळे तो व लक्ष्मण तिच्या शोधासाठी भटकू लागले. कोणत्या दिशेने जावे म्हणजे तिचा शोध लागेल ते त्यांना समजेना. एका बोराच्या झाडाने ते सांगितले. वनातून वाट कधीत फिरत असताना एका साधारणश्याच बोराच्या झाडाने त्यांना हाक मारली! ते ऐकू लागले, झाड म्हणाले, "हे देवा श्रीरामा! सीतेला एक राक्षस पळवून नेत असताना मी पहिले. तिला माझ्या जवळून नेत असताना मी तिचा साडीचा पदर पकडून तिला थांबवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण माझी शक्ती कमी पडली! माझ्या फांद्या किती कमकुवत आहेत! तिच्या पदराचा फक्त एक फाटलेला तुकडा फक्त माझ्या डहाळ्यावरील काट्यांवर अडकून राहिला. पण मी तिला थांबवू शकलो नाही. झाडाने लाजेने आपली मान खाली घातली. परंतु बोराच्या झाडाने दाखवलेल्या धैर्यामुळे श्रीरामाला आनंद झाला. त्याने बोराच्या झाडाला आशीर्वाद दिला, "हे बोराच्या झाडा! तू माझ्यासाठी जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू अमर होशील! यापुढे तुला मुळासकट उपटून टाकण्याचा कोणत्याही मनुष्याने प्रयत्न केला तरी त्याला ते साध्य होणार नाही. तुझे एक तरी मूळ जमिनीखाली शिल्लक राहील. त्यातून पुन्हा झाड उगवेल आणि तू जिवंत राहशील."



रामायणातील कथा (२) :

रामाप्रमाणे शबरीची उष्टी बोरे खायला लक्ष्मण धजेना. एका अर्थी हा बोरांचाही अपमानच होता. मग पुढे राम-रावण युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागलीआणि त्याला वाचविण्यासाठी हनुमानाने संजिवनी सकट आख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. संजिवनी म्हणजे कोणती वनस्पती तर जाणकार सांगतात, ती बोराचीच जात होती. म्हणजे ज्या बोरांचा उष्टी म्हणून लक्ष्मणाने अवमान केला, त्या बोरानेच त्याला जीवदान दिले.


बादरायण संबंध कथा (३) :

बोरासंबंधी प्रचलित एक वाक्यप्रचार म्हणजे 'बादरायण संबंध'. एका पांथस्थाला उतरायला कुठेही जागा मिळेना. अखेर एका श्रीमान गृहस्थाच्या वाडयात तो शिरला. तुम्ही आमचे परिचित / आप्त नाहीत, मग तुम्ही सरळ प्रवेश कसा करता? अशी पृच्छा यजमानांनी केली. पांथस्थ उत्तरला, "अहो, अगदी सरळ आहे. तुमच्या आवारात बोराचे झाड आहे आणि माझ्या बैलगाडीचे चाक बोराचे आहे, तेव्हा आपण नातेवाईकच!" असा हा बादरायण संबंध.

(संदर्भ : आपले वृक्ष कुळकथा आणि  लोककथा - मनेका गांधी ; असे वृक्ष असे देव  - शा प्र दीक्षित;  आंतरजालावरून साभार ).
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters