ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १५ : केवडा

१४) केवडा / केतकी  (Pandanus Odorotissimus)


" सिद्धिविनायकाय नम:। केतकीपत्रं समर्पयामि।। "


वैशिष्ट्य :

केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनसुद्धा केवड्याचे पान शंकरांना कधीच वाहत नाहीत.


सर्वसाधारण वर्णन :

केवड्याची बेटे असतात. ही एक माध्यम उंचीची वनस्पती आहे. खोडाला फांद्या फुटतात आणि आधारासाठी मजबूत हवाईमुळे येतात. फुलांचा आकार काहीसा हंसासारखा असतो आणि ती केसात माळतात. पाने तलवारीच्या पात्यासारखी असतात. काहीशा चामड्यासारख्या पानांच्या कडांवर तीक्ष्ण दाते असतात. पाने जवळजवळ एक मीटरपर्यंत लांब असतात आणि त्यांची खोडावरची रचना सर्पिल असते. त्याला अननसासारखी फळे लागतात आणि ती गोड लागतात.

फूले दोन प्रकारची असतात : नर आणि स्त्रीपुष्पे. नर पुष्पांच्या कणसांना पिवळट सोनेरी छंद असते आणि हे छंद सुगंधी असतात. स्त्रीपुष्पाना वास नसतो. फळ काहीसे अननसासारखे, भरभक्कम बाठ्युक्त गोलाकार आणि वस्तुतः अनेक फळांचे बनलेले संयुक्त फळ असते. ते प्रथम पिवळे आणि पिकल्यावर रक्तवर्णी होते.


औषधी उपयोग :

केवडा हा दुर्गंधीनाशक आहे. आंबट ढेकर, मुखदुर्गंधी व अपस्मार यावर केवडा गुणकारी ठरतो तसेच हृदयाशी संबंधित विकारांवर गुणकारी आहे. केवडा शीतल असल्याने स्त्रीया यास केसात माळतात. कंबरदुखी, त्वचारोग, नेत्ररोग यातही केवडा उपयुक्त आहे.


इतर उपयोग :


केवडा ही बहुउपयोगी वनस्पती असून सुगंधी औषधी व इतर उत्पादनासाठी केवडय़ाचा उपयोग होतो. केवड्याच्या पानांच्या चटया विणतात. तसेच त्यापासून कागद करता येतो. पानांपासून निघणाऱ्या धाग्यांची मासेमारीची जाळी विणतात. ब्रशचे झुबके करतात आणि हवाई मुळांपासून मिळणाऱ्या धाग्यांपासून टोपल्या आणि ब्रश करतात. नरपुष्पांच्या छदांपासून अत्तर काढतात.विविध प्रकारच्या मिठाई व सरबते तयार करण्यासाठी केवडयाच्या पाण्याचा वापर केला जातो. केरळमध्ये क्यनॉलच्या कडेने धूप थांबवण्यासाठी केवड्याची लागवड करतात.

कथा (१)  : 

केवडा शंकराच्या पूजेला का घेत नाहीत?

हजारो वर्षांपूर्वी सत्ययुगामध्ये विष्णूने चिरकालीन सुखप्राप्तीसाठी व ब्रह्मदेवाने स्वत:च्या सर्व वासनांचा विनाश करण्यासाठी तपश्चर्या आरंभली. एके दिवशी विष्णू आणि ब्रह्मदेव अरण्यात हिंडत असता समोरासमोर आले. दोघांच्यातही श्रेष्ठ कोण असा वाद त्यांच्यात जुंपला. तेवढ्यात शंकर तेथे आले आणि म्हणाले, "या वादाचा निकाल लावणे अगदी सोपे आहे. मी एक छोटीशी परीक्षा घेतो. माझे पाय किंवा डोके तुम्हा दोघांपैकी जो आधी शोधून आणेल तो श्रेष्ठ!" इतके बोलून ते अंतर्धान पावले.


विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही कामाला लागले पण त्यांना शंकरांचे पाय आणि डोके कुठेच सापडेना. ते गोंधळून गेले. मग विष्णू डुकराचे रूप घेवून पाताळलोकात सर्वात खालच्या भागात गेले. रागारागाने त्यांनी जमीन खणली पण शंकरांचे पाय कुठेच सापडले नाहीत. इकडे ब्रह्मदेव आपल्या हंस पक्षावर बसून उंच उंच प्रदेशात उडू लागला. पण त्यानाही शंकरांचे डोके काही सापडेना. निराश होवून दोघेही आपापल्या मार्गांनी अरण्याकडे परत निघाले. तेवढ्यात ब्रह्मदेवांना आकाशातून एक केवड्याचे पान खाली पडताना दिसले. ते पाहताच या वादात खोटेपणा करण्याचे ब्रह्मदेवांनी ठरवले. शंकर नेहमी कपाळावर केवडा धारण करतात हे प्रसिद्ध होते. तेव्हा ब्रह्मदेवानी ते केवड्याचे पान पकडले आणि ते घेवून ते विष्णूपाशी आले. "मला शंकरांचे डोके सापडले आहे हे पहा! पुरावा म्हणून मी त्यांच्या कपाळावरील केवड्याचे पान आणले आहे." ब्रह्मदेवाने ठासून सांगितले.

विष्णूचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याने ब्रह्मदेवाच्या हातातील केवड्याच्या पानाकडे पाहिले व त्याला विचारले, "केवड्या! हे खरे आहे का?" केवड्याने न डगमगता बढाई मारली, "होय महाराज हे खरे आहे! खरं मी शंकरांच्या कपाळावरील केवड्याचे पान आहे!" तेवढ्यात शंकर तेथे आले. केवड्याचे खोटे बोलणे त्यांनी ऐकले होते. ते भयंकर संतापले आणि गर्जू लागले. केवड्याला तर त्यांनी शापच दिला "अरे केवड्या! तू पक्का खोटारडा आहेस. यापुढे तुला माझ्या जवळ सुद्धा येण्याचा अधिकार राहिलेला नाही! माझ्या देवळात सुद्धा यापुढे केवड्याच्या पानांना प्रवेश मिळायला मज्जाव करण्यात येईल." तेव्हापासून केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनसुद्धा केवड्याचे पान शंकरांना कधीच वाहत नाहीत.

कथा (२)  : 

केवडा शंकराच्या पूजेला का घेत नाहीत?

एके दिवशी शंकर पार्वती सारीपाट खेळत बसले होते. खेळात पार्वतीने भगवान शंकरांना हरविले. पार्वतीकडून आपण खेळात हरलो हे पाहून शंकर लाजेने केतकीच्या बनात लपून बसले. आपली हार विसरण्याकरीता ते ध्यानस्थ बसले. पार्वतीने अंर्तज्ञानाने झालेला प्रकार जाणला व शंकरांना परत आणण्याकरीता निघाली. पार्वतीने एका सुंदर स्त्रीच्या रुपात त्यांच्या समोर गेली पण भगवान शंकर डोळे बंद करुन ध्यानस्थ बसले असल्यामुळे त्यांनी तिला पाहिले नाही अथवा तिचे अस्तित्व त्यांना जाणवले नाही. मग पार्वतीने आपल्या केसात केवडा माळला. केतकीच्या सुगंधाने शंकरांचे ध्यान भंग पावले व त्यांनी डोळे उघडले. आपले ध्यान या केवडयाच्या सुगंधाने भंग पावले म्हणून शंकर चिडले व त्यांनी केवडयाला शाप दिला. तेव्हापासून केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनसुद्धा केवड्याचे पान शंकरांना कधीच वाहत नाहीत.

(संदर्भ : आपले वृक्ष कूळ कथा आणि लोककथा - मनेका गांधी; आंतरजालावरून  साभार )

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters