ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

कुबेराचे गर्वहरण...


लक्ष्मी ज्याच्याकडे अखंड वास करते व ज्याचा खजिना अक्षय म्हणजेच कधीही रीता होत नाही असा देव म्हणजे ‘कुबेर’. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ असून तो़ एक शिवभक्त देखील होता. कुबेराने शंभर वर्षे घोर तपश्चर्या करुन भगवान शंकरास प्रसन्न करुन घेतले. त्यावर भगवान शंकराने कुबेरास देवदेवतांच्या खजिन्याचा ‘खजिनदार’ होण्याचा वर दिला. त्याचबरोबरीने कुबेरास ‘यक्षांचा राजा’ घोषित केले. त्यामुळे अलकापुरी या राजमहालात सर्वोच्च रत्नजडीत सिंहासनावर बसणारा यक्षांचा राजा ‘कुबेर’ हा लवकरच गर्भश्रीमंत म्हणून ओळखला जाऊ लागला.

कोणालाही हेवा वाटावा इतके एैश्वर्य कुबेराकडे होते. तो सदैव दाग-दागिने, हिरे माणके यांनी मढलेला असे. कितीही उधळपट्टी केली तरीदेखील आपल्या खजिन्यातील संपत्ती तसूभरही रीती होत नाही याचा त्याला खूप गर्व झाला. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो सतत वेगवेगळे समारंभ आयोजित करत असे व त्यास सर्व देवदेवतांना आमंत्रित करुन आपल्या गर्भश्रीमंतीचे प्रदर्शन करीत असे.

शिवभक्त कुबेर दररोज भगवान शंकरांकडे जाई व त्यांना हिरे माणकांनी आभूषित दागदागिणे अर्पण करत असे. महादेवांनी विविध अलंकारांनी आभूषित असावे असा त्याचा आग्रह असे. भगवान शंकर मात्र कुबेरास सांगत, “अरे, मला कोणत्याही आभूषणांची आवश्यकता नाही. मी तर कायम भस्म लावणारा वैरागी आहे.” तरीदेखील कुबेर हार मानत नसे तो नित्यनेमाने कैलाशावर जाऊन शंकरांना वेगवेगळे दागिने परिधान करण्याची विनंती करीत असे.

एकदा कुबेराने खास भगवान शंकरांसाठी भोजनसमारंभाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार कुबेर भगवान शंकरांना आमंत्रण देण्यास कैलासावर गेला व त्याने शंकर पार्वती यांना वंदन करुन भोजनसमारंभास येण्याचे अगत्य करावे अशी विनंती केली. भगवान शंकर त्यास म्हणाले, “सद्यस्थितीत माझे कैलास सोडून येणे काही संभव दिसत नाही. तरी, आपण माझा पुत्र बाल गणेश यांस भोजनसमारंभास घेऊन जावे. गणेशास पक्वांनांची आवड आहे, त्याला भरपेट खाऊ घालून संतुष्ट करा.” महादेवांच्या सांगण्यानुसार कुबेराने बाल गणेशास भोजनाचे आमंत्रण दिले व बाल गणेशानेदेखील कुबेराचे गर्वहरण करण्याच्या उद्देशाने भोजनाचे आमंत्रण आनंदाने स्विकारले.

ठरलेल्या दिवशी कुबेराच्या राजमहली भोजनसमारंभाची जंगी तयारी केली जाते. राजमहल अत्यंत सुशोभित करुन भोजनगृहात विविध प्रकारची पक्वाने तयार केली जातात. गणेशाच्या स्वागतासाठी कुबेरासहीत सर्व अलकापुरी सज्ज असते. ठरलेल्या वेळी बाल गणेश अलकापुरीत प्रवेश करतो. गणेशास पाहताच कुबेर त्याचे हसतमुखाने स्वागत करुन महालात प्रवेश करण्याची विनंती करतो. खेळत-बागडत आलेल्या बाल गणेशाचे पाय मातीने बरबटलेले असतात. तशाच पायांनी तो कुबेराच्या राजमहालात प्रवेश करतो. मातीने बरबटलेल्या पायांमुळे राजमहालातील संगमरवरी गालीचे खराब होतात. पायांनी उमटलेले मातीचे ठसे पुसण्यासाठी कुबेराचे यक्ष गणेशाच्या मागे-मागे फिरु लागतात.

कुबेर गणेशास आसनस्थ होण्याची विनंती करुन म्हणतो, “हे पार्वतीनंदना, आपले या कुबेराच्या महालात स्वागत आहे. आपण भोजनासाठी आसनस्थ होऊन मनसोक्त भोजन करावे. संतुष्ट होईपर्यंत आपणांस भोजन वाढले जाईल.” कुबेराचे यक्ष बाल गणेशास भोजन वाढण्यास सुरुवात करतात. जसजसे पानात वाढले जाई तसतसे गणेश ते फस्त करी. हळूहळू कुबेराच्या भोजनगृहात तयार केलेली सर्व पक्वाने संपत येतात तरीही गणेशाचे पोट भरण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कुबेर आपल्या सेवकांना आणखीन भोजन तयार करण्यास सांगतो. इतके होऊनही गणेश भोजन व मिष्ठानांची वाट पाहत बसूनच असतो.

अनेकदा भोजन तयार करुनही गणेशाचा खाण्याचा आवाका व कुबेराचे भोजन यांचा मेळ काही बसत नाही. गणेशाची भूक इतकी चेतावते की, तो तडक उठून भोजनगृहात जातो. तिथे दिसेल ते कच्चे अन्न, धान्य, भाज्या खाऊन टाकतो. भोजनगृहातील अन्नधान्य व भोजनसामग्री संपते तरीदेखील त्याची भूक काही क्षमत नाही.

चिंतीत कुबेर गणेशास म्हणतो “बाळ, इतके खाणे आपल्या तब्येतीस ठीक नाही.” त्यावर स्मित हास्य करीत गणेश उत्तरतो, “आपण काळजी करु नका. माझी भूक अजून क्षमली नाही. आपण वचन दिले आहे की मला भरपेट भोजन द्याल तेव्हा माझ्यासाठी आणखी भोजनाची व्यवस्था करा”. कुबेराच्या भोजनगृहातील सर्व भोजन व धनधान्य संपल्याने कुबेर बाजारातून भोजन मागवितो. तरीही गणेशाचे पोट भरत नाही. बाजारातून भोजन मागवून मागवून हळूहळू कुबेराच्या खजिन्यातील सर्व संपत्ती खर्च होते.

कुबेर सर्व काही विकून गणेशास भोजन देण्याची व्यवस्था करतो तरी सुद्धा गणेशास तृप्तीचा ढेकर काही येत नाही. त्यानंतर गणेशाची भूक इतकी चेतावते की तो समोर दिसेल ते गिळंकृत करु लागतो. हे पाहून कुबेर घाबरतो. सर्व काही गिळंकृत करुनही गणेशाची भूक न क्षमल्याने तो कुबेराकडे येऊ लागतो. आपणांसही गिळंकृत केले जाईल या भितीने कुबेर कैलाशाकडे धाव घेतो. कुबेराच्या मागे-मागे बाल गणेशही कैलाशावर येऊन पोचतो.

कुबेर महादेवांच्या पायावर डोके ठेऊन माफी मागतो व झालेला प्रकार महादेवांना सांगतो. महादेव गणेशास विचारणा करतात तेव्हा बाल गणेश उत्तरतो, “मला भरपेट भोजन देण्याचे वचन कुबेराने दिले होते. मात्र मला पोटभर भोजन पुरविले गेले नाही. माझी भूक काही क्षमलेली नाही.” त्यावर भगवान शंकर गणेशास माता पार्वतीने तयार केलेला मोदक खाण्यास सांगतात. मोदक खाताच गणेशास तृप्तीचा ढेकर येतो.

हे सर्व पाहून कुबेराचे डोळे उघडतात. कुबेर बाल गणेशास म्हणतो, “मला क्षमा करा. मला माझ्या एैश्वर्याचा गर्व झाला होता. माझी सर्व संपत्ती मला भगवान शंकराच्या कृपेनेच मिळाली आहे. आपण माझे डोळे उघडलेत. यापुढे मी एैश्वर्याचा व संपत्तीचा कधीही गर्व करणार नाही.

गणेशाच्या कृपेने कुबेराचे गर्वहरण तर होतेच शिवाय त्याला त्याचे एैश्वर्य पुन्हा प्राप्त होते. त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक राजांना कुबेराने आपला खजिना उघडून मुक्तहस्तानं मदत केल्याचे अनेक दाखलेही पुराण कथांमध्ये आढळतात.

2 comments:

Rajashri Nimbalkar म्हणाले...

खुप छान वाटले कुबेराचे गर्वहरण वाचून त्याच प्रमाणे आपले आचरण करण्याबाबत मार्गदर्शन लाभले. धन्यवाद.

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद राजश्री!

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters