ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग १३ : अर्जुन / अर्जुनसादडा




१२) अर्जुन / अर्जुनसादडा (Terminalia Arjuna)


" कपिलाय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। "


वैशिष्ट्य :


अर्जुन हा 'स्वाती' नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. नदी-ओढ्याच्या काठची धूप थांबवण्यासाठी, पाण्यातील क्षारता कमी करण्यासाठी आणि पक्षांना आसरे निर्माण करण्यासाठी अर्जुन वृक्षाची बरोबरी करणारा बहुगुणी कल्पवृक्ष शोधूनही सापडणे कठीण आहे. रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी तसेच उद्यान वृक्ष म्हणूनही अर्जुन वृक्ष प्रसिद्ध आहे.

वाल्मिकी रामायणामध्ये वनवासात सितेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रभू रामचंद्रांना अर्जुन वृक्ष पाहिल्यावर अधिकच तिव्रतेने मैथिलीची आठवण होते असे हृद्य वर्ण केले गेलेय; कारण अर्जुन वृक्षाचा गौरवर्ण आणि नितळ कांती! उंचच उंच वाढलेले भरदार आणि डौलदार अर्जुन वृक्षराज पाहिल्यावर महाभारतातील कुंतीने आपल्या पुत्रोत्तमाचे नाव त्याच्यावरुनच अर्जुन ठेवले असल्याची खात्रीच पटते. नंतर त्या दोघांमधील एकरुपता एवढी वाढत गेली की अर्जुन वृक्षाला पार्थ आणि धनंजय अशा टोपणनावांनीही ओळखले जाऊ लागले.


सर्वसाधारण वर्णन :

अर्जुन हा अरण्यात वाढणारा पानझडी वृक्ष आहे. उंची साधारणत: २५ मीटरपर्यंत असते. याचे खोडसुद्धा शोभिवंत असते. उंच वाढलेल्या वृक्षाचा बुंधा चक्क दीड मीटर व्यासाचा सहज असू शकतो. कित्येक ठिकाणी तर ७-८ मीटर उंचीपर्यंत शाखाविरहित सरळ गरगरीत खोड दिसते. अर्जुनवृक्षाची साल गुलाबी-पांढऱ्या रंगाची असते. पाने साधी, एकमेकांसमोर किंवा थोडी खालीवर, लंबगोलाकार असून त्यांचे देढ अगदीच आखूड असतात. पाने पेरुच्या पानासारखी असून लांबी १० ते १५ सें. मी. व रुंदी ५ ते ७ सें.मी. पर्यंत असते. फांद्यांच्या टोकाला पानेही एकवटलेली असतात, त्याच ठिकाणी अग्रभागी आणि पानांच्या कक्षात असंख्य फुलोरे यांचा मोहोर आल्यावर झाडांना एक आगळेच सौदर्य प्राप्त होते. फळास ५ ते ७ पंखासारख्या धारा असतात. फळात एकच बी असते ती फळातून बाहेर पडत नाही. बीजप्रसार म्हणजे फलप्रसार वा-यामार्फत तसेच पाण्यातून वाहत जाऊन होतो. बीया सहजपणे रूजतात.

औषधी उपयोग :

हृदयास शिथीलता आली असता अर्जुनाची आंतर्साल गुळाबरोबर दुधात उकळून देतात. अर्जुनात हृदयास बलदायक व उत्तेजक हे दोन गुण एकत्र आल्यामुळे हृदयाच्या रोगात हे फार मौल्यवान औषध आहे. त्याशिवाय त्वचारोग, कर्करोग, अस्थिभंग, यकृताचे आजार इ अनेक व्याधीवरील उपचारांमध्ये अर्जुनसाल वापरली जाते. विषबाधेवरही अर्जुन उपयुक्त ठरतो.



इतर उपयोग :

अर्जुनसालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी आणि रंगविण्यासाठीही करतात. अर्जुनाची पाने रेशीम किडयांच्या पोषणासाठी वापरली जातात. अर्जुनाचे लाकूड जड आणि मजबूत असते, पण कापायला आणि कोरीव कामासाठी अवघड जाते. त्याचा उपयोग घरबांधणी, बैलगाडया, शेतीची अवजारे, होडया बनविने अशा कामांसाठी केला जातो.

कथा  : 

नलकुबेर आणि मणिग्रीव या कुबेरपुत्रांना आपल्या साम्राज्याचा व अलौकिक संपत्तीचा गर्व झाला व ते दोघेही इतरांशी अत्यंत उन्मत्त व गर्विष्ट्यपणे वागू लागले. एकदा मद्याने धुंद होवून ते दोघेही एका सरोवरात अप्सरांबरोबर जलक्रीडा करीत होते. तेवढ्यात नारद मुनी तेथे आले. सत्तेने भ्रमिष्ट झालेल्या कुबेरपुत्रांनी नारदमुनींकडे दुर्लक्ष केले व आपल्याच नादात ते जलक्रीडा करू लागले. त्यावर नारद मुनींनी त्यांना चांगलाच धडा शिकवायचे ठरवले व कुबेरपुत्रांकडून आपला असा झालेला अनादर पाहून नारद मुनींनी त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला. तसेच वृक्षयोनीत असतानाही या दोन्ही कुबेरपुत्रांची देवत्वाची स्मृती जागृत राहिल व देवयुगाची शंभर वर्षे उलटल्यावर भगवान श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त होऊन त्यांच्या पवित्र स्पर्शाने यांची वृक्षयोनीतून मुक्तता होईल असा उ:शापही दिला. या शापाचा परीणाम म्हणून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोघांचे अशोक वृक्षाच्या जोडीत रुपांतर झाले.


देवयुगाची शंभर वर्षे उलटल्यावर, एकदा भगवान श्रीकृष्ण धान्याची तूस काढीत असता त्यांचे लक्ष या अशोक वृक्षाच्या जोडीकडे गेले व त्यांना नारदमुनींचे शब्द ज्ञात झाले. देवर्षी नारदांचा उ:शाप सार्थ करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या हातातील तूस काढण्याचे यंत्र घेऊन त्या दोन अशोकाच्या झाडांजवळ गेले व त्या दोन्ही झाडांच्या समोर मधोमध उभे राहिले. आपल्या हातातील यंत्राने त्यांनी ती दोन्ही अशोक वृक्षाची झाडे मुळासहित उपटून टाकली. अशोक वृक्ष उन्मळून पडताच, त्यातून दोन दैदिप्यमान व तेजस्वी अशा प्रकाशमान आकृती बाहेर पडल्या व भगवान श्रीकृष्णाची स्तुती करुन आपल्या लोकी निघून गेल्या. ते होते कुबेरपुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव. अशा प्रकारे भगवान कृष्णाने त्यांची वृक्षयोनीतून मुक्तता केली.

नलकुबेर आणि मणिग्रीव या कुबेरपुत्रांचे देवयुगाची शंभर वर्षे अर्जुनवृक्ष बनून राहणे व भगवान श्रीकृष्णांच्या हातून त्यांची अर्जुनवृक्षातून मुक्तता यामुळे अर्जुनवृक्षास देवत्व प्राप्त झाले.

(संदर्भ : आपले वृक्ष भाग १ - श्री. द.महाजन; आंतर जालावरून साभार - Plants Myths & Traditions in India - Shakti M Gupta)
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters